चेंगराचेंगरीच्या घटनेची मॅजिस्टेटमार्फत चौकशी सुरू
बेंगळूर जिल्हाधिकाऱ्यांची घटनास्थळाला भेट : पोलीस अधिकाऱ्यांकडून घेतली माहिती : 15 दिवसांत सरकारला अहवाल देणार
बेंगळूर : रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर (आरसीबी) संघाने पंजाब इलेव्हनवर संघावर मात करत तब्बल 18 वर्षांनी आयपीएल-2025 चा चषक पटकावला. बुधवारी सायंकाळी आरसीबी संघाचे चिन्नास्वामी स्टेडियममध्ये कर्नाटक क्रिकेट संघटनेतर्फे सत्काराचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाला प्रारंभ होण्याआधीच स्टेडियमबाहेर चेंगराचेंगरी झाल्याने 11 चाहत्यांचा मृत्यू झाला होता. या घटनेसंबंधी राज्य सरकारने मॅजिस्ट्रेटमार्फत चौकशीचे आदेश दिले होते. त्यानुसार गुरुवारी जिल्हाधिकारी जी. जगदीश यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली.
स्टेडियममध्ये आणि सर्व प्रवेशद्वारजवळ जाऊन बेंगळूर शहर जिल्हाधिकारी जगदीश यांनी घटनेसंबंधी पोलिसांकडून माहिती घेतली. गेट क्र. 6 जवळ तारेचे कुंपन तुटल्याचे आणि गेट क्र. 8 जवळ कारचा चक्काचूर झाल्याचीही त्यांनी पाहणी केली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, सरकारने या घटनेची चौकशी करून 15 दिवसांत अहवाल सादर करण्याची सूचना दिली आहे. मी आजपासून चौकशीच्या कामात व्यस्त झालो आहे. ज्या ठिकाणी चेंगराचेंगरी झाली त्या ठिकाणी पाहणी केली आहे. घटनेचे सीसीटीव्ही फुटेज मिळवून तपासणी केली जाईल. नागरिकांना देखील 13 जून रोजी सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 या वेळेत आपली साक्ष नोंद करण्याची संधी दिली आहे, असे त्यांनी सांगितले.
गृहमंत्र्यांनीही घेतली घटनेची माहिती
बेंगळूरच्या चिन्नास्वामी स्टेडियममध्ये आरसीबी संघाच्या विजयोत्सवाला गालबोट लागले आहे. चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर राज्य सरकारने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली आहे. गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वर यांनी गुरुवारी चेंगराचेंगरी झालेल्या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली. बेंगळूर शहर पोलीस आयुक्त बी. दयानंद, अतिरिक्त पोलीस आयुक्त रमेश बानोत आणि डीसीपींकडून गृहमंत्र्यांनी घटनेची माहिती घेतली. त्यानंतर केएससीए, आरसीबी आणि बेंगळूर शहर पोलिसांची बैठक घेत चर्चा केली. चिन्नास्वामी स्टेडियमजवळ पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी चेंगराचेंगरी प्रकरणाची मॅजिस्टेटमार्फत चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार प्रक्रिया सुरू झाली आहे.
चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर कोणत्या ठिकाणी चेंगराचेंगरी झाली ती कशी टाळता आली असती, हे जाणून घेण्यासाठी मी स्वत: पाहणी केली आहे. चिन्नास्वामी स्टेडियमच्या गेट क्र. 2 व 2अ, 6, 7, 16, 17, 18, आणि 21 वर चेंगराचेंगरी झाली होती. घटनास्थळी मृत्यू झाल्याची माहिती नाही. इस्पितळात नेत असताना, उपचारावेळी काहींचा मृत्यू झाला आहे. कोणत्या गेटवर किती जणांचा मृत्यू झाला, याची माहिती मिळालेली नाही, असेही त्यांनी सांगितले. विधानसौधसमोरही 1 लाख लोक जमतील असा अंदाज होता. स्टेडियममध्ये 40 हजार आणि स्टेडियमबाहेर 2.50 लाख लोक जमतील असा अंदाज होता. मात्र, मेट्रो रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार रेल्वेने बुधवारी एकाच दिवशी सुमारे 9.66 लाख लोकांनी प्रवास केला आहे. एकाच ठिकाणी इतके लोक जमल्याचे दुसरे उदाहरण नाही. दुर्दैवाने ही घटना घडली आहे, असे ते म्हणाले.
बुधवारी मेट्रो रेल्वेने 9.66 लाख जणांचा प्रवास
रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर (आरसीबी) संघाने आयपीएलचा 2025 सालातील चषकावर नाव कोरल्यानंतर संघाने बुधवारी बेंगळूरमध्ये विजयोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला. आरसीबी संघातील खेळाडू बेंगळूरला येत असल्याचे समजताच लाखोंच्या संख्येने चाहते विधानसौध, चिन्नास्वामी स्टेडियम आणि इतर ठिकाणी जमा झाले होते. स्टेडियममध्ये आणि बाहेर 2 लाखांपेक्षा जास्त जण जमा झाल्याचे सरकारने सांगितले असले तरी नम्म मेट्रो रेल्वेतून बुधवारी एकाच दिवशी 9,66,732 जणांनी प्रवास केल्याची बीएमआरसीएलने माहिती दिली आहे. नेहमीपेक्षा बुधवारचा आकडा सर्वाधिक होता.
