For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मॅडिसन कीज नवी ऑस्ट्रेलियन ग्रँडस्लॅम सम्राज्ञी

06:58 AM Jan 26, 2025 IST | Tarun Bharat Portal
मॅडिसन कीज नवी ऑस्ट्रेलियन ग्रँडस्लॅम सम्राज्ञी
Advertisement

वृत्तसंस्था / मेलबोर्न

Advertisement

अमेरिकेच्या 29 वर्षीय मॅडिसन कीज शनिवारी येथे झालेल्या ऑस्ट्रेलियन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेतील महिला एकेरीची नवी सम्राज्ञी ठरली. 2025 च्या टेनिस हंगामातील या पहिल्या ग्रँडस्लॅम स्पर्धेत कीजने बेलारुसच्या विद्यमान विजेत्या आणि यापूर्वी सलग दोनवेळा या स्पर्धेचे जेतेपद मिळविणाऱ्या आर्यना साबालेन्काचा तीन सेटस्मधील लढतीत पराभव केला. मॅडिसन कीजचे हे पहिले ग्रँडस्लॅम जेतेपद आहे.

शनिवारी या स्पर्धेतील महिला एकेरीचा अंतिम सामना खेळविण्यात आला. मात्र अमेरिकेच्या मॅडिसन कीजने बेलारुसच्या साबालेन्काला या स्पर्धेत जेतेपदाच्या हॅट्ट्रीकपासून वंचित केले. मॅडिसन कीजने साबालेन्काचा 6-3, 2-6, 7-5 अशा सेटसमध्ये पराभव करत जेतेपदाला गवसणी घातली. गुरुवारी या स्पर्धेत मॅडिसन कीजने पोलंडच्या द्वितीय मानांकित इगा स्वायटेकला पराभूत करुन अंतिम फेरीत प्रवेश मिळविला होता. 2005 नंतर या स्पर्धेत जेतेपद मिळविणारी मॅडिसन कीज ही पहिली अमेरिकन टेनिसपटू आहे. 2005 साली अमेरिकेच्या सेरेना विलियम्सने  जेतेपद पटकाविले होते. 19 वी मानांकित मॅडिसन कीज ही आपल्या वैयिक्तक टेसिन कारकिर्दीत दुसऱ्या प्रमुख स्पर्धेत अंतिम फेरीत खेळत होती. 2017 च्या अमेरिकन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेत मॅडिसन कीजने उपविजेतेपद पटकाविले होते. या स्पर्धेतील अंतिम सामन्यात झालेल्या पराभवामुळे बेलारुसच्या साबालेन्काला या ग्रँडस्लॅम स्पर्धेत जेतेपदाच्या हॅट्ट्रीकपासून वंचित व्हावे लागले तसेच तिला मार्टिना हिंगीसच्या विक्रमाशी बरोबरी करता आली नाही. 1997-99 या कालावधीत हिंगीसने ही स्पर्धा सलग तीनवेळा जिंकली होती.

Advertisement

  

टेनिस क्षेत्रामध्ये अधिक वयाच्या कालावधीत पहिल्यांदा ग्रँडस्लॅम जेतेपद जिंकणारी 29 वर्षीय मॅडिसन कीज ही दुसरी महिला टेनिसपटू ठरली आहे. 2015 साली अमेरिकन ग्रँडस्लॅम स्पर्धेत फ्लेव्हिया पिनेटाने आपल्या वयाच्या 33 व्या वर्षी ग्रँडस्लॅम जेतेपद पटकाविण्याचा विक्रम केला होता.

साबालेन्का आणि कीज यांच्यातील या अंतिम लढतीला प्रारंभ झाल्यानंतर पहिल्या सेटमध्ये मॅडिसन कीजने तीनवेळा साबालेन्काची सर्व्हिस भेदली. साबालेन्काने या सेटमध्ये 4 दुहेरी चुका आणि एकूण 13 अनियंत्रीत चूका केल्या.  साबालेन्काला या सेटमध्ये केवळ तीन गेम्स जिंकता आले. कीजने हा सेट 6-3 असा जिंकून आघाडी मिळविली. दुसऱ्या सेटमध्ये साबालेन्काने बेसलाईन खेळावर अधिक भर दिला होता. मात्र कीजला या सेटमध्ये अधिकवेळ आपली सर्व्हिस राखता आली नाही. साबालेन्काने दुसऱ्या सेटमध्ये एकूण 13 विजयी फटके मारले. साबालेन्काने दोनवेळा कीजशी सर्व्हिस भेदली आणि हा सेट 6-2 अशा जिंकून बरोबरी साधली. अपेक्षेप्रमाणे या लढतीतील तिसरा सेट अधिक चुरशीचा झाला. पण कीजचे फटके अचूक असल्याने साबालेन्काला ते परतविताना खूपच अवघड गेले आहे. कीजने या शेवटच्या सेटमध्ये साबलेन्काला वारंवार नेटजवळ खेचले. अखेर फोरहॅन्ड फटक्यावर कीजने साबालेन्काचे या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आणले.

या स्पर्धेत रविवारी इटलीचा विद्यमान विजेता जेनिक सिनेर आणि जर्मनीचा अॅलेक्सझांडेर व्हेरेव्ह यांच्यात पुरुष एकेरीच्या जेतेपदासाठी लढत होईल. सर्बियाचा टॉपसिडेड जोकोविचने उपांत्य फेरीचा सामना दुखापतीमुळे अर्धवट सोडून दिल्यामुळे व्हेरेव्हला अंतिम फेरी गाठण्याची संधी मिळाली. तर सिनेरने अमेरिकेच्या बेन शेल्टनचा उपांत्यफेरीत पराभव करत अंतिम फेरी गाठली आहे.

या स्पर्धेत कनिष्ट मुलांच्या एकेरीचे जेतेपद स्वीझर्लंडच्या हेन्री बर्नेटने पटकाविले. एकेरीच्या अंतिम सामन्यात 18 वर्षीय बर्नेटने अमेरिकेच्या बेंजामीन विलवर्थचा 6-3, 6-4 अशा सरळ सेट्समध्ये पराभव केला. स्वीसचे माजी टॉपसिडेड टेनिसपटू रॉजर फेडरर आणि वावरिंका हे आपले आदर्श असल्याची प्रतिक्रिया बर्नेटने व्यक्त केली. या स्पर्धेत कनिष्ट मुलींच्या एकेरीचे जेतेपद जपानच्या वेकेना सोनोबीने पटकाविले. अंतिम फेरीत सोनोबीने ख्रिस्टीना पेनीकोव्हाचा 6-0, 6-1 अशा सेट्समध्ये पराभव केला.

Advertisement
Tags :

.