For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

महाराष्ट्र एकीकरण समिती तळागाळापर्यंत पोहोचविणार

11:33 AM Mar 11, 2024 IST | Tarun Bharat Portal
महाराष्ट्र एकीकरण समिती तळागाळापर्यंत पोहोचविणार
Advertisement

विस्तारित कार्यकारिणीच्या बैठकीत सूर

Advertisement

बेळगाव : शहर महाराष्ट्र एकीकरण समितीची बेळगाव उत्तर व दक्षिण मतदारसंघनिहाय कार्यकारिणीचा विस्तार करण्यात आला. यामुळे जुन्या जाणत्या नेत्यांसोबत नव्या दमाच्या कार्यकर्त्यांचा नवीन कार्यकारिणीत समावेश करण्यात आला आहे. तळागाळापर्यंत म. ए. समिती पोहोचविण्यासाठी नवीन कार्यकारिणी प्रयत्न करील, असा विश्वास रविवारी आयोजित बैठकीत पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. शहर म. ए. समितीच्या विस्तारित कार्यकारिणीची बैठक रविवारी मराठा मंदिर येथे पार पडली. या बैठकीमध्ये प्रत्येक विभागातील कार्यकर्त्यांनी आपले विचार मांडून अधिकाधिक युवा वर्गाला कशा पद्धतीने प्रतिनिधीत्व देता येईल, यासंदर्भात चर्चा करण्यात आली. कर्नाटक सरकारकडून कन्नड सक्तीचे धोरण राबविले जात असल्याने तितक्याच ताकदीने लढा उभा करणे गरजेचे असल्याचे मत कार्यकर्त्यांनी व्यक्त केले. मदन बामणे यांनी प्रास्ताविक करून कार्यकारिणीच्या विस्ताराबाबत माहिती दिली.

वॉर्डनिहाय कार्यकारिणीची गरज

Advertisement

सध्या करण्यात आलेली जंबो कार्यकारिणीमध्ये विभागामध्ये मोजक्याच कार्यकर्त्यांना संधी देण्यात आली आहे. त्यामुळे भविष्यात तळागाळापर्यंत म. ए. समिती पोहोचवायची असेल तर वॉर्डनिहाय कार्यकारिणीशिवाय पर्याय नाही. त्यामुळे प्रत्येक विभागात वॉर्डनिहाय कार्यकारिणी तयार करण्याची मागणी केली. त्याचबरोबर ‘जय महाराष्ट्र’ म्हणण्यास विरोध दर्शविलेल्या उद्योजकाचा बैठकीत निषेध करण्यात आला. ‘एक व्यक्ती एक पद’ या प्रमाणेच समितीची यापुढे पुनर्रचना करण्याबाबत शिक्कामोर्तब करण्यात आला.

प्रत्येक कार्यकर्ता हा नेताच

म. ए. समिती ही सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी निर्माण झालेली संघटना आहे. या संघटनेतील पदाधिकारी केवळ पदाच्या अपेक्षेने याठिकाणी येत नाहीत. प्रत्येक कार्यकर्ता हा नेताच असल्याने प्रत्येकाने आपण निष्ठेने म. ए. समितीचे कार्य केले पाहिजे. प्रत्येकाला कार्यकारिणीमध्ये सामावून घेण्याचा प्रयत्न केला जात असून ज्यांची नावे अद्याप या कार्यकारिणीवर नाहीत. त्यांची नावे कार्यकारिणीमध्ये समाविष्ट करण्यात यावी, अशी मागणी नितीन खन्नूकर यांनी केली. यावेळी रणजीत चव्हाण-पाटील, नरेश पाटील, महादेव पाटील, सुनील देसूरकर, नगरसेवक रवी साळुंखे, अॅङ अमर येळ्ळूरकर, सागर पाटील, श्रीकांत कदम, अंकूश केसरकर, रणजीत हावळाण्णाचे, ज्ञानेश्वर मण्णूरकर, राजू बिर्जे, सतीश पाटील, प्रमोद पाटील, मनोहर हलगेकर, प्रशांत भातकांडे, सुनील बोकडे, किरण परब, रमाकांत कोंडुस्कर, संजय शिंदे, मोतेश बार्देशकर, किरण धामणेकर, पियुष हावळ, गणेश द•ाrकर, श्रीकांत मांडेकर यांच्यासह इतर कार्यकर्ते व नेत्यांनी आपली मते व्यक्त केली.

कन्नड सक्ती विरोधात रस्त्यावर उतरावे

काही मोजक्याच कानडी संघटनांच्या म्होरक्यांकडून बेळगावमध्ये मराठी व्यापाऱ्यांना वेठीस धरले जात आहे. इच्छा नसतानाही केवळ सरकारी दबावामुळे कन्नड पाट्या कराव्या लागत आहेत. या दादागिरी विरोधात महाराष्ट्र एकीकरण समितीने आता रस्त्यावर उतरण्याची वेळ आली आहे. म. ए. समितीने एखादे आंदोलन जाहीर करून आपलीही ताकद दाखवून द्यावी, अशी इच्छा युवा कार्यकर्त्यांनी बैठकीत मांडली.

Advertisement
Tags :

.