चेन्नई सुपर किंग्जसमोर आज लखनौची कसोटी
वृत्तसंस्था /लखनौ
लखनौ सुपर जायंट्सची आज शुक्रवारी येथे त्यांच्या घरच्या मैदानावर चेन्नई सुपर किंग्जशी गाठ पडणार असून यावेळी अनेक लखनौला काही प्रश्नांचे उत्तर मिळवावे लागेल. दुसरीकडे, एकना स्टेडियमच्या खेळपट्टीवर आपल्या विविधांगी माऱ्याचा पुरेपूर वापर करण्याचा प्रयत्न चेन्नई करेल. दोन्ही संघांनी त्यांच्या मागील दोन सामन्यांमध्ये वेगवेगळ्या निकालांचा सामना केला आहे. महेंद्रसिंह धोनीची साथ लाभलेला ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखालील संघाने लागोपाठ विजय मिळविलेले आहेत, तर के. एल. राहुलच्या नेतृत्वाखालील एलएसजीला लागोपाठ पराभव स्वीकारावे लागले आहेत. लखनौच्या फलंदाजीत दम असूनही त्यांच्यात आत्मविश्वासाची उच्च पातळी दिसलेली नाही. चेन्नईच्या माऱ्याचा आज ते कसा सामना करतात ते पाहावे लागेल. कारण शेवटच्या षटकांत मथीशा पाथिरानाच्या यॉर्कर्सना तोंड देणे हे कठीण जात असते, तर मुस्तफिझूर रेहमानकडे कटर्स टाकण्याच्या बाबतीत विविधता आहे.
कॉनवेच्या जागी वेगवान गोलंदाज ग्लीसन
गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्जने इंग्लिश वेगवान गोलंदाज रिचर्ड ग्लीसनला न्यूझीलंडचा दुखापतग्रस्त सलामीवीर डेव्हॉन कॉनवेच्या जागी संघात निवडले आहे. फेब्रुवारीमध्ये ऑस्ट्रेलियाविऊद्धच्या टी-20 मालिकेदरम्यान कॉनवेच्या डाव्या हाताचा अंगठा फ्रॅक्चर झाला होता आणि त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. आठ आठवडे बाहेर राहण्याची अपेक्षा असलेला कॉनवे गेल्या महिन्यात स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच या हंगामात अनुपलब्ध असेल याची पुष्टी झाली होती. ग्लीसनसाठी ही पहिलीच आयपीएल असून तो इंग्लंडतर्फे सहा टी-20 सामने खेळलेला आहे. त्यात त्याने नऊ बळी घेतलेले आहेत.
►चेन्नई सुपर किंग्ज : ऋतुराज गायकवाड (कर्णधार), एम. एस. धोनी, अरावेली अवनीश, रिचर्ड ग्लीसन, अजिंक्य रहाणे, शेख रशीद, मोईन अली, शिवम दुबे, आर. एस. हंगरगेकर, रवींद्र जडेजा, अजय जाधव मोंडल, डॅरेल मिचेल, रचिन रवींद्र, मिचेल सँटनर, निशांत सिद्धू, दीपक चहर, तुषार देशपांडे, मुकेश चौधरी, मुस्तफिझूर रेहमान, मथीशा पथीराना, सिमरजित सिंग, प्रशांत सोळंकी, शार्दुल ठाकुर, महीश थीक्षाना, समीर रिझवी.
►लखनौ सुपर जायंट्स : के. एल. राहुल (कर्णधार), क्विंटन डी कॉक, निकोलस पूरन, आयुष बडोनी, काइल मेयर्स, मार्कस स्टोइनिस, दीपक हुडा, देवदत्त पडिक्कल, रवी बिश्नोई, नवीन-उल-हक, कृणाल पंड्या, युद्धवीर सिंग, प्रेरक मंकड, यश ठाकुर, अमित मिश्रा, शामर जोसेफ, मयांक यादव, मोहसीन खान, के. गौतम, शिवम मावी, अर्शीन कुलकर्णी, एम. सिद्धार्थ, अॅश्टन टर्नर, मॅट हेन्री, मोहम्मद अर्शद खान.
सामन्याची वेळ : सायंकाळी 7.30 वा.
थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स नेटवर्क, जिओ सिनेमा अॅप