महालक्ष्मी रथ जोडणीचे काम सुरू नंदगडात यात्रेची पूर्वतयारी जोरात
वार्ताहर/हलशी
नंदगड ग्रामदेवता श्री लक्ष्मीदेवीची यात्रा फेब्रुवारी 2025 मध्ये होणार आहे. महालक्ष्मी यात्रोत्सव काळात लागणाऱ्या रथाच्या उभारणीचे काम यात्रा कमिटीकडून हाती घेण्यात आले असून रथजोडणीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. गावातील नागरिक अति उत्साहात जत्रेची तयारी करण्यात व्यस्त झाले आहेत. घरांची दुरुस्ती, रंगरंगोटीची कामे तसेच नव्या घरांचे काम संपवण्याच्या घाईत नंदगडवासीय दंग झाले आहेत. बाजूच्या सर्वच गावात यात्रेच्या उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे. शासनाकडूनही रस्ता व गटारींची कामे हाती घेण्यात आली आहेत. त्यातच भातकापणी सुगीचे दिवस असल्याकारणाने शेतकरी वर्ग आपल्या दैनंदिन कामात व्यस्त राहून अपूर्ण कामे पूर्ण करण्याच्या प्रयत्नात आहेत.
गेले सहा महिने गावामध्ये यात्रेनिमित्त विविध धार्मिक विधी पार पाडण्यात आले. या धार्मिक विधीना जवळजवळ यात्रेचे स्वरूप आले होते. यात्रेपूर्वीच असे मोठे कार्यक्रम होत आहेत. तर फेब्रुवारी महिन्यामध्ये होणाऱ्या यात्रा किती मोठ्या व भव्य प्रमाणात होणार? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यानुसार जत्रेची तयारी नागरिक अति उत्साहात करत आहेत. तसेच या धार्मिक विधीचे तन-मन धनाने कार्य सुरू आहे. तसेच श्री महालक्ष्मी भिजत घालणे धार्मिक कार्यक्रम झाल्यानंतर ग्रामदेवता श्री लक्ष्मीदेवी मंदिराच्या नूतनीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. तसेच या कामाला भाविकांनी आर्थिक तसेच श्रमदानाच्या माध्यमातून सहकार्य केले आहे.
यात्रेमध्ये मनोरंजन कार्यक्रमाची तयारी करण्यासाठी गावातील हौशी तरुणांकडून नाटकांची तयारी जोरात सुरू आहे. ग्रामदेवता महालक्ष्मी यात्रा कमिटीच्यावतीने अनेक यात्रेसंबंधित कार्याना पूर्ण करण्यासाठी मोजकेच दिवस असल्याने यात्रा कमिटीने यात्रासंबंधीच्या कामांना अंतिम स्वरुप देण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. रविवारपासून यात्रा कमिटीचे अध्यक्ष सुभाष पाटील व रथयात्रा कमिटीचे अध्यक्ष गजानन चव्हाण यांनी महालक्ष्मी रथ जोडणीच्या कामाला जोरदार सुरुवात केले आहे.