मॅडिसन कीज पुन्हा टॉप टेनमध्ये
महिलांत साबालेन्काचे, पुरुषांत सिनेरचे अग्रस्थान कायम
वृत्तसंस्था/ न्यूयॉर्क
नुकत्याच झालेल्या ऑस्ट्रेलियन ओपन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेत महिला एकेरीचे पहिल्यांदाच जेतेपद मिळविलेल्या अमेरिकेच्या मॅडिसन कीजला डब्ल्यूटीए मानांकनात बढती मिळण्यास लाभ झाला असून तिने आता सातवा क्रमांक मिळवित टॉप टेनमध्ये स्थान मिळविले आहे.
ताज्या मानांकनात टॉप टेनमध्ये अमेरिकेच्या चौघींनी स्थान मिळविले असून त्यापैकी एक मॅडिसन कीज आहे. पुरुषांच्या एटीपी मानांकनात इटलीच्या जेनिक सिनेरने सलग दुसऱ्यांदा ऑस्ट्रेलियन ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकत अग्रस्थान कायम राखले आहे. गेल्या जूनपासून तो नंबर एक क्रमांकावर आहे. महिलांच्या टॉप टेनमध्ये कीजसह सामील असलेल्या अमेरिकन खेळाडूंत कोको गॉफ (तिसरा क्रमांक), जेसिका पेगुला (6 वा क्रमांक), एम्मा नेव्हारो (9 वा क्रमांक) यांचा समावेश आहे. नेव्हारोची एका स्थानाने घसरण झाली आहे.
ऑस्ट्रेलियन स्पर्धेत उपविजेतेपद मिळविलेल्या एरिना साबालेन्काने आपले अग्रस्थान कायम राखले आहे तर पोलंडची इगा स्वायटेक दुसऱ्या स्थानावर स्थिर आहे. ऑस्ट्रेलियन स्पर्धेत तिला कीजने उपांत्य फेरीत हरविले होते. चीनच्य झेंग किनवेनची तीन स्थानाने घसरण झाली असून ती आता आठव्या स्थानावर आहे तर पाओला बेडोसाने दोन स्थानांची प्रगती करीत दहावे स्थान मिळविले आहे. तिनेही उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली होती.
पुरुषांच्या मानांकनात पहिल्या चार खेळाडूंच्या क्रमवारीत कोणताही बदल झाला नाही. सिनेर पहिल्या, अलेक्झांडर व्हेरेव्ह दुसऱ्या, कार्लोस अल्कारेझ तिसऱ्या व टेलर फ्रिट्झ चौथ्या स्थानावर आहे. डॅनील मेदवेदेव्ह दोन स्थानांनी खाली उतरला असून तो आता 7 व्या नंबरवर आहे. ऑस्ट्रेलियन स्पर्धेत तो दुसऱ्या फेरीत पराभूत झाला होता. सर्बियाचा नोव्हॅक जोकोविच उपांत्य फेरीत दुखापतीमुळे निवृत्त झाला होता. त्याने एका स्थानाची बढती मिळवित सहावे स्थान घेतले आहे, नॉर्वेचा कॅस्पर रुड पाचव्या स्थानावर आहे तर टॉमी पॉल हा पुरुषांच्या टॉप टेनमधील नवा चेहरा आहे. उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारल्यामुळे त्याला नववे स्थान मिळविले असून हे त्याचे आजवरचे सर्वोच्च मानांकन आहे.