महाराष्ट्राची दोन्ही गटात दणक्यात विजयी सलामी
34 वी किशोर-किशोरी राष्ट्रीय कबड्डी स्पधा, गया, बिहार
वृत्तसंस्था/ मुंबई
महाराष्ट्राच्या मुलांनी 34 व्या किशोर/किशोरी गट राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत दोन्ही विभागात दणक्यात विजयी सलामी दिली. गया, बिहार येथील जी. डी. गोयंका पब्लिक स्कूल, रसलपूर येथील क्रीडांगणात मॅट वर झालेल्या मुलींच्या ब गटात महाराष्ट्राने मणिपूरचा 69-11 असा धुव्वा उडविला.
शुक्रवारी झालेल्या पहिल्या सामन्यात झंझावाती सुरुवात करीत महाराष्ट्राने पहिल्या डावातच 2 लोण 28-04 अशी भक्कम आघाडी घेतली. दुसऱ्या डावात आपल्या आक्रमणाची धार आणखी वाढवित प्रतिस्पर्ध्यावर आणखी 4 लोण देत हा विजय सोपा केला. संघनायिका सेरेना म्हस्करचा अष्टपैलू खेळ त्याला बिदिशा सोनार आणि यशश्री इंगोले यांची मिळालेली चढाई पकडीची झंझावाती साथ यामुळेच महाराष्ट्राने गुणांचे अर्धशतक सहज पार केले. महाराष्ट्राच्या मुलींच्या गटात राजस्थान व मणिपूर असे तीन संघ आहेत. आता गट विजेतेपदाकरिता राजस्थानशी लढत होईल.
रात्री उशीरा झालेल्या मुलांच्या सामन्यात महाराष्ट्राने इ गटात उत्तरांचलचा 62-28 असा सहज पराभव करीत विजयी सलामी दिली. आक्रमक सुरुवात करणाऱ्या महाराष्ट्राने पूर्वार्धात 3 लोण देत 33-10 अशी भक्कम आघाडी घेतली. उत्तरार्धात त्याच जोमाने खेळत आणखी 2 लोण देत गुणांचे अर्धशतक पार केले. उत्तरार्धात मात्र उत्तरांचलने बऱ्यापैकी प्रतिकार केला. पण एकाही लोणची ते परतफेड करू शकले नाही. त्यामुळे उत्तरांचलला 34 गुणांच्या मोठ्या फरकाने पराभवाचा सामना करावा लागला. महाराष्ट्राचा समावेश इ गटात असून, महाराष्ट्रसह मध्य प्रदेश, उत्तरांचल हे अन्य दोन संघ या गटात आहेत. या विजयाने महाराष्ट्राने बाद फेरी गाठण्याचा मार्ग मोकळा केला.