मधू कोडा यांची याचिका फेटाळली
कारावासाच्या शिक्षेला स्थगिती देण्यास नकार
► वृत्तसंस्था / नवी दिल्ली
झारखंडचे माजी मुख्यमंत्री मधू कोडा यांना सर्वोच्च न्यायालयाने दणका दिला आहे. कोळसा खाण घोटाळ्यात कोडा यांना झालेल्या कारावासाच्या शिक्षेला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी नकार दिला. झारखंडमध्ये आपल्याला विधानसभा निवडणुकीत भाग घ्यावयाचा असल्याने शिक्षेला स्थगिती द्यावी अशी मागणी करणारी याचिका कोडा यांनी सादर केली होती.
झारखंडच्या उच्च न्यायालयानेही त्यांची याचिका यापूर्वी फेटाळली आहे. उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देण्यासाठी कोडा यांनी सर्वोच्च न्यायालयात अपील याचिका सादर केली होती. मात्र, न्या. संजीव खन्ना यांच्या नेतृत्वातील पीठाने याचिका फेटाळली आहे. आपण राज्याचे माजी मुख्यमंत्री आहोत. आपण कारागृहात राहिल्यास आपल्या मतदारसंघातील मतदारांची हानी होईल असेही प्रतिपादन कोडा यांनी याचिकेत केले होते. तथापि, कोडा हे विद्यमान आमदार नसल्याने त्यांच्या मतदारांची हानी होईल, या युक्तिवाद स्वीकारार्ह नाही. तसेच त्यांना झालेली शिक्षा योग्य प्रकारे कायदेशीर कारवाई करुनच देण्यात आली आहे. त्यामुळे, केवळ निवडणूक लढविता यावी म्हणून शिक्षा रद्द करणे न्यायोचित नाही, असे न्या. संजीव खन्ना यांनी आपल्या निर्णयपत्रात स्पष्ट केले आहे.
दोन टप्प्यांमध्ये निवडणूक
झारखंड राज्यात लवकरच विधानसभा निवडणूक होणार आहे. या निवडणुकीच्या प्रक्रियेला प्रारंभ करण्यात आला असून 13 नोव्हेंबरला मतदानाचा प्रथम टप्पा होणार आहे. त्यानंतर 20 नोव्हेंबरला दुसऱ्या टप्प्यातील मतदान असून मतगणना 23 नोव्हेंबरला होणार आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडी आणि विरोधकांची आघाडी असा संघर्ष या राज्यात होत आहे. सध्या येथे झारखंड मुक्ती मोर्चा आणि काँग्रेस यांच्या युतीचे सरकार आहे. भारतीय जनता पक्षाने ऑल झारखंड स्टुडंट्स् युनियन, संयुक्त जनता दल आणि लोकजनशक्ती या पक्षांशी युती केली आहे.