महाराष्ट्र नवीन कांद्याची आवक तुरळक प्रमाणात सुरू
भाव क्विंटलला 5000 हजारपासून 7000 पर्यंत : कर्नाटकातील आवक अंतिम टप्प्यात असल्याने कांद्याचा भाव भडकला
सुधीर गडकरी/ अगसगे
बेळगाव कृषी उत्पन्न बाजारपेठेमध्ये शनिवारच्या बाजारात महाराष्ट्र नवीन कांद्याची आवक तुरळक प्रमाणात सुरू झाली आहे. याचा भाव क्विंटलला 5000 हजार पासून ते 7000 पर्यंत झाला. कर्नाटकातील आवक अंतिम टप्प्यात आहे. यामुळे कांद्याचा भाव भडकला आहे. इंदोर बटाटा, आग्रा बटाटा, तळेगाव बटाटा, बेळगाव जवारी बटाटा व रताळ्याचा भाव क्विंटलला स्थिर आहे. मागील आठवड्यापासून कांदा दरात वाढ झाली असून तोच भाव आज शनिवार दि. 30 नोव्हेंबर रोजी देखील झाला.
महाराष्ट्र जुन्या कांद्याचा भाव 4000 पासून ते 8000 हजार रुपये क्विंटल भाव झाला. आणि नवीन महाराष्ट्र कांद्याचा भाव 3500 ते 7000 हजार रुपये क्विंटल भाव झाला. कर्नाटक नवीन कांदा भाव 3000 ते 6500 रुपये क्विंटल भाव झाला. तर पांढऱ्या कांद्याचा भाव 3000 ते 5500 क्विंटल झाला. यामुळे किरकोळ बाजारात कांद्याचा भाव वाढला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कांद्याची टंचाई भासू लागल्याने देशभरामध्ये कांद्याचे दर भडकले आहेत. याचा विपरीत परिणाम सर्वसामान्य नागरिकांवर होत आहे. त्यामुळे कांद्याने सर्वसामान्यांच्या डोळ्यातून पाणी आणले असून तर हॉटेलमधून कांदा गायब होऊ लागला आहे.
अतिवृष्टीच्या पावसामुळे कर्नाटकातील सुमारे 60टक्के कांदा खराब झाला आहे. उर्वरित 40 टक्के कांदा बाजारात आला असेल तोही आता जवळपास संपत आला आहे. त्यामुळे कांद्याचे टंचाई भासू लागली आहे. तसेच महाराष्ट्रात देखील पावसाने थैमान घातल्यामुळे त्या ठिकाणीदेखील कांदा उत्पादनात घट निर्माण झाल्याची माहिती व्यापाऱ्याने दिले असून यंदा कांदा दरात वाढ होण्याची शक्यता आहे
परराज्यामध्ये सध्या जवळपासच्या बाजारामधून कांदा आवक नाही. यामुळे ते कर्नाटक आणि महाराष्ट्रमधील कांद्याची आयात करतात. त्यामुळे परराज्यांमधून कांद्याची मागणी वाढली आहे. तसेच आंतरराष्ट्रीय बाजारातदेखील कांद्याची कमतरता असल्याने भाव वधारला आहे. त्यामुळेच कांदा दर भडकला असल्याची माहिती कांदा व्यापाऱ्यांनी दिली.
बेळगाव मार्केटयार्डमध्ये तुरळक प्रमाणात कांदा आवक येत आहे व मागणी दुप्पट असल्याने सवालामध्ये चडावोढ होऊन कांद्या घरात वाढ होत आहे. शिल्लक राहिलेल्या कांदा उत्पादनाला चांगला भाव मिळत असल्याने शेतकरी वर्गातून आनंद व्यक्त होत आहे. येत्या काही दिवसांमध्ये कांदा भाव दहा हजार ऊपये क्विंटलने विक्री होण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी दर्शविली आहे.
महाराष्ट्र कांदा तुरळक आवक विक्रीसाठी दाखल
सध्या महाराष्ट्रामध्ये चुकून काही प्रदेशात कांदा काढणीला प्रारंभ झाला आहे. केवळ दोन टक्केच शेतकऱ्यांनी कांदा काढणी केली आहे. त्या कांद्याला महाराष्ट्रसह कर्नाटकमध्ये देखील मोठ्या प्रमाणात मागणी आहे. काही व्यापारी महाराष्ट्रमध्ये जाऊन कांदा खरेदी करून इतर राज्यामध्ये विक्रीसाठी पाठवत आहेत. तर महाराष्ट्रातील व्यापारी कांदा खरेदी करून बेळगाव एपीएमसीला विक्रीसाठी पाठवत आहेत. गेल्या आठवड्यापासून महाराष्ट्रातील कांदा बेळगावला तुरळक प्रमाणात येत आहे याचा भावदेखील वाढला आहे.
