क्यूबामध्ये 6.8 तीव्रतेचा भूकंप, अनेक इमारतींचे नुकसान
वृत्तसंस्था/ हवाना
क्यूबाच्या पूर्व भागात रविवारी 6.8 तीव्रतेचा भूकंप झाला आहे. यामुळे या देशातील दुसऱ्या क्रमांकाचे शहर सँटियागो डे क्यूबा आणि आसपासच्या भागांमधील इमारतींचश नुकसान झाले आहे. या भूकंपाच्या परिणामादाखल त्सुनामी येण्याची शक्यता नसल्याचे अमेरिकेच्या राष्ट्रीय त्सुनामी इशारा केंद्राने स्पष्ट केले आहे. क्यूबाच्या ग्रॅनमा प्रांतातील बार्टोलोम मासो येथे या भूकंपाचा सर्वाधिक प्रभाव दिसून आला आहे. भूकंपामुळे भूस्खलन देखील झाले असल्याची माहिती क्यूबाचे अध्यक्ष मिगुएल डियाज-कॅनेल यांनी दिली आहे.
नुकसानीचा आढावा घेण्यास आम्ही सुरुवात केली आहे. लोकांचे जीव वाचविण्यास आमचे प्राधान्य असल्याचे त्यांनी म्हटले आहे. संबंधित भागात अनेक इमारती या जुन्या असल्याने त्यांचे नुकसान झाले आहे. क्यूबाच्या पूर्व किनारी क्षेत्रात ऑक्टोबर महिन्यात ऑस्कर हे चक्रीवादळ धडकले होते. या चक्रीवादळाने तेथे मोठी हानी घडवून आणली होती. पूर्व क्यूबाच्या बहुतांश हिस्स्यांमध्ये अनेक महिन्यांपासून कित्येक तासांपर्यंत ब्लॅकआउट होत आहे. यामुळे तेथील नुकसानीची अचूक माहिती अद्याप समोर आलेली नाही. तर भूकंपाची तीव्रता 6.8 इतकी होती आणि त्याचे केंद्र जमिनीत 14 किलोमीटर खोलवर होते.