For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

दिल्ली कॅपिटल्सपुढे आज लखनौ सुपर जायंट्सचे आव्हान

06:10 AM Apr 12, 2024 IST | Tarun Bharat Portal
दिल्ली कॅपिटल्सपुढे आज लखनौ सुपर जायंट्सचे आव्हान
Advertisement

वृत्तसंस्था /लखनौ

Advertisement

दिल्ली कॅपिटल्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात आज शुक्रवारी ‘आयपीएल’चा सामना होणार असून दिल्लीच्या गोलंदाजांना लखनौविऊद्ध जोरदार कामगिरी करून दाखवावी लागेल. एकंदरित पाहता लखनौचे पारडे भारी दिसत असून गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर असलेला हा संघ सर्व विभागांत चांगला दिसत आहे. ताशी 150 किलोमीटरांपेक्षा जास्त वेगाने गोलंदाजी करणारा धडाकेबाज वेगवान गोलंदाज मयंक यादव याला मात्र दुखापतीमुळे हा सामना गमवावा लागण्याची शक्यता आहे. 21 वर्षीय यादवने गुजरात टायटन्सविऊद्ध मैदानाबाहेर जाण्यापूर्वी फक्त एक षटक टाकले. यादवच्या अनुपस्थितीत आणखी एक वेगवान गोलंदाज यश ठाकूरने गुजरात टायटन्सविऊद्ध पाच बळी घेतले. त्याला नवीन-उल-हक, कृणाल पंड्या आणि लेगस्पिनर रवी बिश्नोई यांच्यासह इतरांची साथ असेल. एलएसजीकडे क्विंटन डी कॉक आणि के. एल. राहुल ही मजबूत सलामीची जोडी आहे. डी कॉकने दोन अर्धशतके झळकावली आहेत, परंतु राहुलला अद्याप आपली सुऊवात मोठ्या डावात बदलता आलेली नाही. आक्रमक निकोलस पूरनही चांगल्या फॉर्ममध्ये आहे. लखनौ संघासाठी मुख्य चिंतेचा विषय देवदत्त पडिक्कल आहे, जो अद्याप दुहेरी आकड्यातील धावसंख्या गाठू शकलेला नाही.

दुसरीकडे दिल्लीची बिकट स्थिती कोलकाता नाईट रायडर्सने केलेल्या 106 धावांच्या पराभवातून स्पष्ट झाली आहे. संघर्ष करणाऱ्या मुंबई इंडियन्सविरुद्ध झालेल्या ताज्या पराभवामुळे ते उणे 1.370 अशा सर्वांत खराब निव्वळ धावसरासरीसह गुणतालिकेत तळाशी पोहोचले आहेत. धार नसलेला वेगवान मारा ही त्यांच्यासाठी प्राथमिक चिंतेची बाब आहे. खलील अहमद आणि इशांत शर्मा यांच्यावर पुन्हा एकदा ती जबाबदारी असेल्.  पण ही जोडी सातत्यपूर्ण कामगिरी करू शकलेली नाही. मुकेश कुमार दुखापतीतून पुनरागमन करेल अशी अपेक्षा आहे, पण त्यानेही काही चमकदार कामगिरी केलेली नाही. मध्यमगती गोलंदाज सुमित कुमार आणि रसिख दार यांचा डी कॉक, स्टॉइनिस आणि पूरन यांच्यासमोर टिकाव लागणार नाही. त्यातच एन्रिक नॉर्टजे दुखापतीतून बाहेर पडल्यापासून प्रभाव पाडू शकलेला नाही. त्याने चार लढतींत 13.43 च्या सरासरीने धावा दिल्या आहेत. कर्णधार रिषभ पंत आणि ट्रिस्टन स्टब्स यांचा फॉर्म वगळता दिल्लीच्या मोहिमेत त्यांना दिलासा देणारे असे काही नाही. पृथ्वी शॉने काही प्रमाणात धावा काढलेल्या असल्या, तरी वरच्या फळीत त्याने आणखी प्रभावी कामगिरी करून दाखविणे गरजेचे आहे. आणखी काही करण्याची गरज आहे. अभिषेक पोरेल वगळता अन्य कोणत्याही उदयोन्मुख भारतीय खेळाडूंनी चांगली कामगिरी केलेली नाही. यामुळे त्यांना परदेशी खेळाडूंवर जास्त अवलंबून राहावे लागलेले असून ते वेळेप्रसंगी गडबडलेले आहेत.

Advertisement

दिल्ली कॅपिटल्स : रिषभ पंत (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, पृथ्वी शॉ, यश धूल, अभिषेक पोरेल, अक्षर पटेल, ललित यादव, मिचेल मार्श, प्रवीण दुबे, विकी ओस्तवाल, एन्रिक नॉर्टजे, कुलदीप यादव, जेक फ्रेजर-मॅकगर्क, खलील अहमद, इशांत शर्मा, मुकेश कुमार, ट्रिस्टन स्टब्स, रिकी भुई, कुमार कुशाग्र, रसिख दार, रिचर्डसन, सुमित कुमार, स्वस्तिक चिकारा, शाई होप.

लखनौ सुपर जायंट्स : के. एल. राहुल (कर्णधार), क्विंटन डी कॉक, निकोलस पूरन, आयुष बडोनी, काइल मेयर्स, मार्कस स्टॉइनिस, दीपक हुडा, देवदत्त पडिक्कल, रवी बिश्नोई, नवीन-उल-हक, कृणाल पंड्या, युद्धवीर सिंग, प्रेरक मंकड, यश ठाकूर, अमित मिश्रा, शामर जोसेफ, मयंक यादव, मोहसीन खान, के. गौथम, अर्शिन कुलकर्णी, एम. सिद्धार्थ, अॅश्टन टर्नर, मॅट हेन्री, मोहम्मद अर्शद खान.

सामन्याची वेळ : संध्याकाळी 7.30 वा.

थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स नेटवर्क, जिओ सिनेमा अॅप

Advertisement
Tags :

.