Monsoon Session 2025: पावसाळी अधिवेशन गाजले आरोप -प्रत्यारोपांनी, राडा संस्कृतीमुळे सरकारची कोंडी
शिवसेना आणि राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणाचा पोत बिघडला
By : प्रवीण काळे
मुंबई : महाराष्ट्राच्या सध्याच्या राजकारणात शिस्त, जबाबदारी आणि सभ्यता या शब्दांना स्थान उरलेलं दिसत नाही. 2022 नंतर महाराष्ट्रात शिवसेना आणि राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणाचा पोत बिघडला. तो दिवसेंदिवस बिघडतच चालला आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन असो, की पावसाळी अधिवेशन.
जनतेच्या मूलभूत प्रश्नांवर बोलण्याऐवजी गोंधळ घालण्याची वफत्ती सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या आमदारांची ओळख बनत चालली आहे. आमदार आणि मंत्र्यांनी एखाद्या विषयावर बाहेर आक्रमक होणे स्वाभाविक आहे. पण विधीमंडळातील सभागृहात तरी किमान आमदार आणि मंत्र्यांनी वागताना भान ठेवावे एवढीच जनतेची अपेक्षा आहे.
ज्या विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन मुंबईत सुरू आहे. आजपासून तिसऱ्या आणि शेवटच्या आठवड्याच्या कामकाजाला सुरूवात होणार आहे. दोन आठवड्यातील कामकाजाचा आढावा घेतला, तर जनतेच्या प्रश्नापेक्षा अधिवेशन गाजले ते व्यक्तीगत आरोप -प्रत्यारोपांनी.
सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या आमदारांनी विधान भवनासारख्या पवित्र स्थळाला केवळ गोंधळ, राडा आणि असंसदीय वर्तनाचा आखाडा केला आहे. पहिल्याच आठवड्यात विधानसभेचे माजी अध्यक्ष नाना पटोले यांचे एका दिवसासाठी निलंबन झाले. माजी विधानसभा अध्यक्षांचे निलंबन व्हावे ही लोकशाहीच्या दृष्टीने दुर्दैवाचीच गोष्ट म्हणावी लागेल.
पाशवी बहुमत मिळालेल्या सत्ताधाऱ्यांकडे संख्याबळ आहे, अधिकार आहेत. पण कामकाज चालवताना ना शिस्त आहे, ना जबाबदारी. लक्षवेधीला उत्तर द्यायला मंत्री नसतात. तर पुरवणी मागण्यांवरील चर्चेवेळीही त्या त्या विभागाचे सचिव उपस्थित नसतात.
हा मुद्दा सरकारला वेळोवेळी घरचा आहेर देणारे सत्ताधारी पक्षाचे विरोधीपक्ष नेते सुधीर मुनगंटीवार यांनी उपस्थित केला. विधानसभा अध्यक्ष विरोधी आमदारांना बोलू देत नाहीत, पण विरोधी पक्षाच्या वतीने सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनाच बोलू देत असल्याचे विरोधक गमतीने बोलतात.
अधिवेशनात कामकाज नियमानुसार होत नाही. त्यातच स्वत:च्या अपयशावर पांघरूण घालण्यासाठी किंवा मूलभूत प्रश्नांवर उत्तर द्यायचं टाळण्यासाठी काही आमदार मुद्दाम वाद निर्माण करत आहेत. सवंग लोकप्रियतेसाठी बेताल वक्तव्ये कऊन प्रसिध्दी मिळविण्याची स्पर्धा काही वर्षांपासून आमदारांमध्ये लागली आहे.
अधिवेशनाचा दुसरा आठवडा गाजला तो शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी कॅन्टीनमध्ये केलेला राडा, मंत्री संजय शिरसाट यांचा पैशाची बॅग भरल्याचा व्हिडिओ, उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत असताना त्यांच्या मागे भरत गोगावले तंबाखूजन्य पदार्थ खाताना दिसले.
तिकडे विधान परिषदेत तर मंत्री शंभूराज देसाई यांनी अनिल परब यांना ’बाहेर भेट दाखवतो,’ अशी धमकीच दिली. त्यामुळे शिंदे गटाचे आमदार माध्यमांमध्ये चर्चेत येतात, पण कामकाजाच्या बाबतीत त्यांची कामगिरी शून्य असते, असेच दिसले. ठाकरेंच्या शिवसेनेत उध्दव ठाकरेंचा पक्षावर वचक होता.
आदित्य ठाकरे, मिलिंद नार्वेकर आणि मुख्य प्रतोद सुनील प्रभूंसारख्या मंडळींचे या आमदारांवर नियंत्रण होते. इथे प्रत्येक आमदाराला असे वाटते, की आपण पाठिंबा दिला म्हणूनच एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. काही वादग्रस्त घडले, की आम्हीच खरे शिवसैनिक आहोत.
