IMD Weather Update : पुढील 5 दिवस घाट विभागात ऑरेंज अलर्ट, मुसळधार पावसाची शक्यता
पुढील चार दिवस जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे
Maharashtra Weather Update : सध्या राज्यात ठिकठिकाणी पावसाची रिपरीप सुरु आहे. कोकणासह घाट परिसरातील जिल्ह्यात अनेक ठिकाणी दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. पुणे, सातारा, कोल्हापुरात अधूनमधून मध्यम ते हलक्या स्वरुपाचा पाऊस सुरु आहे. काही ठिकाणी वादळी वाऱ्याच्या पावसामुळे शेती आणि घरांचे नुकसान झाले आहे.
दरम्यान, आता पुणे हवामान विभागाकडून पुढील चार-पाच दिवस राज्यात काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. आहिल्यानगर, पुणे, कोल्हापूर, सातारा आणि घाट विभागात पुढील चार दिवस जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट दिला आहे.
राज्यात पुढील 48 तासांत कमाल व किमान तापमानात फारसा बदल होणार नाही. कोकण विभागातील रायगड येथे 22 मे रोजी, रत्नागिरीत 22 व 23 मे रोजी तर सिंधूदुर्ग येथे 20, 22 व 23 मे रोजी तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह जोरदार ते अतिजोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना त्या-त्या दिवशी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात पुढील दोन दिवस तुरळक ठिकाणी तर विदर्भात पुढील तीन दिवस काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच सांगली, सोलापूर, नाशिक व घाटविभागात आज 19 मे रोजी तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या जिल्ह्यांनाही ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
राज्यातील बहुतांश जिल्ह्यात पुढील चार ते पाच दिवस मेघगर्जनेसह, विजांच्या कडकडाटसह हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील या जिल्ह्यांना पुढील चार ते पाच दिवस येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुणे व आसपासच्या परिसरात ढगाळ वातावरण असणार राहील तसेच काही ठिकाणी मेघगर्जनेसह हलक्या स्वपरुपाच्या पावसाची शक्यता आहे .