कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

शहापुरात वैभवशाली चित्ररथ मिरवणूक

11:15 AM May 02, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

शिवप्रेमींचा उत्साह : लक्षवेधी चित्ररथ मिरवणूक, भगवेमय वातावरण : ढोल-ताशांचा गजर, लाठ्यांची प्रात्यक्षिके

Advertisement

Advertisement

बेळगाव : मध्यवर्ती सार्वजनिक श्री शिवजयंती उत्सव महामंडळ शहापूर विभागातर्फे गुरुवारी ऐतिहासिक आणि वैभवशाली शिवजयंती चित्ररथ मिरवणूक उत्साहात झाली. भगवे ध्वज, मराठमोळी वेशभूषा, ढोल-ताशांचा गजर, नेत्रदीपक विद्युत रोषणाई आणि शिवभक्तांचा उत्साह व आकर्षक चित्ररथ देखाव्यांमुळे परिसर शिवमय बनला होता. चित्ररथातील सजीव देखावे लक्षवेधी ठरले. शिवाय शिवप्रेमींचा उत्साह अमाप होता. प्रारंभी नाथ पै चौक येथील चौकात महापौर मंगेश पवार, नगरसेवक रवी साळुंखे, अशोक चिंडक, मध्यवर्ती शहापूर विभागाचे अध्यक्ष नेताजी जाधव, प्रकाश अष्टेकर, राजाराम सूर्यवंशी, माजी उपमहापौर संजय शिंदे आदींच्या उपस्थितीत शिवपुतळ्याचे पूजन झाले. तसेच मान्यवरांच्या हस्ते पहिल्या चित्ररथाचे पूजन करून मिरवणुकीला सुरुवात झाली.

यावेळी होसूर येथील सार्वजनिक श्री शिवजयंती उत्सव मराठा युवक मंडळातर्फे बालशिवाजी आदिलशहा दरबारात भेट आणि शहाजी राजांनी बालशिवबाला दिलेली राजमुद्रा आणि स्वराज्याचा झेंडा हा देखावा उत्कृष्टरित्या सादर केला. या अंगावर शहारे आणणाऱ्या देखाव्याने वाहव्वा मिळविली. मध्यवर्ती सार्वजनिक श्री शिवजयंती उत्सव महामंडळ शहापूर विभागातर्फे बॅ. नाथ पै चौक येथून मिरवणुकीला प्रारंभ झाला. पुढे शहापूर खडेबाजार, शिवाजी उद्यान रोड, कपिलेश्वर ओव्हरब्रिज, शनिमंदिर, हेमू कलानी चौक, स्टेशन रोड, अंबाभुवन, सेंट मेरीज हायस्कूल, इस्लामिया हायस्कूल, संचयनी सर्कलमार्गे ध. संभाजी चौक येथे मुख्य मिरवणुकीत ही मिरवणूक सहभागी झाली. कोरे गल्ली-शहापूर येथील सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाने यावर्षी स्वराज्य रक्षक ताराराणींनी औरंगजेबला दिलेल्या चेतावणीचा देखावा सादर केला. स्त्राrला कमी लेखू नये, स्त्राr ही पुरुषांबरोबर रणांगणात उतरु शकते, याचा सजीव  देखावा यावेळी सादर केला. आनंदवाडी येथील शिवजयंती उत्सव मंडळाने शिवा काशिद व बाजीप्रभू देशपांडे यावर आधारित देखावा सादर केला.

यावेळी नगरसेवक नितीन जाधव, श्रीधर बापू जाधव, अमृत भाकोजी, प्रभाकर भाकोजी, संजय बैलूरकर, माजी उपमहापौर संजय शिंदे, महादेव पाटील, दिलीप दळवी, हिरालाल चव्हाण, प्रकाश अष्टेकर, बाळकृष्ण कंग्राळकर, प्रदीप शेट्टीबाचे आदी उपस्थित होते. या चित्ररथ मिरवणुकीत जय भवानी, जय शिवाजीचा गजर, शिवरायांच्या तेजोमय जीवनाची कथा सांगणारा शिवकालीन इतिहास जागविण्यात आला. यामध्ये भगवे झेंडे, भगवे पोशाख परिधान करून शिवभक्तही उत्साहात सहभागी झाले होते. या चित्ररथ मिरवणुकीत कलाकारांनी हुबेहुब शिवाजी महाराज, संभाजी महाराज, मावळे, अफझल खान, औरंगजेब, महाराणी यांच्या भूमिका उत्तमरित्या साकारल्या. शिवाय शिवप्रेमींच्या मनात तेजोमय शिवकाळ भरला. या चित्ररथ देखाव्याच्या माध्यमातून शिवरायांच्या राजवटीत घडलेल्या घटनांवर आधारित प्रसंग सादर करण्यात आले. यावेळी आबालवृद्धांसह महिला शिवप्रेमी सहभागी झाले होते.

मर्दानी खेळ

या मिरवणुकीत युवकांनी दांडपट्टा, लाठी, ढाल अशा मर्दानी खेळांचे प्रात्यक्षिक सादर केले. यालाही शिवप्रेमींचा प्रतिसाद मिळाला. यामध्ये युवक आणि युवतीही सहभागी झाल्या होत्या.

उत्कृष्ट सादरीकरण

या चित्ररथ मिरवणुकीत युवक-युवतींनी उत्कृष्ट सादरीकरण केले. शिवकाळातील थरारक आणि अंगावर शहारे आणणारे प्रसंग सादर केले. या चित्ररथ मिरवणुकीने शहापूर परिसरात शिवसृष्टी अवतरली होती. शिवाय भगवेमय वातावरणामुळे सळसळता उत्साह पाहावयास मिळाला.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article