Mahabaleshwar Project: नवीन महाबळेश्वर प्रकल्पाला गती मिळणार?, उपमुख्यमंत्री शिंदेंकडून थेट आढावा
'नवीन महाबळेश्वर' प्रकल्पाच्या अनुषंगाने बैठक आणि सादरीकरणं पार पडली
By : इम्तियाज मुजावर
सातारा : सातारा जिल्ह्यातील सह्याद्रीच्या कुशीत लपलेला कोयना–जावळी–पाटण परिसर लवकरच एक नवं रूप घेणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कालपासून दरेगावात मुक्कामी असून, आज 'नवीन महाबळेश्वर' प्रकल्पाच्या अनुषंगाने मोठ्या प्रमाणावर बैठक आणि सादरीकरणं पार पडली आहेत.
एमएसआरडीसीचे वरिष्ठ अधिकारी, वनविभागाचे जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, आणि संबंधित विभागांच्या प्रमुख अधिकाऱ्यांसोबत उपमुख्यमंत्र्यांनी थेट पीपीटीद्वारे प्रकल्प आराखडा पाहिला आणि प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक बाबींवर सविस्तर चर्चा केली. कोयना, कांदाटी, सोलशी, जावळी, पाटण आणि महाबळेश्वर परिसराचा समावेश असलेल्या या अभूतपूर्व पर्यटन प्रकल्पामुळे, हा संपूर्ण भाग 'नवीन महाबळेश्वर' म्हणून नावारूपाला येणार आहे.
यामुळे स्थानिकांना मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी, पायाभूत सुविधा, आणि पर्यावरणपूरक पर्यटनाचा नवा अध्याय सुरू होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सकारात्मक भूमिकेची ग्वाही देत, लवकरच या प्रकल्पाला अंतिम मंजुरी व आर्थिक पाठबळ मिळेल, असा विश्वासही व्यक्त केला."