For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

लखनौचा चेन्नईवर 8 गड्यांनी एकतर्फी विजय

06:58 AM Apr 20, 2024 IST | Tarun Bharat Portal
लखनौचा चेन्नईवर 8 गड्यांनी एकतर्फी विजय
Advertisement

सामनावीर केएल राहुल,  डीकॉक यांची अर्धशतकांसह 134 धावांची शतकी भागीदारी, जडेजाचे अर्धशतक वाया

Advertisement

वृत्तसंस्था/ लखनौ

सामनावीर व कर्णधार के. एल. राहुल आणि डी कॉक या सलामीच्या जोडीने 15 षटकात झळकविलेल्या 134 धावांच्या शतकी भागीदारीच्या जोरावर यजमान लखनौने चेन्नईचा 6 चेंडू बाकी ठेवून 8 गड्यांनी दणदणीत पराभव केला. स्पर्धेच्या गुणत्तक्त्यात लखनौ आणि चेन्नई या दोन्ही संघानी प्रत्येकी समान 8 गुण मिळविले असले तरी सरस धावसरासरीच्या आधारे चेन्नई तिसऱ्या तर लखनौ पाचव्या स्थानावर आहे.

Advertisement

रवींद्र जडेजाचे नाबाद अर्धशतक तसेच मोईन अली आणि धोनी यांनी अंतिम टप्प्यात केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर शुक्रवारी येथे खेळविण्यात आलेल्या सामन्यात चन्नई सुपर किंग्जने यजमान लखनौ सुपर जायंट्सला विजयासाठी 177 धावांचे आव्हान दिले होते. त्यानंतर लखनौने 19 षटकात 2 बाद 180 धावा जमवित हा सामना 8 गड्यांनी जिंकत चौथा विजय नोंदवला.

शतकी सलामी

लखनौच्या डावामध्ये कर्णधार के. एल. राहुल आणि डी कॉक यांनी दमदार फलंदाजी करताना 15 षटकात 134 धावांची भागीदारी केली. 15 व्या षटकात चेन्नईच्या मुस्तफिजुर रेहमानने डी कॉकला झेलबाद केले. त्याने 43 चेंडूत 1 षटकार आणि 5 चौकारासह 54 धावा झळकविल्या. 18 व्या षटकातील पहिल्याच चेंडूवर पथिरानाने राहुलला जडेजाकरवी झेलबाद केले. जडेजाने डावीकडे सुर मारत हा अप्रतिम झेल टिपला. राहुलने 53 चेंडूत 3 षटकार आणि 9 चौकारासह 82 धावा जमविल्या. राहुल बाद झाला त्यावेळी लखनौला विजयासाठी 16 धावांची जरूरी होती. पुरन आणि स्टोईनीस यांनी 6 चेंडू बाकी असताना विजयाचे सोपस्कार पूर्ण केले. पुरनने 12 चेंडूत 1 षटकार आणि 3 चौकारासह नाबाद 23 तर स्टोईनीसने 7 चेंडूत 1 चौकारासह नाबाद 8 धावा जमविल्या. लखनौला अवांतर 13 धावा मिळाल्या.

लखनौने पॉवरप्लेच्या 6 षटकात 54 धावा जमविल्या. लखनौचे अर्धशतक 32 चेंडूत, शतक 65 चेंडूत तर दीडशतक 91 चेंडूत फलकावर लागले. राहुलने आपले अर्धशतक 31 चेंडूत 3 षटकार आणि 5 चौकारांच्या मदतीने तर डी कॉकने आपले अर्धशतक 1 षटकार आणि 4 चौकारांच्या मदतीने 41 चेंडूत पूर्ण केले. लखनौच्या डावात 5 षटकार आणि 18 चौकार नोंदविले गेले. चेन्नईतर्फे पथिराना आणि मुस्तफिजुर रेहमान यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.

चेन्नईची खराब सुरुवात

तत्पूर्वी, आयपीएल क्रिकेट स्पर्धेतील 34 व्या सामन्यात लखनौने नाणेफेक जिंकून चेन्नईला प्रथम फलंदाजी दिली. दुसऱ्या षटकात लखनौच्या मोहसीन खानने रचिन रवींद्रचा खाते उघडण्यापूर्वीच त्रिफळा उडविला. त्यानंतर कर्णधार ऋतुराज गायकवाडने 13 चेंडूत 1 चौकारासह 17 धावा जमविल्या. यश ठाकुरने त्याला झेलबाद केले. अजिंक्य रहाणे व जडेजा संघाचा डाव सावरतील असे वाटत असताना कृणाल पंड्याने रहाणेला त्रिफळाचीत केले. त्याने 24 चेंडूत 1 षटकार आणि 5 चौकारासह 36 धावा जमविताना जडेजासमवेत तिसऱ्या गड्यासाठी 35 धावांची भागीदारी केली. बहरात असलेला शिवम दुबे स्टोईनीसच्या गोलंदाजीवर राहुलकरवी झेलबाद झाला. त्याने 3 धावा जमविल्या. कृणाल पंड्याने रिजवीला 1 धावेवर यष्टीचित केले. चन्नईची स्थिती यावेळी 5 बाद 90 अशी होती.

