For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

लखनौचा विजयरथ दिल्लीने रोखला

06:58 AM Apr 13, 2024 IST | Tarun Bharat Portal
लखनौचा विजयरथ दिल्लीने रोखला
Advertisement

सहा गडी राखून दणदणीत विजय : सामनावीर कुलदीप यादवचे 3 बळी : जेक मॅकगर्क, ऋषभ पंतची फटकेबाजी

Advertisement

वृत्तसंख्या/ लखनौ

आयपीएलच्या 17 व्या हंगामात दिल्ली कॅपिटल्सने दुसरा विजय मिळवला. होम ग्राऊंडवर पहिल्यांदा फलंदाजी करुन मॅच जिंकणाऱ्या लखनौ सुपर जायंट्सला दिल्लीने सहा विकेटने पराभूत केले. प्रारंभी, आयुष बडोनीच्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर लखनौने 20 षटकात 7 बाद 167 धावा जमवित दिल्लीला विजयासाठी 168 धावांचे आव्हान दिले. यानंतर  दिल्लीने पदार्पणवीर जेक फ्रेझर मॅकगर्कच्या अर्धशतकाच्या जोरावर 4 गडी गमावून विजयावर शिक्कामोर्तब केला. दिल्लीचा हा सहा सामन्यातील दुसरा विजय असून गुणतालिकेत ते नवव्या स्थानी आहेत. पराभवानंतरही लखनौचा संघ सहा गुणासह चौथ्या स्थानी कायम आहे. दरम्यान, लखनौच्या फलंदाजीला भगदाड पाडणाऱ्या कुलदीप यादवला (20 धावांत 3 बळी) सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.

Advertisement

लखनौने विजयासाठी दिलेल्या 168 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीची सुरुवात खराब झाली. सलामीवीर डेव्हिड वॉर्नर 8 धावा करुन बाद झाला. यानंतर पृथ्वी शॉने काही आक्रमक फटके मारले, पण तोही मोठी खेळी करु शकला नाही. त्याने 22 चेंडूत 32 धावा केल्या. यानंतर ऋषभ पंत आणि नवोदित जेक फ्रेझर मॅकगर्क यांनी तुफानी शैलीत फलंदाजी केली. एकीकडे पंतने 24 चेंडूत 41 धावांची खेळी केली, त्याने 4 चौकार आणि 2 षटकार मारले. तर मॅकगर्कने 35 चेंडूत 55 धावा केल्या. त्याने 2 चौकार आणि 5 षटकारही मारले. या जोडीने तिसऱ्या गड्यासाठी 77 धावांची भागीदारी साकारत संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. ऋषभ व मॅकगर्क मोक्याच्या क्षणी बाद झाल्यानंतर दिल्ली कॅपिटल्सला ट्रिस्टन स्टब्स आणि शाय होपने 18.1 षटकांत विजय मिळवून दिला. स्टब्ज 15 तर शाय होप 11 धावांवर नाबाद राहिला.

लखनौचा दुसरा पराभव

लखनौ सुपर जायंट्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कर्णधार केएल राहुल आणि डीकॉक यांनी 17 चेंडूत 28 धावांची भागिदारी केली. खलील अहमदने डीकॉकला पायचीत केले. त्याने 13 चेंडूत 4 चौकारांसह 19 धावा जमविल्या. खलिल अहमदने लखनौला आणखी एक धक्का देताना देवदत्त पडिक्कलला 3 धावांवर पायचीत केले. डावातील आठव्या षटकात कुलदीप यादवने स्टोईनिसला शर्माकरवी झेलबाद केले. कुलदीपने आपल्या या षटकातील चौथ्या चेंडूवर निकोलस पूरनचा खाते उघडण्यापूर्वीच त्रिफळा उडविला. नंतर कुलदीप यादवने केएल राहुलला पंतकरवी झेलबाद केले. त्याने 22 चेंडूत 1 षटकार आणि 5 चौकारांसह 39 धावा जमविल्या. लखनौची स्थिती यावेळी 9.3 षटकात 5 बाद 77 अशी होती. इशांत शर्माने दीपक हुडाला वॉर्नरकडे झेल देण्यास भाग पाडले. त्याने 13 चेंडूत 10 धावा जमविल्या. मुकेशकुमारने कृणाल पंड्याला 3 धावांवर झेलबाद केल्याने लखनौची स्थिती 13 षटकात 7 बाद 94 अशी केविलवाणी झाली होती. लखनौचा संघ खूपच अडचणीत असताना बडोनी आणि अर्षद खान यांनी दमदार फलंदाजी केली. या जोडीने 7 षटकात अभेद्य 73 धावांची भागिदारी केल्याने लखनौला 167 धावांपर्यंत मजल मारता आली. बडोनीने 35 चेंडूत 1 षटकार आणि 5 चौकारांसह नाबाद 55 तर अर्षद खानने 16 चेंडूत 2 चौकारांसह नाबाद 20 धावा जमविल्या.

संक्षिप्त धावफलक - लखनौ 20 षटकात 7 बाद 167 (डीकॉक 19, केएल राहुल 39, दीपक हुडा 10, आयुष बडोनी नाबाद 55, अर्षद खान नाबाद 20, अवांतर 10, कुलदीप यादव 3-20, खलिल अहमद 2-41, इशांत शर्मा 1-36, मुकेशकुमार 1-41).

दिल्ली कॅपिटल्स : 18.1 षटकांत 4 बाद 170 (पृथ्वी शॉ 32, जॅक मॅकगर्क 55, ऋषभ पंत 41, स्टब्ज नाबाद 15, शाय होप नाबाद 11, रवी बिश्नोई 2 तर नवीन उल हक, यश ठाकुर प्रत्येकी एक बळी).

Advertisement
Tags :

.