पंजाब प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर
आरसीबीचा विजयी चौकार, प्ले ऑफच्या आशा कायम : सामनावीर विराटची 92 धावांची शानदार खेळी, पाटीदारचेही अर्धशतक, सिराजचे 3 बळी
वृत्तसंस्था /धरमशाला
करो या मरो च्या सामन्यात आरसीबीने पंजाबचा 60 धावांनी दारुण पराभव केला. आरसीबीने प्रथम फलंदाजी करताना विराट कोहली व रजत पाटीदारच्या धमाकेदार खेळीच्या जोरावर 241 धावांचा डोंगर उभारला. प्रत्युत्तरादाखल पंजाबचा संघाचा डाव 181 धावांवर संपुष्टात आला. या पराभवासह पंजाबचे यंदाच्या हंगामातील आव्हान संपुष्टात आले असून आरसीबीने मात्र विजयासह आपले आव्हान कायम राखले आहे. आरसीबीचे 12 सामन्यात 10 गुण आहेत. प्ले ऑफसाठी त्यांना पुढील दोनही सामन्यात विजय मिळवावा लागेल. याशिवाय, इतर संघाच्या कामगिरीवर त्यांना अवलंबून रहावे लागणार आहे. आरसीबीने दिलेल्या 242 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पंजाबची सुरुवात खराब झाली. सलामी फलंदाज प्रभसिमरन सहा धावा काढून बाद झाला. पण त्यानंतर जॉनी बेअरस्टो आणि रॉस्यू यांनी फटकेबाजी केली. पंजाबने पहिल्या सहा षटकात दोन विकेटच्या मोबदल्यात 75 धावा चोपल्या होत्या. जॉनी बेयरस्टो 16 चेंडूत 27 धावा काढून बाद झाला. एका बाजूला विकेट पडत असताना दुसऱ्या बाजूला रॉस्यू वादळी फलंदाजी करत होता. रॉस्यूने 27 चेंडूमध्ये 61 धावांचा पाऊस पाडला. त्याने आपल्या खेळीमध्ये तीन षटकार आणि नऊ चौकार ठोकले. रॉस्यूने जॉनी बेअरस्टो आणि शशांक सिंह यांच्यासोबत भागिदारी करत विजयाच्या आशा जिवंत ठेवल्या. पण तो बाद झाल्यानंतर पंजाबच्या फलंदाजांनी एकापाठोपाठ एक विकेट फेकल्या.
मोक्याच्या क्षणी शशांक सिंह धावबाद झाला. विराट कोहलीने टाकलेल्या अचूक थ्रोमुळे फॉर्मात असलेल्या शशांक सिंहला तंबूत जावे लागले. शशांकने 19 चेंडूमध्ये 37 धावांची खेळी केली. जितेश शर्मा 5 आणि लियाम लिव्हिंगस्टोनला खातेही उघडता आले नाही. सॅम करन याने 16 चेंडूत 22 धावांची खेळी केली. त्यामध्ये दोन चौकार ठोकले. आषुतोश शर्मा फक्त आठ धावा काढून बाद झाला. हर्षल पटेल यालाही खाते उघडता आले नाही. अर्शदीप सिंह चार धावा काढून बाद झाला. पंजाबचा डाव 17 षटकांत 181 धावांवर आटोपला. सिराजने सर्वाधिक 3 गडी बाद केले तर स्वप्नील सिंह, फर्ग्युसन व कर्ण शर्मा यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. पंजाबचा कर्णधार सॅम करनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. धर्मशालाच्या मैदानावर आरसीबीची सुरुवात अतिशय खराब झाली. पंजाबकडून पदार्पण करणाऱ्या विद्वात कवेरप्पाने आरसीबीला सुरुवातीलाच दोन धक्के दिले. त्याने फाफ डु प्लेलिस आणि विल जॅक्स यांना स्वस्तात तंबूत परतले. डु प्लेलिसने 9 तर विल जॅक्सने 12 धावा केल्या. लागोपाठ दोन विकेट गेल्यानंतर विराट कोहली व रजत पाटीदारने संघाचा डाव सावरला. दोघांनी 32 चेंडूमध्ये 76 धावांची झंझावती भागीदारी केली. पाटीदारने 23 चेंडूमध्ये 55 धावांचा पाऊस पाडला. या खेळीमध्ये त्याने सहा खणखणीत षटकार ठोकले, तर तीन चौकार लगावले. पाटीदारला सॅम करनने बाद करत ही जोडी फोडली.
विराटचे शतक हुकले
पाटीदार बाद झाल्यानंतर विराटने कॅमरुन ग्रीनसोबत 46 चेंडूमध्ये 92 धावांची भागीदारी साकारली. या जोडीने पंजाबच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. विराट 92 धावांची खेळी केली. त्याचे शतक 8 धावांनी हुकले. मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात विराट अर्शदीपच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्याने सहा षटकार आणि सात चौकारांचा पाऊस पाडला. यानंतर ग्रीनने 27 चेंडूत 46 धावांची खेळी साकारली तर दिनेश कार्तिकने आक्रमक खेळताना अवघ्या 7 चेंडूत 18 धावा केल्या. यामुळे आरसीबीने 20 षटकांत 7 बाद 241 धावांचा डोंगर उभा केला. लोमोरला भोपळाही फोडता आला नाही तर स्वप्नील सिंह 1 धावेवर नाबाद राहिला. पंजाबकडून हर्षल पटेलने शानदार गोलंदाजी करताना 38 धावांत 3 बळी घेतले तर पदार्पणवीर कवेरप्पाने 2 खेळाडूंना तंबूत धाडले.
संक्षिप्त धावफलक
रॉयल चँलेजर्स बेंगळूर 20 षटकात 7 बाद 241 (विराट कोहली 47 चेंडूत 92, रजत पाटीदार 23 चेंडूत 55, कॅमरुन ग्रीन 46, दिनेश कार्तिक 18, हर्षल पटेल 38 धावांत 3 बळी, कवेरप्पा 2 बळी, अर्शदीप व सॅम करन प्रत्येकी एक बळी). पंजाब किंग्स 17 षटकांत सर्वबाद 181 (जॉनी बेअरस्टो 27, रॉस्यू 61, शशांक सिंग 37, सॅम करन 22, मोहम्मद सिराज 3 बळी, स्वप्नील सिंह, फर्ग्युसन, कर्ण शर्मा प्रत्येकी दोन बळी).