महायुती, महाविकास आघाडीतील लहान पक्षांची फरफटच ! लहान पक्षात गोंधळलेली परिस्थिती
बाळासाहेब उबाळे कोल्हापूर
महाराष्ट्रात महायुतीचे सरकार आहे. महाविकास आघाडी विरोधात आहे. महायुती आणि महाविकास आघाडीच्या संघर्षात या दोन्ही पक्षाबरोबर असलेल्या लहान पक्षांची फरफट होत आहे. महायुतीबरोबर असलेल्या लहान पक्षांतील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना महत्वाची पदेच दिली जात नाहीत. महाविकास आघाडीकडे सत्ताच नसल्याने त्यांच्याबरोबरच्या लहान पक्षांना काही मागताही येत नाही. त्यामुळे दोन्हीकडील लहान पक्षांची अडचण झाली आहे.
महाराष्ट्रात सध्या महायुतीचेच सरकार असून युतीमध्ये एकनाथ शिंदे यांची शिवसेना, अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासह अन्य लहान घटक पक्ष आहेत. युतीतील घटक पक्षांना विधान परिषदेसह विविध महामंडळे, समितीवर पदे देण्याचे आश्वासन युतीच्या प्रमुख नेत्यांकडून देण्यात येते. मात्र एकंदरीत राजकारण पाहिल्यास कोणतीही पदे देत असताना सत्ताधारी, विरोधकांकडून न्यायालयात आव्हान- प्रतिआव्हान देण्यात येत आहे. यामुळे न्यायालयीन फेऱ्यात वेळ निघून जात आहे. परिणामी किमान महामंडळाचे अध्यक्षपद, जिल्हा नियोजन मंडळांवर सदस्यपद किंवा एखादे महत्वाचे लाभाचे पद मिळेल, या आशेवरील लहान पक्षातील पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांची निराशा होत आहे. तरीही आज ना उद्या काहीतरी मिळेल म्हणून लहान पक्ष तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करत आहेत. यामुळे त्यांची फरफटच सुरु आहे.
आघाडीतील लहान पक्षांनी फक्त आंदोलनच करायचे
महायुतीविरोधात महाविकास आघाडी कार्यरत आहे. महाविकास आघाडीमध्ये महायुतीची धोरणे, कारभार मान्य नाही असे काही लहान पक्ष सहभागी आहेत. महायुतीच्या धोरणांविरोधात आवाज उठवायचा असतो त्यावेळी शक्यतो आघाडीतील लहान पक्षच पुढे असतात. मात्र आघाडीच्या कोणत्याही विचारपीठावर लहान पक्षातील पदाधिकाऱ्यांचे स्थान मुख्य प्रवाहातील पक्षातील नेत्यांच्या बाजूलाच असते.
राजकीय अस्तित्व शून्य
महायुती असो किंवा महाविकास आघाडी लहान पक्षांचे अस्तित्व जवळपास नगण्य आहे. लहान पक्षातील कार्यकर्त्यांनी फक्त आंदोलन करायचे एवढेच काम आहे. निवडणुकीत त्यांची आर्थिक ताकद पोहोचत नसल्याने या पक्षातील लोकांचा उमेदवार म्हणून विचारसुध्दा केला जात नाही. कोणत्याही निवडणुकीत निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेल्यांचे निवडून येण्याचे मेरिट आणि खर्चाची कुवत पाहिली जाते. यामुळे दोन्हीकडील धनदांडग्या उमेदवारांच्या विरोधात लहान पक्षातील नेते, कार्यकर्ते हतबल ठरत आहेत.
जागावाटपात प्रवाहातील मुख्य पक्षांचीच चर्चा
निवडणुकीचा बिगुल वाजण्याची शक्यता आहे. प्रशासकीय पातळीवर काम सुरु आहे. तर पक्षांकडून जागावाटपात संदर्भात बैठका होत आहेत. जिल्ह्यात विधानसभेच्या दहा जागा असून या सर्व जागासंदर्भात अजून तरी महायुतीमधील भाजप, शिंदे यांची शिवसेना, अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामधील जागा वाटपावर लक्ष केंद्रित आहे. महाविकास आघाडीतही काँग्रेस, शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस, ठाकरे यांची शिवसेना यांच्यामध्ये चर्चा होत आहे. त्यांच्याबरोबर असलेल्या लहान पक्षांना जागा द्यायची की नाही, याची सुध्दा चर्चा होत नाही.