Drone Shoot : भर पावसात घराजवळ अचानक ड्रोन पडला अन् एकच तारांबळ उडाली, नेमकं काय घडलं?
प्रशासनाने तो ताब्यात घेतला असून तपास सुरु आहे.
जत : भारत पाकिस्तान युध्दामुळे प्रचंड चर्चेत असणारे ड्रोन दिसले की मनात शंका येते. असाच काहीसा प्रसंग सांगलीतील जत येथे घडला आहे. सांगलीच्या जत तालुक्यातील बेळुंखी येथेही मंगळवारी रात्री ड्रोन पडल्याची माहिती मिळाली. ड्रोन सापडला असल्याचे समजताच प्रशासनाची तारांबळ उडाली. परंतु प्रत्यक्षात त्याठिकाणी जाऊन पाहणी केली असता, हा ड्रोन साध्या स्वरूपाचा असल्याचे निदर्शनास आले. प्रशासनाने तो ताब्यात घेतला असून तपास सुरु आहे.
अधिकची माहिती अशी, तालुक्यातील डफळापूर ते बाज रस्त्यावर असणाऱ्या बेळुंखी गावच्या हद्दीतील पाण्याच्या टाकीजवळ नानासो चव्हाण यांची शेती आहे. याच शेतीत त्यांचे राहते घर आहे. मंगळवारी रात्री तालुक्यात अवकाळीच्या पावसाचा जोर होता. अनेक भागात अवकाळीचा हलका पाऊस आणि वादळी वारे सुरु होते.
रात्री साडेआठच्या सुमारास याच वादळात चव्हाण यांच्या घराच्या अगदी समोरील बाजूस आकाशातून एक ड्रोन खाली पडला. त्याचा आवाज लाईट्स पाहून चव्हाण यांच्या घरचे घाबरले. परंतु काही काळात तो साध्या स्वरुपाचा ड्रोन असल्याचे लक्षात आले.
दरम्यान, भारत-पाक युध्दामुळे ड्रोनची सर्रास माहिती सर्वांना आहे. ड्रोन धोकादायक नसला तरी तात्काळ त्यांनी जत पोलीसांना कळवले. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस निरीक्षक संदीप कोळेकर, तहसीलदार प्रवीण धानोकर यांच्यासह पोलीस व महसुलच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जात ड्रोन ताब्यात घेतला. हा ड्रोन लग्न समारंभ, विविध कार्यक्रमांसाठी वापरतात त्यापैकी असल्याचे लक्षात आले. तरीही प्रशासनाने संबंधित ड्रोन ताब्यात घेवून त्याचा पुढील तपास सुरू केला आहे.
भीतीचे कारण नाही : संदीप कोळेकर
या घटनेसंदर्भात जतचे पोलीस निरीक्षक संदीप कोळेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा ड्रोन साधा असून त्याला केवळ कॅमेरा आहे. त्यानंतर तो महसुल विभागाच्या ताब्यात दिला. चोरीच्या उद्देशाने किंवा अन्य कुणीतरी तो खोडसाळणे हवेत सोडला असावा. त्याचा तपास आम्ही करत आहोत. ड्रोन कोणाचा आहे, कोणी सोडला, कुठून सोडला याचीही माहिती मिळवत आहोत.
यामध्ये काय शूट केले आहे याची तपासणी केली जाईल. कदाचित वादळी पावसात नियंत्रण सुटल्याने तो बेळुंखी येथे पडला असावा, असेही कोळेकर यांनी स्पष्ट केले. याबाबत कांही भीती बाळगण्याचे कारण नसल्याचे त्यांनी सांगितले. या घटनेची नोंद पोलीसांत झालेली नाही.