जादुई बॉलिंग अन् टीम इंडियाचा रोमांचक विजय
पाचव्या कसोटीत भारताचा 6 धावांनी विजय : मालिका 2-2 बरोबरीत : सिराज-कृष्णा ठरले विजयाचे हिरो
वृत्तसंस्था/ लीड्स (लंडन)
ओव्हलच्या मैदानातील पाचव्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने अशक्यप्राय वाटणारा सामना जिंकत इतिहास रचला. पाचव्या दिवशी इंग्लंडला विजयासाठी 35 धावांची गरज होती. 4 विकेट्स हाती असल्यामुळे सामना इंग्लंडच्या हातात होता, पण टीम इंडियाच्या गोलंदाजांनी ताकद पणाला लावत ‘हारी बाजी को जीतना हमे आता है.’...या तोऱ्यात जबरदस्त कमबॅक करत हा सामना जिंकला. या विजयासह टीम इंडियाने मालिकेत 2-2 अशी बरोबरी साधली. मालिकेत 754 धावांची बरसात करणाऱ्या शुभमन गिल व 481 धावा करणारा इंग्लंडचा हॅरी ब्रूक यांना मालिकावीर तर मोहम्मद सिराजला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. त्याने या सामन्यात 9 बळी मिळविले.
पाचवा कसोटी सामना जिंकण्यासाठी इंग्लंडसमोर 374 धावांचे लक्ष्य होते पण हॅरी ब्रूक आणि जो रुट या दोघांनी मिळून इंग्लंडच्या विजयाच्या आशा प्रबळ केल्या. दोघांनीही शतके ठोकून सामना भारताच्या हातातून निसटतो की काय, असा क्षण आला. पण शेवटी प्रसिद्ध कृष्णा आणि मोहम्मद सिराज यांच्या वेगवान माऱ्यासमोर इंग्लंडने गुडघे टेकले आणि इंग्लंडचा डाव 367 धावांवर आटोपला. भारतीय संघाने हा सामना 6 धावांनी जिंकत ऐतिहासिक कामगिरी साकारली. या विजयाने भारताने केवळ सामनाच नव्हे, तर मालिकाही वाचवली. सामना जिंकण्यासाठी आवश्यक असलेल्या 4 पैकी 3 विकेट्स सिराजने घेतल्या. प्रसिद्ध कृष्णाने त्याला एक विकेट घेत उत्तम साथ दिली.
सिराज-कृष्णाचा धमाका
भारतीय संघाने पहिल्या डावात 224 धावा केल्यावर इंग्लंडने पहिल्या डावात 247 धावा करीत 23 धावांची आघाडी घेतली होती. इंग्लंडची अल्प आघाडी भेदून टीम इंडियाने दुसऱ्या डावात 396 धावा करत यजमानांसमोर 374 धावांचे टार्गेट सेट केले होते. धावांचा पाठलाग करताना हॅरी ब्रूक आणि जो रुट यांनी शतके झळकावली. ब्रूकने 98 चेंडूंत 111 धावा केल्या. तर रूटने 152 चेंडूंत 12 चौकारांच्या मदतीने 105 धावा केल्या. रूट आणि ब्रूक यांच्यात चौथ्या विकेटसाठी 195 धावांची भागीदारी झाली, ज्यामुळे इंग्लंडने सामन्यात पुनरागमन केले. सलामीवीर बेन डकेटनेही 54 धावांची उपयुक्त खेळी केली. एकवेळ इंग्लिश संघ हा सामना सहज जिंकेल असे वाटत होते. पण, चौथ्या दिवसाच्या खेळाच्या तिसऱ्या सत्रात सामन्यात ट्विस्ट आला. जेव्हा जेकब बेथेल आणि जो रुट यांना वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाने सलग दोन षटकांत पॅव्हेलियनमध्ये पाठवले. यानंतर पावसाला सुरुवात झाल्याने चौथ्या दिवसाचा खेळ थांबवण्यात आला.
