For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

लखनौचा पंजाबवर धमाकेदार विजय

06:58 AM Mar 31, 2024 IST | Tarun Bharat Portal
लखनौचा पंजाबवर धमाकेदार विजय
Advertisement

पदार्पणवीर मयंक यादव ठरला हिरो : धवन-बेअरस्टोची शतकी भागीदारी व्यर्थ, लखनौ 21 धावांनी विजयी

Advertisement

वृत्तसंस्था/ लखनौ

आयपीएल क्रिकेट स्पर्धेतील शनिवारी झालेल्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्स संघाने आपला पहिला विजय मिळवला आहे. लखनौच्या अटल बिहारी वाजपेयी एकना स्टेडियमवर लखनौने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी केली आणि 199 धावांचा डोंगर उभारला. प्रत्युत्तरात पंजाबचा संघ केवळ 178 धावा करू शकला. लखनौने हा सामना 21 धावांनी सामना जिंकला. सामनावीर मयंक यादव आणि नंतर मोहसीन खान यांनी शानदार गोलंदाजी करत लखनौच्या विजयात महत्वपूर्ण भूमिका बजावली. लखनौचा हा दोन सामन्यातील पहिला विजय आहे तर पंजाबचा हा सलग दुसरा पराभव ठरला आहे.

Advertisement

लखनौने विजयासाठी दिलेले 200 धावांच्या आव्हानाचा पाठलाग पंजाबच्या सलामीवीरांनी तगडी सुरूवात करून दिली. कर्णधार शिखर धवनने स्वत: जबाबदारी घेतली अन् आक्रमक खेळी केली. तर त्याला जॉनी बेअरस्टोने खंबीर साथ दिली. 11 ओव्हरमध्ये पंजाबने 100 चा आकडा देखील पार केला. मात्र, निकोसलने डेब्यू मॅन मयंक यादवला बॉल सोपवला अन् सामन्याचं पारडे लखनौच्या दिशेने झुकले. मयंक यादवने जॉनी बेअरस्टो, प्रभसिमरन सिंग आणि जितेश शर्मा यांना तंबूत पाठवलं अन् पंजाबचा संघ अडचणीत सापडला. यानंतर मोहसिन खान पंजाबला दोन धक्के दिले अन् सामना रोमांचक स्थितीत आणला. पंजाबला अखेरच्या 2 ओव्हरमध्ये 48 धावांची गरज होती. मात्र, लियाम लिव्हिंगस्टोनला चमक दाखवता आली नाही. अखेर लखनौने सामना खिशात घातला. शिखर धवनने 50 चेंडूत 3 षटकार आणि 7 चौकारांच्या जोरावर 70 धावा केल्या. तर बेयरस्टोने 3 चौकार आणि 3 षटकार लगावत 29 चेंडूत 42 धावा केल्या. लिव्हिंगस्टोन 28 धावांवर नाबाद राहिला. लखनौकडून मयंक यादवने 3 तर मोहसिन खानने 2 गडी बाद केले.

डिकॉकचे शानदार अर्धशतक

या सामन्यात लखनौने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. डिकॉक, निकोलस पूरन आणि कृणाल पांड्या यांच्या फटकेबाजीच्या जोरावर लखनौने 20 षटकात 8 बाद 199 धावा जमवित पंजाबला 200 धावांचे तगडे आव्हान दिले. सलामीच्या डिकॉकने 38 चेंडूत 2 षटकार आणि 5 चौकारांसह 54 धावा जमविताना केएल राहुल समवेत सलामीच्या गड्यासाठी 23 चेंडूत 35 धावांची भागिदारी केली. राहुलने 9 चेंडूत 1 षटकार आणि 1 चौकारासह 15 धावा जमविल्या. देवदत्त पडीकल पुन्हा लवकर बाद झाला. त्याने 6 चेंडूत 2 चौकारांसह 9 धावा जमविल्या. स्टोइनिसने 12 चेंडूत 2 षटकारांसह 19 धावा केल्या. डिकॉक आणि पूरन यांनी चौथ्या गड्यासाठी 47 धावांची भर घातली. बदोनीने 8 धावा केल्या. कृणाल पांड्याने समयोचित फटकेबाजी केल्याने लखनौ संघाला 199 धावांपर्यंत मजल मारता आली. कृणाल पांड्याने 22 चेंडूत 2 षटकरा आणि 4 चौकारांसह नाबाद 43 धावा झोडपल्या. पंजाबतर्फे सॅम करनने 28 धावांत 3, अर्षदीप सिंगने 30 धावांत 2 तसेच रबाडा आणि राहुल चहर यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.

संक्षिप्त धावफलक - लखनौ सुपर जायंट्स 20 षटकात 8 बाद 199 (डिकॉक 54, केएल राहुल 15, पडीकल 9, स्टोइनिस 19, पूरन 42, बदोनी 8, कृणाल पांड्या नाबाद 43, बिस्नॉई 0, मोहसिन खान 2, नवीन उल हक 0, अवांतर 7, सॅम करन 3-28, अर्षदीप सिंग 2-30, रबाडा 1-38, राहुल चहर 1-42).

पंजाब किंग्स 20 षटकांत 5 बाद 178 (शिखर धवन 50 चेंडूत 70, बेअरस्टो 42, प्रभसिमरन सिंग 19, लिव्हिंगस्टोन नाबाद 28, मयंक यादव 27 धावांत 3 बळी, मोहसिन खान 2 बळी).

Advertisement
Tags :

.