महाकुंभमेळा 2025
उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी 2025 या कालावधीत महाकुंभमेळा होणार आहे. हा मेळा जगातील सर्वात मोठ्या धार्मिक मेळ्यांपैकी एक आहे. त्यात सहभागी होण्यासाठी देशातूनच नाही तर जगभरातून लोक येतात. सनातन धर्मात महाकुंभमेळ्याला धार्मिक महत्त्व आहे. महाकुंभमेळा 12 वर्षातून एकदा आयोजित केला जातो. या काळात कोट्यावधी भाविक गंगा, यमुना आणि सरस्वतीच्या पवित्र संगमावर स्नान करण्याची पर्वणी साधतात. महाकुंभमेळ्यात सहभागी होऊन स्नान केल्याने भक्तांची सर्व पापे नष्ट होऊन मोक्ष प्राप्त होतो, अशी समज आहे. या महाकुंभमेळ्याला मोठे धार्मिक महत्त्व आहे.
महाकुंभाचे धार्मिक महत्त्व
महाकुंभमेळ्याचे धार्मिक महत्त्व समुद्रमंथनाशी जोडलेले आहे. पौराणिक आणि धार्मिक कथांनुसार, जेव्हा देव आणि दानवांनी मिळून समुद्रमंथन केले तेव्हा त्यातून अमृताचे भांडे बाहेर पडले. अमृत कलश हे कुंभाचे प्रतीक मानले जाते. कुंभ म्हणजे कलश. पण, हा सामान्य कलश नसून अमृत कलश आहे. या अमृत कलशाला कुंभ उत्सवाची पार्श्वभूमी आहे. पौराणिक कथेनुसार महाकुंभाची सुरुवात समुद्रमंथनापासून झाली असे मानले जाते. पृथ्वीवर जिथे जिथे अमृताचे थेंब पडले, त्या ठिकाणी महाकुंभाचे आयोजन होते. प्रयागराज, हरिद्वार, उज्जैन आणि नाशिक या चार ठिकाणी कुंभमेळ्याचे आयोजन केले जाते.
महाकुंभात शाही स्नानाचे महत्त्व
हिंदू धर्मात प्राचीन काळापासून पवित्र नद्यांमध्ये स्नानाला महत्त्व आहे. परंतु महाकुंभात पवित्र शाही स्नान केल्याने व्यक्तीला केवळ शारीरिकच नाही तर मानसिक आणि आध्यात्मिक शुद्धीही मिळते. कुंभ काळात गंगा, यमुना, गोदावरी आणि शिप्रा या पवित्र नद्यांचे पाणी अमृतसारखे शुद्ध होते असे मानले जाते. यामुळेच दर 12 वर्षांनी प्रयागराजमध्ये लाखो भाविक स्नानासाठी येतात. येथे गंगा, यमुना आणि सरस्वती नद्यांचा संगम झाल्यामुळे या स्थानाचे धार्मिक महत्त्व अनन्यसाधारण आहे. महाकुंभ 2025 अंतर्गत भाविक, पर्यटक आणि अभ्यागतांच्या पवित्र स्नानासाठी उत्तम व्यवस्था करण्यात आली आहे.
महाकुंभ-2025 मधील शाही स्नानाच्या तारखा
13 जानेवारी - पौष पौर्णिमा
14 जानेवारी - मकर संक्रांती
29 जानेवारी - मौनी अमावस्या
3 फेब्रुवारी - वसंत पंचमी
12 फेब्रुवारी - माघी पौर्णिमा
26 फेब्रुवारी - महाशिवरात्री उत्सव (अंतिम शाही स्नान)
प्रयागराजला नवा साज : मोदी-योगींची किमया
महाकुंभ हा सनातन धर्माच्या सर्वात मोठ्या सोहळ्याच्या आयोजनासाठी कटिबद्ध असलेले योगी सरकार देश-विदेशातून येणाऱ्या भाविकांच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वातील केंद्र सरकारकडूनही हा सोहळा यशस्वी करण्यासाठी पुरेपूर रसद पुरविली जात आहे. महाकुंभमेळ्याच्या काळात भाविकांना संगमावर पूजा करता यावी यासाठी विशेष व्यवस्था करण्यात येत आहे. धार्मिक विधी करताना भाविकांची परवड होऊ नये यासाठी ब्राह्मण, पुजारी यांचीही सोय केली जात आहे. पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत नुकतेच प्रयागराजमध्ये कोट्यावधींच्या विकास प्रकल्पांचे लोकार्पण करण्यात आले. या प्रकल्पांमुळे प्रयागराजला नवा साज चढलेला दिसून येत आहे.
