सिकंदर शेखचे गंगावेश तालमीत जल्लोषी स्वागत! तालमीचा महाराष्ट्र केसरीचा दुष्काळ संपला
अभिजीत खांडेकर
गतवर्षी हुलकावणी देणाऱ्या महाराष्ट्र केसरी गदेला यावर्षी गवसणी घालून कोल्हापूरच्या गंगावेश तालमीचा पैलवान सिकंदर शेख याने कोल्हापूरकरांसहीत महाराष्ट्रातील तमाम कुस्तीप्रेमींची मने जिंकली. मुळचा सोलापूरचा असला तरी त्याच्या या विजयाने कोल्हापूरकरांची छाती अभिमानाने फुलली आहे. शुक्रवारी महाराष्ट्र केसरीचा किताब जिंकल्यानंतर सिकंदर शेख याने कोल्हापूर गाठून आपली मातृसंस्था असलेल्या गंगावेश तालमीला भेट दिली.
अचाट ताकत आणि विद्युतगतीची चपळता असणाऱ्या सिकंदर शेख याने यावर्षी कोल्हापूरला महाराष्ट्र केसरीची गदा मिळवून दिली. मागील वर्षी अंतिम सामन्यात पोहोचल्यावर पृथ्वीराज पाटील यांच्या नंतर सलग दुसऱ्या वर्षी कोल्हापूरला महाराष्ट्र केसरीची गदा मिळणार अशी यामुळे कोल्हापूरात आनंदाचे वातावरण तयार झाले होते. पण मागील वर्षीच्या वादाचे गालबोट लागलेल्या या कुस्तीमध्ये सिकंदर शेखला पराभव पत्करावा लागला. या कुस्तीची राजकिय सामाजिक आणि क्रिडा विश्वात बरिच चर्चा झाली. तसेच कुस्तीनंतर पराभूत झालेल्या सिकंदर शेखला मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी मिळाली.
यावर्षी मागील पराभवाची परतफेड करत अवघ्या काही सेकंदात सिंकदरने गतविजेत्या शिवराज राक्षे याला याला चारिमुंड्य़ा चित करून महाराष्ट्र केसरीला गवसणी घातली. त्याच्या या विजयाने कोल्हापूरातील गंगावेश तालमीत एकच जल्लोष झाला. पैलवानांनी शड्डू ठोकून आनंदोत्सव साजरा केला.
काल रात्री सिकंदर शेख याचे कोल्हापूरात जिंकलेल्या चांदीची गदा आणि महिंद्रा थार गाडीसह आगमन झाले. यावेळी सहकरी पैलवानांनी फटाक्यांनी आणि गुलालांची उधळण करत त्याचे स्वागत केले. आपल्या वस्ताद विश्वास हारूगले यांची भेट घेऊन त्यांचे अशिर्वाद घेतले. तसेच महिलांनी औक्षण करून सिकंदर शेखला ओवाळले. यावेळी त्याच्या बरोबर गंगावेश तालीमीचे सहकारी पैलवान आणि वस्ताद हजर होते.