लखनौने विजयाचे खाते उघडले, हैदराबादला होमग्राऊंडवर लोळवले
आयपीएल 2025 : लखनौचा 5 गड्यांनी विजय : शार्दुल, पूरन, मार्शच्या वादळात हैदराबादचे सपशेल लोटांगण
वृत्तसंस्था/हैदराबाद
आयपीएलच्या 18 व्या हंगामात लखनौ सुपरजायंट्सने आपला पहिला विजय नोंदवला. गुरुवारी, संघाने सनरायझर्स हैदराबादला त्यांच्या घरच्या मैदानावर 5 विकेट्सने पराभूत केले. 34 धावांत 4 बळी घेणारा शार्दुल ठाकुर सामनावीर ठरला. प्रथम फलंदाजी करताना हैदराबादने 20 षटकांत 9 गडी गमावत 190 धावा केल्या. यानंतर लखनौने विजयासाठीचे लक्ष्य अवघ्या 16.1 षटकांतच पूर्ण करत विजयाला गवसणी घातली.
हैदराबादने विजयासाठी दिलेल्या 191 धावांचा पाठलाग करताना लखनौचा सलामीवीर मार्करम स्वस्तात बाद झाला. त्याला मोहम्मद शमीने बाद केले. यानंतर मिचेल मार्श व निकोलस पूरन यांनी 116 धावांची भागीदारी करत लखनौच्या विजयाचा पाया रचला. या दोघांनी हैदराबादच्या गोलंदाजांचा समाचार घेताना तुफानी फटकेबाजी केली. निकोलस पूरनने पुन्हा एकदा विस्फोटक खेळीचा नमुना सादर केला. पूरनने 26 चेंडूत 6 चौकार आणि 6 षटकारांसह 70 धावांची खेळी केली. तर मिचेल मार्शनेही त्याला चांगली साथ देताना 31 चेंडूत 7 चौकार व 2 षटकारासह 52 धावांची खेळी साकारली. ही जोडी लागोपाठ बाद झाल्यानंतर ऋषभ पंतने 15 धावांची खेळी केली, तर बदोनी 6 धावा करत बाद झाला. यानंतर मिलरने विजयी चौकार मारत 13 धावा केल्या. तर अब्दुल समदने 8 चेंडूत 2 चौकार आणि 2 षटाकारांसह महत्त्वपूर्ण 22 धावांची विस्फोटक खेळी करत संघाला 24 चेंडू राखून विजय मिळवून दिला.
होमग्राऊंडवर हैदराबादच्या पदरी निराशा
सुपर जायंट्सचा कर्णधार रिषभ पंतने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हैदराबादच्या डावाची सुरुवात खराब झाली. अभिषेक शर्मा आणखी एकदा फेल ठरला आणि त्याने फक्त सहा चेंडूंमध्ये सहा धावा केल्या. मागील सामन्यांमध्ये शतक झळकावणाऱ्या ईशान किशनला भोपळाही फोडता आला नाही. यानंतर ट्रेव्हिस हेड व नितीश कुमार रे•ाr यांनी अर्धशतकी भागीदारी करत संघाचा डाव सावरला. हेडने 28 चेंडूत 5 चौकार व 3 षटकारासह सर्वाधिक 47 धावांची खेळी केली तर नितीश कुमार रे•ाrने 32 धावांचे योगदान दिले. रे•ाrला रवि बिश्नोईने बाद करत ही जोडी फोडली.
अनिकेत वर्मा, क्लासेनची फटकेबाजी
डावखुरा फलंदाज हेन्रिक क्लासेनने 17 चेंडूत 26 धावांची वादळी खेळी केली तर अनिकेत वर्माने 5 षटकारासह 36 धावा फटकावल्या. त्याने लखनौच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई करताना संघाला दीडशेपार नेले. याशिवाय, कर्णधार पॅट कमिन्सने 4 चेंडूत 3 षटकारासह 18 तर हर्षल पटेलने 12 धावा केल्या.
संक्षिप्त धावफलक
सनरायजर्स हैदराबाद 20 षटकांत 9 बाद 190 (ट्रेव्हिस हेड 47, नितीश कुमार रे•ाr 32, क्लासेन 26, अनिकेत वर्मा 36, पॅट कमिन्स 18, हर्षल पटेल नाबाद 12, शार्दुल ठाकुर 34 धावांत 4 बळी, आवेश खान, बिश्नोई, प्रिन्स यादव प्रत्येकी एक बळी)
लखनौ सुपर जायंट्स 16.1 षटकांत 5 बाद 193 (मिचेल मार्श 52, मार्करम 1, निकोलस पूरन 70, रिषभ पंत 15, मिलर नाबाद 13, अब्दुल समद नाबाद 22, पॅट कमिन्स 2 बळी, शमी, झाम्पा व हर्षल पटेल प्रत्येकी एक बळी).