व्हेनेझुएलाच्या अध्यक्षीय निवडणुकीत मादुरो विजयी
निकालाला विरोधी पक्षांनी नाकारले : आंदोलनाची तयारी
वृत्तसंस्था/ काराकस
व्हेनेझुएलात रविवारी झालेल्या अध्यक्षीय निवडणुकीत निकोलस मादुरो यांना विजयी घोषित करण्यात आले आहे. परंतु विरोधी पक्षांचे नेते या निकालाला विरा करण्याची तयारी करत आहेत. मादुरो यांना 51 टक्के मते तर मुख्य विरोधी उमेदवार एडमुंडो गोंजालेज यांना 44 टक्के मते मिळाल्याचे राष्ट्रीय निवडणूक परिषदेने सोमवारी पहाटे जाहीर केले.
मादुरो यांच्या निष्ठावंतांकडून नियंत्रित निवडणूक प्राधिकरणाने आतापर्यंत 30 हजार मतदान केंद्रांवरील अधिकृत मतदानाची आकडेवारी जारी केलेली नाही. याचमुळे विरोधकांनी या निकालाला मानण्यास नकार दिला आहे. तर विदेशी नेत्यांनी देखील या निकालाला मान्यता दिलेली नाही.
निवडणूक प्राधिकरणाने पुढील काही तासांमध्ये अधिकृत आकडेवारी जारी करण्याचे आश्वासन दिले आहे. मादुरो सरकारने जो निकाल जाहीर केला आहे, त्यावर विश्वास ठेवणे अवघड असल्याचे चिली या देशातील डाव्या पक्षाचे नेते गॅब्रियल बोरिक यांनी म्हटले आहे. घोषित करण्यात आलेला निकाल व्हेनेझुएलाच्या लोकांची इच्छा किंवा मतांना प्रतिबिंबित करत नसल्याने गंभीर चिंता असल्याचे अमेरिकेचे विदेशमंत्री एंटनी ब्लिंकेन यांनी टोकियो येथे बोलताना म्हटले आहे.
विदेशी शत्रूंवर आरोप
विजयाच्या घोषणेनंतर मादुरो यांनी अज्ञात विदेशी शत्रूंकडून मतदान प्रणालीला हॅक करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप केला. या देशाची शांतता भंग करण्याचा प्रयत्न पहिल्यांदाच करण्यात आलेला नाही. व्हेनेझुएलात हिंसा भडकविण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना शिक्षा होईल असा इशारा मादुरो यांनी दिला आहे.