For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जिम्नॅस्टिकमध्ये महाराष्ट्राला 12 पदके

06:43 AM May 14, 2025 IST | Tarun Bharat Portal
जिम्नॅस्टिकमध्ये महाराष्ट्राला 12 पदके
Advertisement

5 सुवर्ण, 5 रौप्य आणि 2 कांस्यपदकांची लयलूट

Advertisement

प्रतिनिधी/ नवी दिल्ली

महाराष्ट्राच्या युवा खेळाडूंनी दमदार कामगिरी करीत 7व्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेतील जिम्नॅस्टिक प्रकारात पाच सुवर्णपदकांसह बारा पदकांची लयलूट करीत मंगळवारचा दिवस गाजविला.  नवी दिल्लीतील इंदिरा गांधी स्टेडियममध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेत रिदमिक जिम्नॅस्टिकमध्ये ओव्हर ऑल प्रकारात मुंबईची परिनाने मदनपोत्रा हिने 83.650 गुणांसह सुवर्ण जिंकले. तर मुंबईच्याच शुभश्री मोरेने 80.200 गुण घेत रौप्यपदक मिळवले. दिल्लीच्या राचेल दीपच्या वाट्याला कांस्यपदक आले. हूप प्रकारातही परिनानेच बाजी मारली. तिने दिल्लीच्या राचेलदीप (19.300) हिला मागे टाकून 21.050 गुण मिळवले. महाराष्ट्राची देवांगी पवार (18.725) कांस्यपदकाची मानकरी ठरली. बॉल प्रकारात आपली सहकारी परिनाला मागे टाकून किमया कार्लेने 20.500 गुणांसह सुवर्ण आपल्या नावे केले. परिनाने 20.150 गुण मिळवले. दिल्लीच्या राचेलने कांस्य मिळवले.

Advertisement

क्लब प्रकारात शुभश्री मोरे अव्वल ठरली. तिने 20.600 गुण घेत परिनाला मागे टाकले. परिनाने 19.750 गुणांची कमाई केली. हरियाणाच्या मिष्काने 19.500 गुणांसह कांस्यपदक मिळवले. रिबन प्रकारात बाजी मारत परिनाने स्पर्धेतील तिसऱ्या सुवर्ण पदकावर शिक्कामोर्तब केले. रिबनमध्ये तिने 20.650 गुण, तर रौप्यविजेत्या शुभश्रीsने 19.850 गुण घेतले.

रिदमिक जिम्नॅस्टिकमध्ये महाराष्ट्राच्या मुलींनी सुवर्णपदकांची लयलूट केली असतानाच आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक प्रकारात मात्र सुवर्णपदक हुकले. मुंबईच्या अनुष्का पाटीलने 42.67 गुण घेत रौप्यपदक मिळवले. तेलंगणाच्या निशिका अगरवाल हिने 44.333 गुण घेत सुवर्णपदक पटकावले, तर 41.233 गुण मिळवणारी ठाण्याची सारा राऊळ कांस्यपदकाची मानकरी ठरली.

परिनाची सुवर्ण हॅटट्रिक

रिदमिक जिम्नॅस्टिक प्रकारात परिना मदनपोत्राने लक्षवेधी कामगिरी करताना 3 सुवर्णपदके जिंकली. तिने रिबन, बॉल यासह ओव्हर ऑल प्रकारात सुवर्ण जिंकले. मागील वर्षी संयुक्ता काळे या खेळाडूने पाच सुवर्ण जिंकून सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.

Advertisement

.