मध्यप्रदेशच्या जवानाला चकमकीत हौतात्म्य
मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांच्याकडून श्रद्धांजली : हुतात्मा जवान आशिष शर्मा
वृत्तसंस्था/भोपाळ
मध्यप्रदेशातील नरसिंहपूर जिह्यातील बोहानी गावचे सुपुत्र निरीक्षक आशिष शर्मा बुधवारी नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीत हुतात्मा झाले. ते मध्य प्रदेशच्या विशेष नक्षलविरोधी हॉक फोर्सचा भाग होते. त्यांनी मध्य प्रदेश-छत्तीसगड-महाराष्ट्र सीमेवर बुधवारी सकाळी नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीवेळी त्यांना प्राणास मुकावे लागले. मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी आशिष शर्मा यांच्या हौतात्म्याबद्दल शोक व्यक्त करत श्रद्धांजली वाहिली. आशिष शर्मा हे एक धाडसी पोलीस अधिकारी होते. त्यांना दोन शौर्य पदके आणि अनेक वेळा पदोन्नती मिळाली होती.
फेब्रुवारी 2025 मध्ये बालाघाट जिह्यातील रौंडा जंगलात झालेल्या एका मोठ्या चकमकीत त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. छत्तीसगडमधील राजनांदगाव जिह्यातील बोरतलाब पोली स्टेशन परिसरातील कौहापानीजवळील जंगलात चकमक झाल्याचे सांगण्यात आले. मध्यप्रदेश आणि छत्तीसगड पोलिसांचे संयुक्त पथक नक्षलविरोधी मोहीमेत सहभागी झाले होते. याचदरम्यान नक्षलवाद्यांनी सुरक्षा दलावर हल्ला करताच जोरदार प्रत्युत्तर दिले. ही चकमक अनेक तास सुरू राहिली. यादरम्यान अनेक गोळ्या निरीक्षक आशिष शर्मा यांच्या शरीरात घुसल्यामुळे ते हुतात्मा झाले.