कुस्तीगीर संघाची महाराष्ट्र केसरी स्पर्धा नगरमध्ये आजपासून
फिरोज मुलाणी/ औंध
अहिल्यानगरला आज बुधवारपासून महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या मान्यतेने 67 व्या राज्य अजिंक्यपद महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेला सुऊवात होणार आहे.
आज पासून नगरच्या वाडीया पार्क मैदानात महाराष्ट्र केसरी कुस्त्यांचा थरार रंगणार आहे.आ.संग्राम जगताप यांनी स्पर्धेचे आयोजन केले आहे.बुधवारी सकाळी 57 आणि 86 किलो वजन गटातील लढतीने स्पर्धेला सुऊवात होणार आहे. सायंकाळी सहा वाजता उद्घाटन होणार आहे.या स्पर्धेत कुस्तीगीर संघाशी सलग्न 36 जिल्हे, सहा महापालिका असे 42 संघ सहभागी होणार आहेत.कुस्तीगीर,पंच प्रशिक्षक पदाधिकारी उपस्थित राहणार असल्याने कुस्तीचा कुंभमेळा भरणार आहे
गादी आणि माती गटात
57, 61, 65, 70, 74, 79, 86, 92, 97 किलो असे वजनगट आणि महाराष्ट्र केसरी खुल्या गटात स्पर्धा होणार आहे. तरी देखील सर्वांचे लक्ष महाराष्ट्र केसरी गटाकडे असते. राज्यातील अव्वल दर्जाचे मल्ल खुल्या गटातून महाराष्ट्र केसरी मानाच्या किताबासाठी परस्परांशी भिडतात. त्यामुळे महाराष्ट्र केसरी कोण होणार, याची उत्सुकता तमाम कुस्ती शौकीनांना लागली आहे. महाराष्ट्र केसरी गटांसाठी यावर्षी खुल्या गटातील मल्लांना वाईल्ड कार्डद्वारे प्रवेश देण्यात येणार असल्याचे कुस्तीगीर संघाच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे स्पर्धेत महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख, शिवराज राक्षे, माऊली जमदाडे, महेंद्र गायकवाड, हर्षवर्धन सदगीर, बालारफिक शेख, पृथ्वीराज मोहोळ, वेताळ शेळके, माऊली कोकाटे आदी दिग्गज मल्ल स्पर्धेचे आकर्षण असणार आहेत. या स्पर्धेत अव्वल दर्जाचे कोण मल्ल उतरणार हे आज बुधवारी भाग्यपत्रिकेवऊन स्पष्ट होईल.
स्पर्धेच्या उद्घाटन आणि बक्षीस वितरण समारंभासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे, भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष संजय सिंगल, कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष रामदास तडस, कार्याध्यक्ष संदीप भोंडवे, सरचिटणीस हिंदकेसरी योगेश दोडके आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
कुस्तीगीर परिषदेने दंड थोपटले.
महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेने देखील महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा आयोजनासाठी दंड थोपटले आहेत. स्पर्धेचे स्थळ आणि कार्यक्रम लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. फेब्रुवारी महिन्यात स्पर्धा होणार असल्याची चर्चा कुस्ती क्षेत्रात सुरू आहे त्यामुळे ही स्पर्धा कोठे होणार हे लवकरच स्पष्ट होईल, असा विश्वास कुस्तीगीर परिषदेच्या वतीने व्यक्त करण्यात आला आहे.