For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पक्षाकडे उमेदवारी मागणार नाही! आमदार सुधीर गाडगीळ यांच्या नावाचा लेटर बॉम्ब! कार्यकर्त्यांमध्ये कल्लोळ

10:40 PM Sep 03, 2024 IST | Abhijeet Khandekar
पक्षाकडे उमेदवारी मागणार नाही  आमदार सुधीर गाडगीळ यांच्या नावाचा लेटर बॉम्ब  कार्यकर्त्यांमध्ये कल्लोळ
Advertisement

प्रतिनिधी सांगली

Advertisement

भाजपा आमदार सुधीर गाडगीळ यांच्या नावाच्या एका लेटर बॉम्बने सांगलीत खळबळ उडाली आहे.
दहा वर्षे आमदार म्हणून केलेल्या विकास कामाचा पाढा वाचत, कितीही अपप्रचार केला तरी त्याला उत्तर न देता आणि जात-पात, धर्म-पंथ यांचा विचार न करता फक्त माणुसकी केंद्रस्थानी मानून काम केल्याने लोकांनी दोनदा विजयी केले. सगळे प्रश्न सोडवल्याचा दवा करणार नाही. मात्र मी समाधानी आहे. आता पुन्हा पक्षाकडे उमेदवारी मागायची नाही असे या पत्रात लिहिले असून त्यावर सही नाही मात्र आमदार म्हणून शिक्का आहे. यामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये मात्र कल्लोळ माजला आहे.
मंगळवारी रात्री उशिरा वृत्तपत्रांच्या कचऱ्यांमध्ये एक चार पानांचे टायपिंग केलेले पत्र पोहोचले आहे. हे पत्र आमदार सुधीर गाडगीळ यांनी सांगलीकर जनतेला उद्देशून लिहिल्याचे म्हटले आहे. त्यावर आमदार म्हणून एक शिक्काही आहे. मात्र गाडगीळ यांची सही नाही. संपर्क साधायचा प्रयत्न केला तरी आमदार किंवा त्यांच्या सहायकांशी संपर्क झाला नाही. कुटुंबीयांना सुद्धा धक्कादायक असले तरी या पत्राबाबत काही कल्पना नसल्याचे सांगितले.
मात्र या लेटर बॉम्बने सांगलीच्या राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरू झाली. या मुद्देसूद पत्रात गाडगीळ यांनी 2014 पूर्वी विधानसभा क्षेत्रात असलेल्या खराब रस्त्यांचा आणि त्यानंतर शहर, विस्तारित भाग आणि ग्रामीण भागात बांधकाम विभागाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर रस्ते केल्याचे म्हटले आहे. सांगली - पेठ रस्त्याचे काम मार्गी लावले, विधानसभा क्षेत्रात रस्ते, छोटे-मोठे पूल, ग्रामीण रस्ते मोठ्या प्रमाणावर मंजूर केले आणि लवकरच ते सगळे पूर्ण होतील, सांगली सिविलची ओपीडी बिल्डिंग आणि 100 खाटांचे माता व मुलांचे हॉस्पिटल, 100 खाटांचे जिल्हा रुग्णालय, ऑक्सीजन प्लांट, व्हेंटिलेटर सुविधा उपलब्ध करून सांगली सिव्हिल हॉस्पिटलला नवीन आणि अत्याधुनिक रूप दिले असे म्हटले आहे. 1975 सालापासून रखडलेला विश्रामबाग रेल्वे फाटकावरील उड्डाणपूल, शेकडो वर्षे हरिपूर ते कोथळी हा नावेने होणारा प्रवास नवीन पुलामुळे सुखकर होऊन सांगली कोल्हापूर जिल्ह्याचे अंतर कमी झाले, 1929 साली बांधलेला आयर्विन पूल ताकद कमी झाल्यामुळे जड वाहतुकीस बंद झाला आणि सांगली व्यापार पेठेला फटका बसला. म्हणून पर्यायी पूल बांधण्यात आपणास यश आले असून लवकरच तो वाहतुकीसाठी खुला होईल, सांगली शहराचा विस्तारित भाग, गुंठेवारी शामराव नगरचा पाणी व निचरा प्रश्न आणि नाट्यपंढरीसाठी सुसज्ज नाट्यगृहाला 25 कोटी मंजूर करून आणले. लवकरच सुसज्ज नाट्यगृह उभे राहील, 2014 नंतर विधानसभा क्षेत्रातील अंकली, बामनोली, बिसूर, बुधगाव, हरिपूर, धामणी, पदमाळे, माधव नगर, कावजी खोतवाडी, वाजेगाव येथे रस्ते, स्मशानभूमी, तीर्थक्षेत्र विकास, पूल, समाज मंदिरे, गटारी , शाळा, आरोग्य केंद्र अशा कामांसाठी इतिहासात सर्वाधिक निधी आणण्यात यश मिळवले. सांगलीकरांची अनेक कामे मार्गी लावल्यामुळे 2018 मध्ये महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकला असेही या पत्रात म्हटले आहे. मात्र या दहा वर्षात माझ्या हातून सर्व प्रश्न सोडवले गेले असा दावा मी करणार नाही. जनतेशी जनसंपर्क वाढवला, पक्षाने दिलेल्या संधीला सार्थक करण्याचे प्रयत्न केले. त्यामुळे जनतेने दुसऱ्यांदा आमदार केले. त्यांच्या विश्वासातून उतराई होण्याचा प्रयत्न मी या पंचवार्षिकातही केला असून कोणीही अपप्रचार केला तरी त्याला उत्तर न देता मी काम करत राहिलो.‌ काम करताना जात -पात, धर्म- पंथ असा भेद केला नाही. मात्र आता नव्याने होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मी उमेदवारी न मागण्याचा निर्णय घेतला आहे. राजकारणात कधीतरी थांबलं पाहिजे या मताचे आपण असून आपल्यावर असणाऱ्या संघ आणि कुटुंबाच्या संस्काराप्रमाणे यापुढेही लोकांच्या संपर्कात राहून काम करेन. भाजप जो उमेदवार देईल त्याला विजयी करण्यासाठी माझा निर्धार असेल, दहा वर्षात राहिलेले प्रकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी काम करेन आणि संघटनात्मक काम तसेच समाजकारण करत राहीन असेही या पत्रात म्हटले आहे.

*बिन सहीचे पण शिक्क्याचे पत्र*
सदरचे पत्र आमदार सुधीर गाडगीळ यांच्या नावाने असले तरी त्यावर त्यांची सही नाही. महाराष्ट्र विधिमंडळाच्या सदस्यत्वाचा शिक्का मात्र त्यावर आहे. या पत्राबाबत आमदार सुधीर गाडगीळ आणि त्यांचे स्वीय सहाय्यक यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. मात्र गाडगीळ यांचे सुपुत्र सिद्धार्थ गाडगीळ यांच्याशी व्हाट्सअप संदेश द्वारे संपर्क झाला असता आपणासही हे आता समजले असून, हा प्रकार धक्कादायक आहे. आमदार सुधीर दादांशी बोलल्यानंतर आपण नेमके काय घडले आहे त्यावर बोलू असे त्यांनी सांगितले.

Advertisement

Advertisement
Tags :

.