कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी महामेळावा

12:55 PM Nov 10, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

धर्मवीर संभाजी चौकात आयोजन : मध्यवर्ती म. ए. समितीच्या बैठकीत निर्णय : उपस्थित राहण्याचे आवाहन

Advertisement

बेळगाव : कर्नाटक सरकारच्या विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन 8 डिसेंबरला हलगा येथील  सुवर्ण विधानसौधमध्ये होऊ घातले आहे. या अधिवेशनाला विरोध दर्शविण्यासाठी त्याचदिवशी म्हणजेच 8 डिसेंबरला धर्मवीर संभाजी चौकात मराठी भाषिकांचा  मेळावा भरविला जाईल. त्यामुळे मराठी भाषिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून महामेळावा यशस्वी करावा, असे आवाहन मध्यवर्ती म. ए. समितीच्या बैठकीत करण्यात आले. रविवार दि. 9 रोजी गोवावेस येथील मराठा मंदिरमध्ये दुपारी 3.30 वाजता मध्यवर्ती म. ए. समितीची बैठक पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी कार्याध्यक्ष व माजी आमदार मनोहर किणेकर होते. रणजीत चव्हाण-पाटील यांनी सुरुवातीला उपस्थितांचे स्वागत करून दिवंगत म. ए. समितीच्या कार्यकर्त्यांना श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर सरचिटणीस मालोजी अष्टेकर यांनी 14 ऑक्टोबर रोजी झालेल्या म. ए. समितीच्या बैठकीत पारीत करण्यात आलेले ठराव वाचून दाखविले.

Advertisement

कार्याध्यक्ष व माजी आमदार मनोहर किणेकर म्हणाले, 2006 पासून कर्नाटक सरकार बेळगावात हिवाळी अधिवेशन भरवत आहे. तेव्हापासून त्याला विरोध म्हणून समितीने महामेळावे भरविले आहेत. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून परवानगी देणे टाळले जात आहे. गतवर्षी संभाजी चौकात आयोजित केलेल्या मेळाव्यामध्ये सामील होण्यासाठी आलेल्यांना अटक करण्यात आली. परवानगीची तमा कोणीही बाळगू नये. सीमाप्रश्नाचा खटला 2004 मध्ये सुप्रिम कोर्टात दाखल करण्यात आला आहे. सीमाभागाचा वाद न्यायप्रविष्ठ असल्याने खरे तर बेळगावमधील कर्नाटक सरकारच्या या अधिवेशनाला महाराष्ट्र सरकारने विरोध केला पाहिजे. 8 डिसेंबरच्या महामेळाव्यातून आम्ही महाराष्ट्रात जाण्यासाठी आजही तितकेच उत्सुक  आहोत, हे दाखवून द्यावे. मेळाव्यादिवशी मराठी भाषिकांनी संभाजी चौकात मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. एखाद्या वेळी पोलिसांनी अटक केल्यास त्यांची वाहने   कमी पडली पाहिजेत. मेळाव्याला महिन्याचा कालावधी असल्याने घटक समित्यांनी बैठका घेऊन जागृती करावी, असे आवाहन त्यांनी केले.

खजिनदार प्रकाश मरगाळे म्हणाले, नुकतेच कोल्हापूर येथील एका खासगी कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घडवून द्यावी, अशी मागणी माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्याकडे करण्यात आली. पण, मुख्यमंत्री उपलब्ध होऊ शकले नाहीत. उच्चाधिकार समितीची बैठक बोलाविण्यात यावी, या संदर्भात त्यांच्याशी चर्चा केली जाणार होती. मध्यवर्ती ही शिखर समिती असताना काहीजण मनमानी पद्धतीने महाराष्ट्रातील नेतेमंडळींना निवेदन देत आहेत. असे प्रकार करायचे असल्यास मध्यवर्ती कशाला हवी? पुन्हा पुन्हा याबाबत सांगायची वेळ येऊ नये. सर्वांनी मध्यवर्तीच्या भूमिकेशी बांधिल राहावे. सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी व येथील आंदोलने यशस्वी व्हावीत, यासाठी ताकद लावावी. पण, नको त्या कामात काहींना उत्सुकता असते. सीमाप्रश्न सध्या योग्य टप्प्यात आहे. त्यामुळे 8 डिसेंबरचा महामेळावा सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून यशस्वी करावा, असे ते म्हणाले.

