काळ्यादिनी महाराष्ट्राने आपला प्रतिनिधी पाठवावा
मध्यवर्ती म. ए. समितीची शरद पवार यांच्याकडे मागणी
बेळगाव : सीमावासियांवर झालेल्या अन्यायाविरोधात 1 नोव्हेंबर रोजी काळादिन पाळून निषेध फेरी काढली जाणार आहे. 67 वर्षांपासून झालेल्या अन्यायाविरोधात वाचा फोडण्यासाठी सीमाभागात काळादिन पाळला जातो. यावेळी महाराष्ट्र सरकारने आपली जबाबदारी म्हणून आपला एक प्रतिनिधी या दिवशी निषेध फेरीमध्ये सहभागी होण्यासाठी पाठवावा, अशी मागणी मध्यवर्ती म. ए. समितीने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्याकडे केली. मध्यवर्ती म. ए. समितीच्या शिष्टमंडळाने बुधवारी इस्लामपूर येथे शरद पवार व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान सीमाप्रश्नासोबतच विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.
नोव्हेंबर महिन्यात महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. सीमावासियांचा महाराष्ट्रात येण्यासाठीचा लढा सुरू आहे. त्यामुळे प्रत्येक राजकीय पक्षाने आपल्या जाहीरनाम्यात सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीबाबत आपली भूमिका मांडावी, अशी मागणी पवार यांच्याकडे करण्यात आली. त्याचबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना पत्र पाठवून मागणी करण्यात आली आहे. जयंत पाटील यांच्यासोबतही विविध विषयांवर चर्चा झाली. यावेळी मध्यवर्ती म. ए. समितीचे खजिनदार प्रकाश मरगाळे, कार्याध्यक्ष मनोहर किणेकर, सुनील आनंदाचे, विनोद आंबेवाडीकर यांसह इतर उपस्थित होते.