जानेवारीनंतर मोठ्याप्रमाणात महाराष्ट्र कांदा आवक सुरू
महाराष्ट्रामध्ये कांद्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. संपूर्ण देशामध्ये पूर्वेकडील नाशिक जिह्यामध्ये कांदा उत्पादन घेतले जाते. त्याचप्रमाणे इतर राज्यांमध्येदेखील कांद्याचे उत्पादन घेतले जाते. हा कांदा टिकाऊ व खाण्यासाठी चवदार असतो. त्यामुळेच देशभरामध्ये व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये देखील या कांद्याला मोठ्या प्रमाणात मागणी असते. सध्या काही ठिकाणी कांदा तुरळक प्रमाणात काढणीला सुऊवात झाली आहे आणि डिसेंबर पंधरा तारखेनंतर व जानेवारीनंतर कांदा मोठ्या प्रमाणात काढणीला प्रारंभ होतो. यावेळी हा कांदा देशभरासह विदेशामध्ये देखील विक्रीसाठी जातो. यावेळी कांदा आवकेत वाढ होते आणि कांदा दर आटोक्यात येण्याची शक्यता आहे, अशी माहिती कांदा अडत व्यापाऱ्याने दिली.
इंदोर आग्रा तळेगाव बटाटा भाव स्थिर
इंदोर बटाटा आवक अंतिम टप्प्यात आहे. तर तळेगाव नवीन बटाटा आवकेला प्रारंभ झाला आहे. तसेच आग्रा बटाटा शीतगृहामधील येत आहे.
या बटाट्याच्या अवकेत समतोलता असल्याने मार्केट यार्डमध्ये बटाटा भाव स्थिर आहे. इंदोर बटाटा भाव 3600 ते 3800 रुपये आहे. आग्रा बटाटा भाव 2500 ते 3000 रुपये आहे. तळेगाव बटाटा भाव 2800 ते 3200 रुपये क्विंटल आहे, अशी माहिती खरेदीदार कुगजी यांनी दिली.
बियाण्यासाठी जवारी बटाट्याची मागणी
जवारी बटाट्याची आवक जवळपास संपत आली आहे. त्यामुळे रब्बी हंगामातील उन्हाळी बटाटा लागवडीसाठी शेतकरी जवारी बटाटा बियाण्यासाठी म्हणून खरेदी करीत आहेत. यामुळे आता शेतकरीच खरेदीदार म्हणून जवारी बटाटा खरेदी करू लागल्याचे दृश्य दिसू लागले आहे. त्यामुळे मिडीयम व मोठवड आकाराच्या बटाट्याला मागणी वाढली आहे. गोळी बटाटा किरकोळ विक्रीसाठी खरेदीदार खरेदी करीत आहेत. सध्या रब्बी हंगाम सुरुवात झाली असून यावेळी तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये उन्हाळी बटाटा लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते व याचे उत्पादन तीन महिन्यानंतर सुऊवात होते. सध्या बियाण्यासाठी म्हणून जवारी बटाट्याला मागणी आहे. तसेच रताळ्याचा भावदेखील स्थिर असल्याची माहिती अडत व्यापारी हेमंत पाटील यांनी दिली.
भाजीपाला भाव स्थिर, मात्र शेवगा शेंगांचा भाव वाढला
भाजीमार्केटमध्ये बेळगाव परिसरातील भाजीपाला आवक सुरू आहे व काही मोजकाच भाजीपाला परजिह्यातून मागविण्यात येत आहे. स्वीटकॉर्न बेंगळूरहून मागविण्यात येत आहे. तर मटर मध्यप्रदेशमधून मागविण्यात येत आहे. गाजर इंदोर नाशिकमधून तर बीन्स नाशिक व बेंगळूरमधून मागविण्यात येत आहे. शेवगा शेंगांचा भाव प्रति दहा किलोला 3000 ते 3500 ऊपये झाला आहे. इतर भाजीपाल्यांचे दर स्थिर आहेत. सध्या बेळगाव परिसरातील भाजीपाल्यावर भाजीमार्केट अवलंबून आहे. येथून भाजीपाला गोवा कोकणपट्टा आदी ठिकाणी पाठविला जातो. गेल्या दोन-तीन महिन्यापासून भाजीपाल्यांचे दर टिकून आहेत, अशी माहिती भाजी व्यापाऱ्याने दिली.