सरचिटणीस मालोजी अष्टेकर म्हणाले, अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मेळावा घेणे आवश्यक आहे. पोलिसांचे वर्तन अत्यंत वेगळे आहे. आम्ही काहीही केले तरी त्यांच्याकडून कारवाई केली जाते. मराठी भाषिकांनी उपस्थित राहून मेळावा यशस्वी करावा. अॅड. एम. जी. पाटील म्हणाले, हिंडलगा येथील हुतात्मा स्मारक आवारात उभारल्या जाणाऱ्या हुतात्मा स्मारकाचे काम पूर्ण व्हावे यासाठी संबंधित जमिनीच्या वारसदारांचा नवीन वारसा करण्याचे काम सुरू आहे. खासगी आस्थापनाबाहेर ज्या प्रमाणे 60 टक्के जागेत कन्नड तर उर्वरित 40 टक्के जागेत अन्य भाषेतील फलक उभारण्यात यावेत, असा फतवा काढण्यात आला आहे. त्याचप्रमाणे सरकारी कार्यालयाबाहेरील फलकांवरही हा नियम लागू करावा, यासाठी वकिलांच्या कमिटीबरोबर चर्चा करून पुढील रणनिती ठरविली जाईल व यापुढच्या बैठकीला उर्वरित वकिलांनाही बोलाविण्यात येईल. परवानगी मिळो अथवा न मिळो महामेळावा यशस्वी करू, असे ते म्हणाले.

जि. पं. माजी सदस्य रामचंद्र मोदगेकर म्हणाले, बेळगावात पहिल्यांदा केएलईमध्ये अधिवेशन घेण्यात आले. यंदा संभाजी चौकात किंवा मराठा मंदिरमध्ये महामेळावा घ्यावा. व्यापाऱ्यांच्यावतीने वकिलांनी अधिकाऱ्यांवर खटले दाखल करावेत. विशेषकरून मनमा आयुक्त शुभा बी. यांच्यावर दावा दाखल करून त्यांना न्यायालयात खेचा, असे मत त्यांनी व्यक्त केले. तालुका म. ए. समितीचे कार्याध्यक्ष आर. एम. चौगुले म्हणाले, गेल्या वर्षी धर्मवीर संभाजी चौकात आयोजित केलेल्या महामेळाव्याला उपस्थित राहण्यासाठी गेलेल्यांना पोलिसांनी अटक केली. त्यामुळे यंदा सरदार्स मैदानावर जाहीर सभा घ्यावी. एखादे वेळी पोलिसांनी अटक करण्याचा प्रयत्न केल्यास जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन देऊ, अशा प्रकारे प्रशासनावर नमते आणणे गरजेचे आहे. मराठी शाळांमध्ये कन्नड माध्यमाचे वर्ग भरविण्याचा सरकारचा प्रयत्न सुरू आहे. त्याला विरोध करणे काळाची गरज आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. यावेळी पियुष हावळ, रामचंद्र मोदगेकर, रावजी पाटील, लक्ष्मण पाटील, मुरलीधर पाटील, राजू मरवे, डी. बी. देसाई, आर. एस. देसाई, आबासाहेब दळवी, मोनाप्पा पाटील, बी. डी. मोहनगेकर, जयराम देसाई, अनिल पाटील, मनोहर हुंद्रे, मऱ्याप्पा पाटील, वसंत नवलकर, नेताजी जाधव आदी उपस्थित होते.

उद्या जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्तांची भेट घेणार

8 डिसेंबर रोजी मराठी भाषिकांच्या महामेळाव्याला धर्मवीर संभाजी चौकात परवानगी देण्यात यावी, तसेच करवेच्या कार्यकर्त्यांकडून सध्या बेळगावात धिंगाणा घातला जात आहे. त्यामुळे त्यांचा बंदोबस्त करावा, या मागणीसाठी मंगळवार दि. 11 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी व पोलीस आयुक्तांना मध्यवर्ती म. ए. समितीच्यावतीने भेट घेऊन निवेदन दिले जाणार आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article