सर्व्हिस मार्गावर कचरा, दुर्गंधी अन् धूर
शहराच्या सौंदर्याला बाधा : समस्या गंभीर : पर्यावरण प्रेमीतून नाराजी, वाहतुकीला अडथळा
बेळगाव : राष्ट्रीय महामार्गाशेजारी असलेल्या सर्व्हिस रोडवर कचरा अन् पेटलेल्या धुराची समस्या गंभीर बनू लागली आहे. शहराच्या प्रवेशद्वारावरच दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे शहराच्या सौंदर्याला बाधा गेली आहे. राष्ट्रीय महामार्गावर आणि शेजारी असलेल्या सर्व्हिस रोडवर मोठ्या प्रमाणात कचरा टाकण्यात आला आहे. यामध्ये प्लास्टिक, थर्मोकॉल, कागद, नारळ, आणि इतर खाद्यपदार्थांचा समावेश आहे. त्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. वाहनधारक आणि प्रवाशांना दुर्गंधी घेऊनच प्रवेश करावा लागत आहे. एकीकडे स्मार्ट सिटीच्या गोष्टी होत आहेत. तर दुसरीकडे शहर आणि महामार्गावरील कचऱ्याचा प्रश्न गंभीर स्वरुप घेऊ लागला आहे.
धुरामुळे वाहतुकीला अडथळा
राष्ट्रीय महामार्गाच्या सौंदर्याबरोबर शहराच्या सौंदर्यालाही धोका निर्माण झाल्याचा संताप पर्यावरण प्रेमीतून व्यक्त होत आहे. महामार्गावरील स्थानिक, नागरिक, हॉटेल आणि इतर नागरिकांनी हा कचरा टाकला आहे. त्यामुळे रस्त्यावर ढीग निर्माण झाला आहे. काही अज्ञाताकडून हा कचरा जाळण्यात येत आहे. त्यामुळे परिसरात धूर निर्माण होऊन वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. पहाटेच्यावेळी धुके त्यातच कचऱ्याच्या धुरामुळे धोका निर्माण होऊ लागला आहे. त्यामुळे वाहनधारकांना कचरा, दुर्गंधी आणि धुराच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे.
धुरामुळे समस्या
महामार्ग आणि महामार्गाशेजारी असलेल्या सर्व्हिस रोडवर कचरा टाकण्यात आला आहे. या कचऱ्याला आग लावून कचरा जाळण्याचा प्रकार सुरू आहे. मात्र यामुळे महामार्गावर सर्वत्र धूर पसरू लागला आहे. ये-जा करणाऱ्या वाहनधारकांबरोबर स्थानिक नागरिकांसमोर समस्या निर्माण होऊ लागली आहे. राष्ट्रीय महामार्ग सुशोभित असला तरी रस्त्या शेजारी मात्र कचऱ्याचा ढीग दिसत आहे.
कचऱ्यात मृत जनावरे
महामार्गा शेजारी टाकलेल्या कचऱ्यामध्ये मृत झालेली जनावरे आढळून येत आहेत. मृत झालेली लहान जनावरे, कुत्री आणि मांजरेदेखील टाकली जात आहेत. सर्वत्र दुर्गंधी पसरुन रोगराईत भर पडली आहे. त्यामुळे आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे.