For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

महादेव अॅपचा प्रवर्तक चंद्राकरला अटक

06:32 AM Oct 12, 2024 IST | Tarun Bharat Portal
महादेव अॅपचा प्रवर्तक चंद्राकरला अटक
Advertisement

इंटरपोलच्या अधिकाऱ्यांनी दुबईत घेतले ताब्यात

Advertisement

वृत्तसंस्था/ दुबई

मनी लॉन्ड्रिंग आणि फसवणूक प्रकरणी आरोपी असलेला महादेव सट्टेबाजी अॅपचा मुख्य संचालक सौरभ चंद्राकरला दुबईत अटक करण्यात आली आहे. आरोपीला इंटरपोलच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले आहे. सीबीआय आणि ईडीच्य अधिकाऱ्यांनी दुबईचे पोलीस आणि स्थानिक सुरक्षा दलासोबत मिळून आरोपीशी निगडित प्रत्येक तपशील इंटरपोलला पुरविला होता. काही औपचारिकता पूर्ण केल्यावर चंद्राकरला लवकरच भारतात आणले जाणार आहे.

Advertisement

आरोपीला अटक केल्यावर इंटरपोलकडून भारतीय विदेश मंत्रालयाला कळविण्यात आले आहे. आता सौरभ चंद्राकरला भारत आणि मग लवकरच रायपूर येथे आणण्याची तयारी केली जात आहे.  याकरता दस्तऐवजांचे काम अधिकारी पूर्ण करत आहेत. 7 दिवसांच्या आत आरोपीला भारतात आणले जाऊ शकते. इंटरपोलचे अधिकारी दीर्घकाळापासून चंद्राकरच्या ठिकाणांवर नजर ठेवून होते.

एका कॅश कूरियरच्या ईमेल स्टेटमेंटच्या पडताळणीत तपास यंत्रणेला महादेव ऑनलाइन बेटिंग अॅप घोटाळ्याचा थांगपत्ता लागला होता. छत्तीसगडचे तत्कालीन मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते भूपेश बघेल यांनी संयुक्त अरब अमिरात येथील अॅप प्रवर्तकांकडून कथित स्वरुपात 508 कोटी रुपये स्वीकारल्याचे यात आढळून आले होते. परंतु बघेल यांनी स्वत:वरी आरोप फेटाळले होते.

सौरभ चंद्राकर कोण?

छत्तीसगडच्या भिलाई येथील रहिवासी सौरभ चंद्राकर पूर्वी ज्यूसचे दुकान चालवत होता. 2019 मध्ये तो दुबईत गेला, तेथे त्याने मित्र रवि उप्पलला बोलावून घेतले, यानंतर दोघांनी मिळून महादेव अॅप लाँच केला, काही काळातच महादेव अॅप ऑनलाइन बेटिंग बाजारातील मोठे नाव ठरले होते. महादेव ऑनलाइन बेटिंग अॅपवर युजर्स पोकर, कार्ड गेम्स, चान्स गेम नावाने लाइव गेम खेळायचे. याद्वारे क्रिकेट, बॅडमिंटन, टेनिस आणि फुटबॉल यासारख्या खेळांमध्ये सट्टेबाजीही केली जात होती. सट्टेबाजीच्या नेटवर्कद्वारे महादेव अॅपचे जाळे वेगाने फैलावत गेले. सर्वाधिक अकौंट्स छत्तीसगडमध्येच सुरू झाली होती. महादेव सट्टेबाजी अॅपचा सूत्रधार चंद्राकर हा दाऊद इब्राहिमशी संबंध राखून असल्याचेही समोर आले होते.

6 हजार कोटी रुपयांची फसवणूक

ईडीनुसार महादेव अॅपद्वारे 6 हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेची फसवणूक झाली आहे. ईडीने याप्रकरणी आतापर्यंत एकूण 11 जणांना अटक केली आहे. दोन आरोपींच्या विरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.  चंद्राकारचा फेब्रुवारी 2023 मध्ये युएईच्या रास अल खैमामध्ये विवाह झाला होता. या विवाहसोहळ्याकरता 200 कोटी रुपये खर्च करण्यात आले होते.

Advertisement
Tags :

.