महाराणी येसूबाईंचे स्मारक राज्य संरक्षित
सातारा :
छत्रपती शिवाजी महाराज यांचे नातू आणि छत्रपती संभाजी महाराज यांचे सुपुत्र छत्रपती शाहू महाराज यांनी सातारा नगरीची स्थापना केली. त्याच छ. शाहू महाराज यांच्या मातोश्री महाराणी येसूबाई यांची समाधी राज्य सरकारने राज्य संरक्षित स्मारक केले आहे. त्याची अंतिम अधिसूचना बुधवार दि. 8 रोजी काढण्यात आली. ही अधिसूचना खासदार श्री. छ. उदयनराजे भोसले, सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री. छ. शिवेंद्रराजे भोसले यांच्यामुळे निघाली असून नागपूरचे आमदार प्रवीण दटके यांनीही प्रयत्न केले आहेत, अशी माहिती माजी उपनगराध्यक्ष तथा श्रीमंत छ महाराणी येसूबाई फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सुहास राजेशिर्के यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.
राजेशिर्के यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, ही साताऱ्याची भुमी ऐतिहासिक आहे. या भूमीला एक वेगळा इतिहास आहे. इतिहासात या भूमीचे वेगळे महत्व अधोरेखित झाले आहे. छ. शिवाजी महाराज यांच्या स्नुषा महाराणी येसूबाई यांनी छ. संभाजी महाराजांच्यानंतर 29 वर्ष कैदेत काढले. त्यांनी छ. शाहू महाराज यांच्यावर धर्मसंस्कार केले. छ. येसूबाई यांचे सातारच्या भूमीत 1729 साली आगमन झाले. छ. शाहू महाराजांनी मराठा साम्राज्याचा विस्तार केला. महाराणी येसूबाई यांच्या अखेरपर्यत त्या साताऱ्यात होत्या. त्यांची समाधी ही संगम माहुली येथे बांधली. याची माहिती मिळवून त्याप्रमाणे आम्ही इतिहास संशोधकाना घेऊन ती जागा शोधून काढली. महाराणी येसूबाई यांच्या स्मारकाची स्वच्छता करण्यात आली. त्याकरिता राज्य शासनाने हे स्मारक राज्य संरक्षित व्हावे यासाठी खासदार श्री. छ. उदयनराजे आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री. छ. शिवेंद्रराजे यांच्याकडे आमच्यासह शिवभक्तांनी मागणी केली होती. तसेच नागपूरचे आमदार प्रवीण दटके यांनी ही याबाबत पाठपुरावा केला होता. त्यामुळे आज बुधवार दि. 8 रोजी राज्य शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने अंतिम अधिसूचना काढली आहे. त्यामुळे आम्ही खासदार श्री. छ. उदयनराजे, मंत्री श्री. शिवेंद्रराजे आणि आमदार प्रवीण दटके यांच आभार मानतो, असे त्यांनी म्हटले आहे.
- पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांचेही प्रयत्न
पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्या विभागाने अधिसूचना काढलेली असून त्यांचा ही यामध्ये प्रयत्न आहे. त्यांनी पदभार घेतल्यापासून सातारा जिह्यातील जे जे करता येईल त्याकरिता त्यानी लक्ष घातले आहे. त्यांच्या विभागाच्या उपसचिव नंदा राऊत यांनी ही अधिसूचना काढली आहे.
- किती आहे समाधीचे क्षेत्रफळ
महाराणी येसूबाई यांच्या समाधीचे क्षेत्रफळ 46.45 चौरस मीटर आहे. पूर्व बाजूला आनंदराव बाळू भासले यांचे घर, पश्चिम बाजूला संगममाहुली गावठाण, उत्तर बाजूला आनंदराव बाळू भासले यांची मोकळी जागा तर दक्षिण बाजूला कृष्णामाई रथ यात्रा शेड आहे.