मॅजिक स्पोर्ट्सकडे विंटर चषक
मॅजिक स्पोर्ट्सतर्फे अनिकेत तलवार, रेहानचे प्रत्येकी एक गोल
बेळगाव : पुणे येथे दुसऱ्या विंटर चषक फुटबॉल स्पर्धेत मॅजिक स्पोर्ट्स बेळगाव संघाने फुटरो अ संघाचा टायब्रेकरमध्ये 3-1 असा पराभव करीत विंटर चषक पटकाविला. या स्पर्धेतील पहिल्या सामन्यात मॅजिक स्पोर्ट्सने एसएफए संघाचा 2-1 असा पराभव केला. बेळगावच्या अनिकेत तलवार व रेहान मुचंडी यांनी प्रत्येकी 1 गोल केला. पण दुसऱ्या सामन्यात त्यांना एबीसीएफसीकडून 1-0 असा निसटता पराभव पत्करावा लागला. तिसऱ्या सामन्यात मॅजिक स्पोर्ट्सने फुटबॉल फुटरो ब संघाचा 1-0 असा पराभव केला. तर चौथ्या सामन्यात एबीसी फॅमिली संघाचा 2-1 ने पराभव करून त्यांनी उपांत्यफेरीत प्रवेश केला. उपांत्यफेरीत मॅजिक स्पोर्ट्स क्लबने फुटबॉल फुटरो ब संघाचा 2-1 असा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला.
बेळगावतर्फे अनिकेत व साहीश विनीत यांनी गोल केले. अंतिम सामन्यात निर्धारीत वेळेत दोन्ही संघांनी 1-1 अशी बरोबरी केली होती. बेळगावतर्फे शुभम शहापूरकरने तर फुटबॉल फुटरोतर्फे दिनेशने गोल केला. त्यानंतर पंचांनी टायब्रेकर नियमाचा वापर केला. त्यामध्ये मॅजिक स्पोर्ट्स क्लबने 3-1 असा पराभव करून विजेतेपद पटकाविले. बेळगावतर्फे साहिश विनीत, अनिकेत व रेहान यांनी गोल केले. विजेत्या संघाला मान्यवरांच्या हस्ते चषक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. या संघात विराज नाईक, शुभम शहापूरकर, अनिकेत तलवार, रेहान मुचंडी, विहान मुचंडीकर, शाहिश विनित, विरान बोभाटे आदी खेळाडूंचा समावेश आहे. तर या संघाला राहुल मगदूम यांचे मार्गदर्शन लाभले.