For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

आवतरणिका - 2

06:25 AM Apr 02, 2024 IST | Tarun Bharat Portal
आवतरणिका   2

अध्याय एकतिसावा

Advertisement

आपण वाचत असलेल्या एकादश स्कंधाचे वैशिष्ट्या म्हणजे श्रीकृष्णांनी स्वत: परम प्राप्ती होण्यासाठी ज्ञान-वैराग्य-भक्ती-मुक्ती ह्याबद्दल विवेचन केलेले आहे. ह्या ग्रंथाची अवतरणिका म्हणजे गोषवारा नाथमहाराज देत आहेत. त्यापैकी पहिल्या वीस अध्यायात भगवंतांनी काय काय सांगितले आहे ते आपण बघितले. आता पुढील अध्यायांचा गोषवारा आपण पाहू. हातात उत्तम पिक आले आहे असे शेतकऱ्याला वाटत असताना चोर ते चोरी करून नेतात. त्याप्रमाणे आता साधनेचे फल आपल्याला मिळणार ह्या कल्पनेत साधक असताना समोर आलेल्या माणसाच्या गुणदोषाच्या चिंतनाने त्याची फळाला आलेली साधना कशी नष्ट होते हे एकविसाव्या अध्यायात देवांनी सांगितले. साधकाने समोर दिसणाऱ्या व्यक्तीतील गुणदोषांवर विचार सुरु केला की, तो त्यांच्या जाळ्यात फसलाच म्हणून समजा. ह्या गुणदोषांच्या चिंतनानेच थोर थोर नागविले गेले आहेत म्हणून साधकाने सावध रहावे. हे गुणदोष महापराक्रमी असून सज्ञानाला छळून काढतात आणि सांगून सावरून लुटतात. त्यामुळे साधनेच्या फळातला एक कणसुद्धा ते साधकाच्या पदरी पडू देत नाहीत. हे अत्यंत बलवान असलेले गुणदोष अज्ञानी माणसापेक्षा सज्ञानी माणसाची मानगूट लगेच पकडतात हे विशेष! म्हणून जो गुणदोषांकडे लक्ष न देता त्यांचे निर्दलन करतो तो तिन्ही लोकात महाबली ठरतो. उद्धवाने हे ऐकले पण भगवंताच्या बोलण्याचे त्याला मोठे नवल वाटले. तो म्हणाला, देवा वेदात तुम्हीच ह्या गुणदोषांची सविस्तर चर्चा केलेली आहे आणि आता तुम्हीच म्हणताय की गुणदोषांकडे दुर्लक्ष कर. त्यावर भगवंत म्हणाले, माणसाला त्याचे गुणदोष कळावेत म्हणून वेदात त्यावर चर्चा केलेली आहे पण म्हणून गुणदोषांची चर्चा करणे हे शहाणपणाचे आहे असे नव्हे. साधकाला गुणदोषांची माहिती झाल्यावर त्याने त्याकडे दुर्लक्ष करावे किंबहुना त्याने स्वत:च्या स्वभावात बदल करून कुणाचेही गुणदोष पाहूच नयेत असे माझे तुला सांगणे आहे. असे केले की, त्याच्या मनात त्याबद्दल विचार येणार नाहीत आणि त्याच्या चित्तात त्यावर चिंतनही होणार नाही. न बजेगा बास और न बजेगी बासुरी अशी परिस्थिती होईल. असे झाले की, त्याच्या साधनेत कोणताही व्यत्यय येणार नाही आणि त्याच्या साधनेचे फळ अलगद त्याच्या पदरात पडेल. बाविसाव्या अध्यायात भगवंतांनी तत्वे किती आहेत इत्यादि गोष्टींची चर्चा केली. आत्मज्ञानाचे संरक्षण करणे हे मुख्य असून त्यातून दृढ शांती प्राप्त होते हे सांगण्यावर त्यांनी भर दिला. हे भिक्षुगीतनिरूपण भगवंतांनी तेविसाव्यात केले. साधकाच्या साधनेची चोरी करणारे चोर मुख्यत्वे त्याच्या मनातच वस्ती करून असतात. म्हणून मनोजय कसा मिळवावा हे भिक्षुगीत निरूपणात देवांनी सांगितले. चोविसाव्या अध्यायात ह्या चोरांचा जन्म जिथे होतो त्या प्रकृतीबद्दल भगवंत माहिती देत आहेत. ते म्हणाले, ही प्रकृतीच मुळात खोटी आहे आणि तिच्या पोटी जन्मलेले चोर साधनेचे फळ बघता बघता लुटून नेतात. साधकाने हे ओळखले पाहिजे आणि आपल्या फळाच्या संरक्षणासाठी पूर्वी निर्गुण असलेले आणि शेवटी निर्गुण असलेले परब्रह्म त्याने लक्षात ठेवले पाहिजे. ह्या दोन्ही अवस्थांच्यामध्ये त्रिगुणात्मक प्रकृती घुसली आहे हे समजले की, तिच्यात काही अर्थ नाही हे लक्षात येऊन आपोआपच पिकाचे संरक्षण होते. चोविसाव्या अध्यायात ह्याचे निरुपण झाल्यावर मनावर असलेल्या प्रकृतीच्या प्रभावावर मात करण्यासाठी पंचवीसाव्या अध्यायात भगवंत सांगतात माणसाने मन निर्विचार करावे. निर्विचारी झालेल्या मनात गुणदोषांचे विचार येत नाहीत, त्यामुळे चित्तात त्यावर चिंतन होत नाही.

क्रमश:

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
×

.