सिमंतकुमार सिंग बेंगळूरचे नवे पोलीस आयुक्त
आरसीबी संघाच्या विजयोत्सवावेळी घडलेल्या दुर्घटनेनंतर राज्य सरकारने गुरुवारी रात्री बेंगळूर पोलीस आयुक्त बी. दयानंद यांच्यासह पाच पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित केले. त्यानंतर काही तासांतच राज्य सरकारने सिमंतकुमार सिंग यांची बेंगळूरचे नवे पोलीस आयुक्त म्हणून नेमणूक केली आहे. यासंबंधीचा अधिकृत आदेशही जारी करण्यात आला आहे. सिंमतकुमार सिंग हे 1996 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. ते याआधी बेंगळूर पूर्व विभागाचे अतिरिक्त आयुक्त म्हणून कार्यरत होते. त्यांनी एसीबी, केएसआरपीच्या एडीजीपी पदाचीही धुरा सांभाळली होती.
घटनेमुळे बेंगळूर, कर्नाटकाच्या प्रतिष्ठेला धक्का
चेंगराचेंगरीत आमच्या मुलांचा बळी गेल्याच्या घटनेने बेंगळूर आणि कर्नाटक राज्याच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचला आहे. आम्ही हे प्रकरण गांभीर्याने घेतले आहे. चुका दुरुस्त करण्यासाठी चौकशी केले जाईल. या घटनेतून आम्ही धडा घेण्याची गरज आहे. आमच्या राज्यात अशी दुर्घटना घडेल अशी अपेक्षा नव्हती. आरसीबी संघाने बेंगळूरला येत असल्याची माहिती प्रसारमाध्यमांना दिली होती. आमच्या सरकारपुढे दुसरा पर्याय नव्हता. दुर्घटनेत मृत्यू झालेले आमच्या कुटुंबातीलच सदस्य आहेत. या परिस्थितीत आम्ही शोक व्यक्त केला पाहिजे. दुर्घटनेची जबाबदारी एका-दुसऱ्यावर टाकू शकत नाही, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी दिली.
-उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार
स्नेहमयी कृष्ण यांच्याकडून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांविरुद्ध तक्रार
चिन्नास्वामी स्टेडियमबाहेरील चेंगराचेंगरी प्रकरणी सामाजिक कार्यकर्ते स्नेहमयी कृष्ण यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार आणि केएससीएच्या पदाधिकाऱ्यांविरुद्ध तक्रार दिली आहे. बीएनएसच्या कलम 106 अंतर्गत गुन्हा दाखल करावा, अशी विनंती त्यांनी केली आहे.
आरसीबीकडून प्रत्येकी 10 लाख रु. मदत
चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना अखेर आरसीबी फ्रॅन्चाईजीकडून प्रत्येकी 10 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. तर जखमींना प्रत्येकी 1 लाख रुपयांची मदत देण्याची घोषणा केली आहे. राज्य सरकारने देखील मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 10 लाखांची मदत देण्याचा निर्णय जाहीर केला होता.
चेंगराचेंगरीतील मृत
चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये यलहंका येथील दिव्यांशी (वय 13), कारवार जिल्ह्यातील रविंद्रनगर येथील अक्षता, बेंगळूरच्या एम. एस. रामय्या कॉलनीतील भूमिक (वय 20), दोड्डकल्लसंद्र येथील चिन्नय्या शेट्टी (वय 19), यलहंका येथील न्यू टाऊन येथील प्रज्ज्वल (वय 20), यडियुर येथील मनोजकुमार (वय 33), कोलार जिल्ह्यातील सहना (वय 19), चिक्कबळ्ळापूर जिल्ह्यातील चिंतामणी तालुक्यातील श्रवण (वय 21), यादगिरी जिल्ह्यातील शिवलिंग (वय 17), मंड्या जिल्ह्याच्या के. आर. पेठ तालुक्यातील पूर्णचंद्र (वय 32), तामिळनाडूच्या कोईम्बत्तूर जिल्ह्यातील उडमलेपेठ येथील कामाक्षीदेवी (वय 29) यांचा समावेश आहे.
श्वास कोंडल्याने तर काहींचा छातीवर दाब पडल्याने मृत्यू
मृत्यू झालेल्यांची उत्तरीय तपासणी झाल्यानंतर मृतदेह कुटुंबीयांकडे हस्तांतर करण्यात आले. बौरिंग इस्पितळात 6 व व्हिक्टोरिया इस्पितळात 5 जणांच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी करण्यात आली. त्यातील काही जणांचा मृत्यू श्वास कोंडल्याने आणि काहींचा छातीवर दाब पडल्याने मृत्यू झाल्याचा अहवाल डॉक्टरांनी दिला आहे. एका महिलेच्या शरीरातील हाडे मोडल्याने मृत्यू झाल्याचा उल्लेख शवविच्छेदन अहवालात आहे.