‘महाराष्ट्र राज्य येळ्ळूर फलक’ दोन खटल्यांमध्ये साक्ष नोंद
बेळगाव : महाराष्ट्र राज्य येळ्ळूर फलक प्रकरणातील खटला क्रमांक 122/15 आणि 126/15 या दाव्यात बुधवार दि. 19 रोजी झालेल्या सुनावणीवेळी तपास अधिकाऱ्यांची साक्ष नोंदवून घेण्यात आली. त्याचबरोबर खटला क्रमांक 296/15 मध्ये तपास अधिकारी गैरहजर राहिले. त्यामुळे न्यायालयाने अधिकाऱ्यांना वॉरंट बजावण्याचा आदेश दिला. येळ्ळूर गावच्या वेशीतील फलक जिल्हा प्रशासनाने पोलीस बंदोबस्तात हटविल्याने मोठा जनक्षोभ उसळला होता. याप्रकरणी पोलिसांनी गावकऱ्यांवर वेगवेगळ्या प्रकारचे सात गुन्हे दाखल केले होते. त्यापैकी चार खटल्यांचा निकाल यापूर्वीच लागला असून सर्वांची निर्दोष मुक्तता झाली आहे.
तर उर्वरित तीन खटल्यांची सुनावणी सुरू आहे. खटला क्रमांक 122 आणि 126 मध्ये तत्कालीन तपास अधिकारी एच. शेखरप्पा यांनी न्यायालयात हजर राहून बुधवारी साक्ष नोंदविली. त्याचबरोबर आणखी एका दाव्यात तत्कालीन तपास अधिकारी जॅक्सन डिसोजा गैरहजर राहिले. त्यामुळे त्यांना वॉरंट बजाविण्याचे आदेश न्यायाधीशांनी दिले आहेत. वरील तिन्ही खटल्यांची पुढील सुनावणी 6 डिसेंबरला होणार आहे. या खटल्यांचे कामकाज अॅड. शामसुंदर पत्तार, अॅड. शाम पाटील, अॅड. हेमराज बेंचण्णवर पाहत आहेत.