आमची हीच स्टाईल असल्याचे हे आमदार सांगतात. पण आता त्यांच्या याच स्टाईलने भाजपची डोकेदुखी वाढली आहे. तिकडे अजित पवारांचे पक्षावर कंट्रोल आहे. दादांचे आमदार आणि मंत्री दादांना वचकून असतात. कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांबाबत केलेल्या अपमानास्पद वक्तव्यानंतर दादांनी कोकाटेंना इशारा दिला होता.
अजित पवारांचा गट म्हणजे, ‘सांगितले तर ऐकणारे, आणि टार्गेटवर काम करणारे‘ नेते. त्यामुळेच दिल्लीतले भाजपचे नेते अजितदादांशी अधिक खुलेपणाने चर्चा करतात. तर भाजपला शिंदे गट हा आता एक ‘राजकीय गोंधळाचा‘ भाग वाटतोय. त्यामुळे शिंदे गटाला अजून गोंधळात टाकण्याचे काम भाजपवाले करतात.
‘लाडकी बहीण’ योजनेसाठी शिरसाट यांच्या खात्याचा निधी वळवल्याने शिरसाट यांनी नाराजी व्यक्त केली. त्यामुळेच शिरसाट यांच्या बेडरूममधून नोटांचा व्हिडिओ बाहेर आल्याचे बोलले जात आहे. याच ‘लाडकी बहीण’ योजनेसाठी आदिवासी विकास खात्याचा निधीही वळता केला गेला.
त्यानंतर आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी जो शहाणपणा दाखवला, तो शिरसाट यांना दाखवता आला नाही. त्यामुळे शिरसाट यांच्या माध्यमातून इतर आमदार आ ण मं त्र्यांना देखील भाजपने व्हिडिओच्या माध्यमातून इशारा दिला आहे.
भरत गोगावले यांचा टॉवेलवर पूजा करतानाचा व्हिडिओ, संजय गायकवाड यांनी वॅ ढन्टीन कर्मचाऱ्याला केलेली मारहाण, तसेच दक्षिण भारतीय लोकांबद्दल केलेले वादग्रस्त वक्तव्य यामुळे बहुमत असलेल्या सरकारचीही कोंडी होताना दिसत आहे.
वैयक्तिक आरोप आणि घोषणाबाजी
विधीमंडळ परीसरात जनतेच्या प्रश्नांपेक्षा वै य क्तक टीका टिप्पणी करण्याचे प्रमाण वाढले आहे. भाजपचे मंत्री असलेल्या नीतेश राणे यांनी आदित्य ठाकरेंच्या आवाजाची नक्कल करणे, जितेंद्र आव्हाड यांनी ’मंगळसूत्र चोर’ म्हणून गोपीचंद पडळकर विरोधात घोषणा देणे, आदित्य ठाकरे निलम गोऱ्हे जात असताना ’मर्सिडीज, खोके’ म्हणून ओरडणे, तर आमदार वरूण सरदेसाई यांनी गोऱ्हे यांच्या अंगरक्षकाने धक्का दिल्यावऊन गोंधळ करणे... या सगळ्यांचा विचार करता, जनतेच्या प्रश्नांबाबत हे आमदार गंभीर नसल्याचे अधिवेशनातील त्यांच्या वर्तनावऊन तरी दिसत आहे.
विधानसभेत विरोधी पक्षनेता नाही
महायुतीचे सरकारचे हे तिसरे अधिवेशन. मात्र या अधिवेशनातही विधानसभेत विरोधी पक्षनेता होईल असे वाटत नाही. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांना विरोधकांनी विधानसभेत विरोधी पक्षनेता सरकार नेमत नसल्याचे सांगितले. सत्ताधारी लोकशाहीचा गळा घोटत असल्याची तक्रार केली.
बहुमत असूनही आमदार आणि मंत्र्यांमुळे सरकारची अडचण
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी धनंजय मुंडे यांचा सरकारला राजीनामा घ्यावा लागला होता. तर मंत्री माणिकराव कोकाटे, जयकुमार गोरे यांच्यावरील आरोपाने सरकारची कोंडी झाली होती. आता पावसाळी अधिवेशनातही शिंदे गटातील आमदार आणि मंत्र्यांच्या बेताल वर्तनामुळे सरकारची कोंडी होताना दिसत आहे.
संजय गायकवाड यांच्यावर कॅन्टीन कर्मचाऱ्याला मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. तर मंत्री असलेल्या शंभूराज देसाई यांनी थेट सभागृहातच आमदाराला ’बाहेर भेट, दाखवतो’ अशी धमकी दिली आहे.