रवींद्र जडेजा आणि मोईन अली यांनी 6 व्या गड्यासाठी 33 चेंडूत 51 धावांची भागीदारी केली. बिश्नोईने मोईन अलीला झेलबाद केले. त्याने 20 चेंडूत 3 षटकारांसह 30 धावा जमविल्या. जडेजा आणि धोनी यानी 7 व्या गड्यासाठी अभेद्य 35 धावांची भागीदारी केली. धोनीने 9 चेंडूत 2 षटकार आणि 3 चौकारासह नाबाद 28, तर जडेजाने 40 चेंडूत 1 षटकार आणि 5 चौकारासह नाबाद 57 धावा झळकविल्या. चेन्नईला अवांतर 4 धावा मिळाल्या. त्यांच्या डावामध्ये 7 षटकार आणि 14 चौकार नोंदविले गेले. लखनौतर्फे कृणाल पंड्याने 2, तर मोहसीन खान, यश ठाकुर, बिश्नोई आणि स्टोईनीस यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.

चन्नईने पॉवरप्लेच्या 6 षटकात 51 धावा जमविताना 2 गडी गमविले. चेन्नईचे अर्धशतक 35 चेंडूत तर शतक 86 चेंडूत, दीडशतक 110 चेंडूत फलकावर लागले. जडेजाने 1 षटकार आणि 5 चौकारासह 34 चेंडूत अर्धशतक झळकविले. चेन्नईच्या डावातील 11.1 षटकांचा खेळ झाला असताना चेन्नईने अजिंक्य रहाणेच्या जागी समीर रिजवीला इम्पॅक्ट खेळाडू म्हणून मैदानात आणले. चेन्नईने शेवटच्या 4 षटकात 63 धावा झोडपल्या. मोईन अलीने बिश्नोईच्या एका षटकात 3 षटकार खेचले. तर मोहसीन खानच्या डावातील 19 व्या षटकात 15 धावा घेण्यात आल्या. त्यामध्ये 4 वाईड, 1 षटकार आणि 1 चौकाराचा समावेश आहे. डावातील शेवटच्या षटकात जडेजा व धोनी यांनी चेन्नईने 19 धावा फटकावल्या.

माहीचा अफलातून षटकार

शुक्रवारी लखनौ विरुद्ध सामन्यात फलंदाजीला आलेल्या धोनीने 28 धावांच्या खेळीमध्ये एक असा षटकार ठोकला जो त्याच्या संपूर्ण आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत क्वचितच कोणी पाहिला असेल. या शॉटचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. डावाच्या 17 व्या षटकात फलंदाजीला आलेल्या धोनीने एकेरी धाव घेत आपले खाते उघडले आणि तिसऱ्या चेंडूवर चौकार मारला. पुढच्याच चेंडूवर त्याने कारकिर्दीत पहिल्यांदाच असा शॉट खेळला, जो पाहून एकना स्टेडियममध्ये बसलेल्या प्रत्येकाने एकच जल्लोष केला. डावाचे 19 वे षटक टाकण्राया मोहसिन खानच्या तिसऱ्या चेंडूवर त्याने विकेट सोडून डाव्या बाजूला जात यष्टीच्या मागे षटकार लगावला. माहीचा हा षटकार सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

संक्षिप्त धावफलक : चेन्नई सुपर किंग्ज 20 षटकात 6 बाद 176 (रहाणे 36, गायकवाड 17, जडेजा नाबाद 57, मोईन अली 30, धोनी नाबाद 28, अवांतर 4, कृणाल पंड्या 2-16, मोहसीन खान, यश ठाकुर, बिश्नोई, स्टोईनीस प्रत्येकी 1 बळी.) लखनौ सुपर जांयट्स 19 षटकात 2 बाद 180 (डी कॉक 54, के. एल. राहुल 82, पुरन नाबाद 23, स्टोईनीस नाबाद 8, अवांतर 13,  मुस्तफिजुर रेहमान आणि पथिराना प्रत्येकी 1 बळी).

Advertisement
Tags :

.