उत्तर प्रदेशातील प्रयागराज जिल्ह्यात जानेवारी महिन्यात सुरू होणाऱ्या जगातील सर्वात मोठ्या सांस्कृतिक आणि अध्यात्मिक मेळा ‘महाकुंभ-2025’साठी केंद्र सरकारकडून विशेष अनुदान मंजूर करण्यात आले आहे. उत्तर प्रदेश सरकारच्या विनंतीवरून केंद्र सरकारने 2,100 कोटी रुपयांची विशेष अनुदान रक्कम मंजूर केली आहे आणि पहिला हप्ता म्हणून 1,050 कोटी रुपये पाठवले आहेत. महाकुंभमेळ्याच्या सुरक्षित आयोजनासाठी भारत सरकारकडून एक वेळचे विशेष अनुदान म्हणून निधी मंजूर करण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारने केंद्र सरकारला विशेष विनंती केली होती.
उत्तर प्रदेशचे योगी सरकार भव्य, दिव्य आणि डिजिटल महाकुंभ आयोजित करण्यासाठी आधीच 5,435.68 कोटी रुपये खर्च केले आहेत. केंद्र सरकारच्या या निधीतून महाकुंभासाठी 421 प्रकल्प साकारण्यात आले आहेत. त्याव्यतिरिक्त राज्य सरकारने आतापर्यंत 3,461.99 लाख रुपयांची आर्थिक मान्यता दिली आहे. याशिवाय सार्वजनिक बांधकाम विभाग, गृहनिर्माण व नगररचना विभाग, ब्रिज कॉर्पोरेशन, पर्यटन विभाग, पाटबंधारे, महानगरपालिका प्रयागराज यासह विविध विभागांमार्फत विभागीय अर्थसंकल्पातून 1,636.00 कोटी रुपयांचे 125 प्रकल्प राबविण्यात येत आहेत.
सर्वोत्तम स्मार्ट सिटी
महाकुंभ 2025 अंतर्गत जिल्ह्यातील पायाभूत सुविधांचाही विकास करण्यात आला आहे. प्रयागराज विकास प्राधिकरणाच्या समन्वयाने प्रयागराजला सर्वोत्तम स्मार्ट सिटी बनवण्यात आली आहे. रेल्वे ओव्हरब्रिज, रेल्वे अंडरब्रिज, रस्त्यांचे मजबुतीकरण आणि रुंदीकरण, नदीकाठावरील धूप रोखण्याचे काम यासह रस्ते इंटरलॉक करणे, नदी किनाऱ्यावर चौथऱ्यांची उभारणी करण्यात आली आहे. स्मार्ट शहर म्हणून विकसित करण्याच्या कृती आराखड्यांतर्गत सर्व चौकांचे थीम आधारित सुशोभीकरण, आयटी आधारित निरीक्षण इत्यादी कामे आणि भाविकांसाठी शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. याशिवाय स्वच्छ भारत मिशन आणि प्रयागराज महानगरपालिकेच्या समन्वयाने शहरातील स्वच्छता व स्वच्छतेसाठी उच्च दर्जाची व्यवस्था करण्यात आली आहे. घनकचरा व्यवस्थापन आणि सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पही यशस्वीपणे राबविण्यात आला आहे. एकंदर ‘महाकुंभ 2025’ सोहळा दिव्य महाकुंभ, भव्य महाकुंभ तसेच स्वच्छ महाकुंभ, सुरक्षित महाकुंभ, सुगम महाकुंभ, डिजिटल महाकुंभ, हरित महाकुंभ या संकल्पना विकसित करण्याचा उद्देश आहे.
महिलांसाठी स्वतंत्र कक्ष : महिलांची गैरसोय होऊ नये यासाठी स्वतंत्र कक्ष उभारण्यात आला आहे. या कक्षामध्ये चेंजिंग रुमचीही व्यवस्था आहे.