पाचव्या दिवसाच्या खेळाला सुरुवात झाल्यावर आपल्या पहिल्याच षटकात सिराजने जेमी स्मिथच्या रुपात पहिली विकेट घेतली. दुसऱ्या चेंडूवरही त्याने विकेटचा डाव साधला होता. पण केएल राहुलकडून स्लिपमध्ये कॅचची संधी हुकली. मग सिराजने दुसऱ्या षटकात ओव्हरटनला तंबूत धाडले. यानंतर प्रसिद्ध कृष्णाने जोश टंगला बोल्ड केल्यावर जखमी ख्रिस वोक्स मैदानात उतरला. त्याचा निर्णय कौतुकास्पद अन् क्रिकेट इतिहासातील एक खास क्षणच होता. गस अॅटकिन्सन त्याला स्ट्राइक न देता मॅचला कलाटणी देण्याचा प्रयत्न करताना दिसला. पण सिराजने त्याचा त्रिफळा उडविला अन् इंग्लंडचा डाव 367 धावांत आटोपला. सामन्यात 9 (पहिल्या डावात 5 तर दुसऱ्या डावात 4) बळी घेणाऱ्या सिराजला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. कृष्णाने सामन्यात 8 बळी घेण्याची किमया केली.
संक्षिप्त धावफलक
भारत पहिला डाव 224 आणि दुसरा डाव 396
इंग्लंड पहिला डाव 247 आणि दुसरा डाव 85.1 षटकांत सर्वबाद 367 (बेन डकेट 54, जो रुट 105, हॅरी ब्रूक 111, अॅटकिन्सन 17, सिराज 5 बळी, कृष्णा 4 बळी, आकाश दीप 1 बळी).
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत भारत तिसऱ्या स्थानी
भारतीय संघाने इंग्लंडविरुद्ध पाचवा कसोटी सामना सहा धावांनी जिंकत मालिका 2-2 अशी बरोबरीत आणली. ही मालिका जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या 2025-27 या नव्या चक्रातील भारताची पहिलीच मालिका होती. जरी भारत इंग्लंडमध्ये कसोटी मालिका जिंकू शकला नसला तरी रोमांचक अशा शेवटच्या सामन्यात विजय मिळवत त्यांनी इंग्लंडच्या हातातून विजय हिसकावून घेतला. या विजयामुळे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत भारत तिसऱ्या स्थानी पोहोचला आहे तर इंग्लंडची चौथ्या स्थानी घसरण झाली आहे. ऑस्ट्रेलियन संघ पहिल्या स्थानी असून श्रीलंकन संघ दुसऱ्या स्थानावर आहे. 
तुटलेला हात गळ्यात घेऊन बॅटिंगला
इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू ख्रिस वोक्स तुटलेला हात गळ्यात घेऊन मैदानात उतरला. संघाने सामना तर, जिंकला नाही पण, वोक्सने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. भारताविरुद्धच्या सामन्यात आपल्या देशाला विजय मिळवून देण्यासाठी वोक्स खांद्याला दुखापत झाली असताना फलंदाजीसाठी मैदानात उतरला. पहिल्या डावात क्षेत्ररक्षण करताना त्याला दुखापत झाली. हाताला पट्टी बांधलेली होती, पण त्याचा उत्साह कमी झाला नाही.
कालच्या चुकीनंतर मी आज सकाळी उठलो आणि गुगलवरून ँात्गन म्हणजे स्वत:वर विश्वास ठेवण्याचा फोटो डाऊनलोड केला आणि तो मोबाईलच्या वॉलपेपरवर लावून मनाशी ठरवलं की मी हे नक्कीच करू शकतो. आमचा आमच्या संघावर विश्वास होता. त्यामुळेच आम्ही सामना जिंकलो.

- - सामनावीर मोहम्मद सिराज
सिराज असा खेळाडू आहे, जो परिस्थिती कशीही असो पण आपल्या संघासाठी लढतो. मैदानावर असताना तो संघासाठी सर्वकाही करतो. कधी कधी मैदानावर तो राग व्यक्त करतो, पण तो मनाने खूप चांगला आहे. तो खूप मेहनती आहे. त्यामुळे त्याच्याकडे इतक्या विकेट्स आहेत. अशा खेळाडूंना पाहून नक्कीच युवा खेळाडूंना खूप शिकायला मिळेल.
- जो रुट, इंग्लंडचा दिग्गज खेळाडू
जेव्हा तुमच्याकडे सिराज आणि प्रसिद्धसारखे गोलंदाज असतात, तेव्हा कर्णधारासाठी निर्णय घेणे खूप सोपे जाते. हो, आमच्यावर खूप दबाव होता, पण या दोघांनीही जबरदस्त गोलंदाजी करत सामना आमच्या बाजूला वळवला.
- शुभमन गिल, भारतीय कर्णधार