Mahadevi Elephant Nandani: माधुरीसाठी लवकरच राष्ट्रपतींची भेट घेणार : राजू शेट्टी
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे दाद मागण्याचा अधिकार दिला
कोल्हापूर : सर्वेच्च न्यायालयाच्या निकालानुसार जैन समाजाचा स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी संस्थान मठातील महादेवी हत्तीणीला वनतारा येथेजावं लागले. या निकालाच्या विरोधात महादेवीला परत आणण्यासाठी भारतीय संविधानानुसार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे दाद मागण्याचा अधिकार दिला.
त्यानुसार आपण राष्ट्रपती यांची भेट घेणार असल्याचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी मूक मोर्चासमोर स्पष्ट केले. नांदणी (ता.शिरोळ) येथील महादेवी हत्तीणीला परत मठात आणण्यासाठी 50 हजारांपेक्षा अधिक लोकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आलेल्या मूक मोर्चात सहभाग नोंदविला.
पहाटे पाच वाचल्यापासून नांदणीपासून या मोर्चासाठी हजारो लोक चालत आले होते. या मोर्चात महाराष्ट्र, कर्नाटक आदी सीमा भागातील 743 गावातल्या भाविकांनी गर्दी केली होती. शेट्टी म्हणाले, महादेवी हत्तीणीच्या बाबतीत खोटा अहवाल करून तिला गुजरातच्या जामनगर येथे असलेल्या वनतारा संगोपन केंद्रात जावं लागलं. ती सक्षम नव्हती तर तिला कोणत्या अहवालानुसार रात्रीचं नेण्यात आलं.
तिच्याबाबतीत खोटा अहवाल तयार केला असेल तर पशुसवंर्धन अधिकारी यांच्यासह सबंधितावर गुन्हा दखल करावा. आमदार सतेज पाटील यांनी अडीच लाख पत्रे दिली आमदार सतेज पाटील यांनी राष्ट्रपती यांना अडीच लाख पत्रे पाठवली आहेत. यासह आज राष्ट्रपतीना मूक मोर्चाच्या माध्यमातून निवेदन जिल्हाधिकारी यांच्यामार्फत दिले जाणार आहे.
याचा संदर्भ घेत आपण येत्या काही दिवसात राष्ट्रपती यांना भेट देणार असल्याचे राजू शेट्टी यांनी सांगितले. भाजप धार्मिक तर आमचा अपमान का भाजप धार्मिकतेचा आव आणत असेल तर आमच्या मठातील हत्तीण वनतारामध्ये नेत आमच्या भावना का दुखावत आहे. हिंदूत्व नावाने धार्मिकतेचा भाजप आव कशाला आणत आहे. लाखो भाविकांच्या भावना भाजपला का दिसत नाहीत, असा सवाल शेट्टी यांनी विचारला.
वेगळा प्रकार घडल्यास...
महादेवी हत्तीण वनतारा जाण्याचा प्रसंग आला त्यावेळी भाविकांच्याकडून काही चुकीचे प्रकार घडले, याबद्दल मी जाहीर माफी मागितली आहे. ज्या संशयितावर गुन्हा नोंद केला आहे. त्यांना आम्ही येत्या आठ तासात हजर करतो, मात्र त्यावेळी पोलिसांच्याकडून काही वेगळा प्रकार घडल्यास भविष्यात काय झाल्यास त्याला पोलीस जबाबदार असतील, असा इशाराही राजू शेट्टी यांनी दिला.
‘पेटा’ संस्था नेमकं काय करते पेटा ही संस्था प्राण्यांचे संरक्षण करत आहे तर वनतारामध्ये प्राण्यांना साखळदंड बांधला जातोय, यासह अनेक प्राण्यांची जीवितहानी झाली आहे. उद्योगपतींच्या लग्नात हत्ती नेला जातोय, त्यांच्याबाबतीत ‘पेटा’कडून सूट का दिली जाते. अनेक पाळीव प्राणी कुत्री चावून काहींना जीव गमवावा लागतो. भटक्या कुत्र्यांचा प्रश्न आहे, अशावेळी ‘पेटा’ काय करतेय.
प्राण्यांच्या बाबतीत ही संस्था दया दाखवत असेल तर उद्या म्हैस पाळणेही आम्हाला कठीण होईल, दुध काढतानाही आम्ही त्रास दिला म्हणून आमची जनावारे ‘पेटा’ नेणार काय असा प्रश्नही शेट्टी यांनी मोर्चासमोर उपस्थित केला. अंबानी आपल्या उद्योगासाठी जनतेच्या भावनेशी खेळत असेल तर लक्षात ठेवा आतापर्यंत दीड लाख लोकांनी जिओ बंद केले आहे, ती संख्या पाच लाखावर जाईल.
त्यानंतर अंबानीच्या सर्व उद्योगांवर बहिष्कार घातला जाईल, असा इशारा माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला. अंबानी यांच्या वनतारा या संस्थेला सांभाळण्यासाठी मंदिरातील हत्ती नेण्याचे काम राजकारणी लोक करत आहेत. मंदिर, मठ राजे राजवाडे येथे पाळलेले हत्ती आहेत. त्यांच्याच प्रजाती आता मठ, मंदिर या ठिकाणी आहेत.
अंबानी यांच्या वनतारामध्ये हे हत्ती नेण्याचे षडयंत्र केले जात आहे. वनतारामध्ये प्राण्यांचा सांभाळ चांगल्या प्रकारे केला जात नाही तरीही त्या ठिकाणी पाळीव हत्ती नेण्याचे काम केले जात आहे. वनताराची चौकशी करावी अंबानी यांचे वनतारा सुरु झाल्यापासून किती मुके प्राणी आले, कितींच्यावर उपचार झाले, किती मृत्यू झाले. किती प्राण्यावर कॅमेराच्या समोर अत्यसंस्कार केले आहे, याचीही चौकशी करावी. अंबानी यांच्या कुंडापेक्षा आमची पंचगंगा नदी मोठी आहे. वनतारामध्ये प्राण्यांची सुरक्षा होते का असाही शेट्टी यांनी प्रश्न विचारला.