सुरक्षेसाठी विशेष सज्जता : शाही स्नानासाठी देश-विदेशातून येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षेसाठी विशेष सुरक्षा तुकड्या सज्ज ठेवण्यात आल्या आहेत.
तरंगत्या जेटींचे आकर्षण : संगमावर तरंगत्या जेटी बांधण्यात आल्या असून त्या आकर्षक बनवण्यासाठी विशेष प्रकारच्या फुलांनी सजवण्यात येणार आहेत.
घोडेस्वार पोलिसांद्वारे गस्त
महाकुंभ 2025 मध्ये गर्दी नियंत्रणासाठी विशेष प्रशिक्षित पोलीस तैनात केले जातील. उत्तर प्रदेशचे प्रशिक्षित माउंटेड पोलीस पाणी आणि जमीन अशा दोन्ही ठिकाणी कोट्यावधी भाविकांचा मार्ग सुकर करण्यात सक्रीय असतील. त्यांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे. गर्दीमध्ये गस्त घालत असताना पोलिसांच्या दिमतीसाठी 130 घोडेही सज्ज आहेत. त्यांचे सारथ्य करण्यासाठी 166 पोलिसांच्या एका टीमला प्रशिक्षण देण्यात आले आहे. महाकुंभाच्या पार्श्वभूमीवर, माउंटेड पोलिसांना विशेष प्रशिक्षण देण्यात आल्याचे उत्तर प्रदेशचे पोलीस महासंचालक प्रशांत कुमार यांनी सांगितले.
या घोड्यांमध्ये भारतीय जातीच्या घोड्यांबरोबरच अमेरिकन आणि ब्रिटिश जातीचे घोडेही महाकुंभात गर्दी नियंत्रणाचे काम करणार आहेत. या घोड्यांना मुरादाबाद आणि सीतापूर प्रशिक्षण केंद्रात खास पद्धतीने प्रशिक्षण देण्यात आले आहे. सध्या कर्तव्यावर तैनात होणाऱ्या घोड्यांच्या आहाराची आणि वैद्यकीय सुविधांची विशेष काळजी घेतली जात आहे. दारा, राका, शाहीन, जॅकी, गौरी, अहिल्या, रणकुंभ अशी काही घोड्यांची नावे आहेत. या घोड्यांच्या देखभालीसाठी पशुवैद्यकांची नियुक्तीही करण्यात आली आहे. या घोड्यांना तीन वेळा मालिश केले जाते. त्यांचे केस महिन्यातून एकदा कापले जातात.
‘ग्लॅमरस’ कार्यक्रमांची मेजवानी....
महाकुंभ 2025 अविस्मरणीय बनवण्यासाठी योगी सरकार विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्याच्या योजनेवर काम करत आहे. एकीकडे बॉलीवूडचे तमाम स्टार्स आपल्या सुरेल आवाजाने भाविकांना अध्यात्म आणि संस्कृतीच्या मर्मात चिंब करतील. तर दुसरीकडे सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये महाकुंभ आणि रामलीला आणि महाभारतातील लीलांशी संबंधित कथांचेही सादरीकरण होणार आहे. या सादरीकरणासाठी देशातील दिग्गज आणि प्रसिद्ध कलाकार महाकुंभमेळा परिसरात पोहोचून भाविकांचे मनोरंजन करतील. प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेते आशुतोष राणा ‘हमारा राम’वर तर अभिनेत्री आणि खासदार हेमा मालिनी ‘गंगा अवतार’वर कला सादर करणार आहेत. महाभारत मालिका फेम पुनीत इस्सर आपल्या महाभारताच्या सादरीकरणाद्वारे लोकांना प्राचीन भारताच्या युगात रममाण करतील. हे सर्व कार्यक्रम गंगा पंडालमध्ये आयोजित केले जातील. उत्तर प्रदेश सांस्कृतिक विभाग याचे आयोजन करणार आहे.
12 वर्षांनंतर मोठ्या सोहळ्याची पर्वणी
प्रयागराजमधील वातावरण भक्तिमय
लाखो भक्तांच्या स्वागतासाठी सज्जता
उत्तर प्रदेश सरकारकडून जय्यत तयारी
केंद्रीय योजनांच्या माध्यमातून विकास