For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अधिवेशनाला प्रत्युत्तर देत महामेळावा करणारच

12:53 PM Dec 01, 2025 IST | Tarun Bharat Portal
अधिवेशनाला प्रत्युत्तर देत महामेळावा करणारच
Advertisement

शहर म. ए. समितीचा निर्धार : खासदारांच्या वक्तव्याचा निषेध

Advertisement

बेळगाव : मराठी भाषिकांना डीवचण्यासाठी कर्नाटक सरकारने बेळगावमध्ये सुवर्ण विधानसौध बांधून या ठिकाणी अधिवेशन भरवण्यास सुरुवात केली आहे. याला प्रत्युत्तर म्हणून म. ए. समितीकडून महामेळावा भरविला जातो. यावर्षी 8 डिसेंबर रोजी महामेळावा होणार असून यावेळी मोठ्या संख्येने मराठी भाषिक उपस्थित राहून तो यशस्वी करण्याचा निर्धार शहर म. ए. समितीच्या बैठकीत घेण्यात आला. रविवारी रामलिंग खिंड गल्ली येथील रंगुबाई भोसले पॅलेस येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीच्या अध्यक्षस्थानी सरचिटणीस मालोजी अष्टेकर होते. महामेळाव्यासाठी पोलीस प्रशासनाकडे परवानगीचे पत्र यापूर्वीच देण्यात आले आहे. तसेच त्यांना जागाही सुचविण्यात आली आहे. आता पोलीस प्रशासनाकडून परवानगी घेणे बाकी आहे. परवानगी दिली नाही तरी महामेळावा यशस्वी करण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी केला आहे.

खासदार जगदीश शेट्टर यांच्या वक्तव्याचा निषेध 

Advertisement

सीमा प्रश्नावर तोंडसुख घेत कन्नड भाषिकांना खूश करण्याचा प्रयत्न खासदार जगदीश शेट्टर यांच्याकडून वारंवार होत असतो. दोन दिवसांपूर्वी बेळगावमध्ये झालेल्या एका पत्रकार परिषदेत त्यांनी पुन्हा महाजन अहवालाचे तुणतुणे वाजवले. या वक्तव्याचा म. ए. समितीने निषेध करत खासदारांनी सीमाप्रश्नी महाजन अहवाल अंतिम आहे, असे संसदेत मांडावे असा सल्ला दिला. यावेळी शहर म. ए. समितीचे खजिनदार प्रकाश मरगाळे, माजी नगरसेवक रणजीत चव्हाण-पाटील, रमेश पावले, बाबू कोले, विनोद आंबेवडेकर, अंकुश केसरकर, श्रीकांत कदम, सागर पाटील, रणजीत हावळानाचे, शिवराज पाटील यांच्यासह इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दुकानांवर मराठी असेल तरच व्यापार करा 

मराठीची कावीळ असलेल्या कर्नाटक सरकारकडून शहरातील आस्थापनांवरील मराठी फलक हटविण्यात आले. परंतु दुकानांवरील फलकांमध्ये 60 टक्के कन्नड व 40 टक्के भागांमध्ये इतर भाषेचा उल्लेख केला जाऊ शकतो. त्यामुळे उर्वरित जागेमध्ये व्यापाऱ्यांनी मराठीत उल्लेख करावा. यापुढे ज्या दुकानांवर लहान का होईना मराठीत उल्लेख नसेल तर अशा दुकानांमध्ये व्यापार केला जाऊ नये, असा इशारा देण्यात आला आहे.

Advertisement
Tags :

.