‘टाटा स्टील चेस इंडिया’चे यंदा मॅग्नस कार्लसन मुख्य आकर्षण
वृत्तसंस्था/ कोलकाता
टाटा स्टील चेस इंडियाच्या येथे 13 ते 17 नोव्हेंबर या कालावधीत होणाऱ्या सहाव्या आवृत्तीत जागतिक क्रमवारीत अग्रक्रमांकावर असलेला नॉर्वेचा ग्रँडमास्टर मॅग्नस कार्लसन हे आकर्षणाचे केंद्र असेल. कार्लसनचा या स्पर्धेत सहभागी होण्याची ही दुसरी खेप आहे. त्याने यापूर्वी 2019 मध्ये भाग घेतला होता आणि जेतेपद पटकावले होते.
नुकत्याच बुडापेस्ट येथे झालेल्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये सुवर्णपदक पटकावल्यानंतर एक मजबूत भारतीय संघ या प्रतिष्ठित स्पर्धेत दिसणार असून अर्जुन एरिगेसी, आर. प्रज्ञानंद आणि विदित गुजराथी यासारखे खेळाडू भाग घेतील. निहाल सरीन आणि एस. एल. नारायणन हे इतर भारतीय खेळाडू आहेत जे खुल्या गटात खेळतील.
मागील स्पर्धांप्रमाणेच याही स्पर्धेत खुला आणि महिला असे गट राहणार असून रॅपिड आणि ब्लिट्झ अशा दोन स्वरुपांत ही स्पर्धा खेळविली जाईल. दोन्ही विभागांसाठी समान बक्षीस रक्कम असेल. महिला गटात भारताचे प्रतिनिधीत्व कोनेरू हंपी, आर. वैशाली, डी. हरिका, दिव्या देशमुख आणि वंतिका अग्रवाल करतील.
बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद या स्पर्धेचा दूत म्हणून आपला सहभाग कायम ठेवणार आहे. टाटा स्टील चेस इंडियामध्ये परत झळकण्यास उत्सुक आहे. ही भारतातील एक महत्त्वाची स्पर्धा बनली आहे. यावर्षी मॅग्नस कार्लसनच्या नेतृत्वाखाली जगातील सर्वोत्कृष्ट खेळाडू सहभागी होणार आहेत, असे आनंदने म्हटले आहे.
या वर्षीच्या स्पर्धेत सहभागी होणारे खेळाडू पुढीलप्रमाणे आहे-खुला गट : मॅग्नस कार्लसन, नोदिरबेक अब्दुसत्तारोव्ह, वेस्ली सो, व्हिन्सेंट कीमर, डॅनिल दुबोव्ह, अर्जुन एरिगेसी, आर. प्रज्ञानंद, विदित गुजराथी, निहाल सरिन, एस. एल. नारायणन.
महिला : अलेक्झांड्रा गोर्याचकिना, कॅटेरिना लागनो, अलेक्झांड्रा कोस्टेनियुक, नाना डझाग्निझे, व्हॅलेंटिना गुनिना, कोनेरू हम्पी, आर. वैशाली, डी. हरिका, दिव्या देशमुख, वंतिका अग्रवाल.