महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखने घेतली श्रीमंत शाहू छत्रपतींची भेट!
गतवर्षी हुलकावणी देणाऱ्या महाराष्ट्र केसरी गदेला यावर्षी गवसणी घालून कोल्हापूरच्या गंगावेश तालमीचा पैलवान सिकंदर शेख याने कोल्हापूरकरांसहीत महाराष्ट्रातील तमाम कुस्तीप्रेमींची मने जिंकली. मुळचा सोलापूरचा असला तरी त्याच्या या विजयाने कोल्हापूरकरांची छाती अभिमानाने फुलली आहे. शुक्रवारी महाराष्ट्र केसरीचा किताब जिंकल्यानंतर सिकंदर शेख याने कोल्हापूरला भेट देऊन श्रीमंत शाहू छत्रपती यांची भेट घेऊन अभिर्वाद घेतले.
महाराष्ट्र केसरीची गदा पटकावल्यानंतर शुक्रवारी रात्री सिकंदर शेख कोल्हापूरात आला. गंगावेश तालमीत त्यावेळी त्याचे जल्लोषी स्वागत करण्यात आले. आज दुसऱ्या दिवशी महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखने कुस्तीला राजाश्रय देणाऱ्या कोल्हापूरच्या राजघराण्याला भेट दिली. कोल्हापूरचे श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांची भेट घेऊन त्यांचे अशिवार्द घेतले. यावेळी श्रीमंत शाहू छत्रपती आणि आमदार मालोजीराजे छत्रपती यांनी सिकंदर शेख याचे कौतुक करून त्याला 1 लाख रुपयाचे बक्षीस दिले. यावेळी माजी आमदार मालोजीराजे छत्रपती, यांच्यासह गंगावेश तालमीचे वस्ताद विश्वास हारूगले तसेच गंगावेश तालमीचे अनेक पैलवान हजर होते.