लखनौ - मुंबई आज आमनेसामने
राहुलला सिद्ध करण्याची संधी
वृत्तसंस्था/ लखनौ
टी-20 विश्वचषकासाठी भारतीय संघाची निवड जवळ आलेली असल्याने आज मंगळवारी येथे लखनौ सुपर जायंट्स व मुंबई इंडियन्स यांच्यात लढत होईल तेंव्हा लखनौचा कर्णधार के. एल. राहुलला भारतीय संघातील दुसऱ्या यष्टिरक्षकाच्या जागेवरील आपला दावा भक्कम करण्याची अंतिम संधी असेल. .
टी-20 क्रिकेटमध्ये राहुलचा स्ट्राइक रेट हा नेहमीच वादाचा मुद्दा राहिला आहे. पॉवरप्लेमध्ये मैदानावरील निर्बंधांचा फायदा असूनही राहुलने आयपीएलमध्ये अनेकदा संथगतीने डावाची सुऊवात केलेली आहे. तथापि, एलएसजीच्या कर्णधाराने या हंगामात गिअर बदलण्यात यश मिळविले आहे. यंदा त्याने 144.27 च्या स्ट्राइक रेटने 378 धावा केल्या आहेत. तरीही तो रिषभ पंत (160.60) आणि संजू सॅमसन (161.08) यांच्यापेक्षा मागे आहे.
पुनरागमन केलेल्या पंतने जूनमध्ये होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेसाठीच्या संघातील पहिल्या यष्टिरक्षकाचे स्थान मिळविल्यात जमा आहे. चांगले यष्टिरक्षण आणि फलंदाजीतील धडाकेबाज खेळी यांच्या जोरावर सॅमसनने देखील स्वत:चा दावा मजबूत बनविला आहे. राजस्थान रॉयल्ससाठी त्याने मॅच-विनिंग खेळी केलेल्या आहेत. अशा परिस्थितीत राहुलने अधिक निर्भयपणे खेळण्याची आणि मैदानावरील निर्बंधांचा फायदा घेण्याची गरज आहे. त्यामुळे भारतीय संघात त्याच्या निवडीची शक्यताच वाढणार नाही, तर लखनौला 200 पेक्षा जास्त धावा काढण्यासही मदत होईल.
लखनौला राजस्थान रॉयल्सकडून 7 गड्यांनी पराभव स्वीकारावा लागलेला आहे. आज मुंबई इंडियन्सविरुद्ध क्विंटन डी कॉक, मार्कस स्टोइनिस आणि निकोलस पूरन या त्रिकुटावर मोठी धावसंख्या उभारण्याच्या दृष्टीने फटकेबाजी करण्याची जबाबदारी असेल. संघर्ष करणाऱ्या मुंबईच्या गोलंदाजीचा ते निश्चितच फायदा उठवू पाहतील. गुणतालिकेत मुंबई इंडियन्स नवव्या स्थानावर आहेत. स्पर्धेतील आव्हान जिवंत राहण्यासाठी त्यांना सर्व सामने जिंकणे आवश्यक आहे. यासाठी त्यांना एक संघ म्हणून सर्वंकष कामगिरी करावी लागेल. भारतीय कर्णधार रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव यासारख्यांना विश्वचषकापूर्वी फॉर्मात येऊन सातत्यपूर्ण कामगिरी करणे निश्चितच आवडेल. अष्टपैलू पंड्या या मोसमात फलंदाजीत आणि गोलंदाजीत फ्लॉप ठरला आहे. जरी त्याने नुकतीच या मोसमातील आपली सर्वोच्च धावसंख्या नोंदविलेली असली, तरी वर्ल्ड कप संघात स्थान मिळवण्यासाठी त्याला आणखी बरीच भरीव कामगिरी करून दाखवावी लागेल.
संघ-मुंबई इंडियन्स : हार्दिक पंड्या (कर्णधार), रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, देवाल्ड ब्रेविस, जसप्रीत बुमराह, पियुष चावला, जेराल्ड कोएत्झी, टिम डेव्हिड, श्रेयस गोपाल, इशान किशन, अंशुल कंबोज, कुमार कार्तिकेय, आकाश मधवाल, क्वेना मफाका , मोहम्मद नबी, शम्स मुलानी, नमन धीर, शिवलिक शर्मा, रोमॅरियो शेफर्ड, अर्जुन तेंडुलकर, नुवान तुषारा, तिलक वर्मा, हार्विक देसाई, नेहल वढेरा, ल्यूक वूड.
लखनौ सुपर जायंट्स : के. एल. राहुल (कर्णधार), क्विंटन डी कॉक, दीपक हुडा, आयुष बडोनी, मार्कस स्टोइनिस, निकोलस पूरन, कृणाल पंड्या, रवी बिश्नोई, मोहसीन खान, शमर जोसेफ, यश ठाकूर, मणिमरन सिद्धार्थ, प्रेरक मंकड, अरहाद खान, कृष्णप्पा गौतम, अमित मिश्रा, काइल मेयर्स, अॅश्टन टर्नर, मॅट हेन्री, नवीन-उल-हक, देवदत्त पडिक्कल, युद्धवीरसिंग चरक, मयंक यादव आणि अर्शिन कुलकर्णी.
सामन्याची वेळ : संध्याकाळी 7.30 वा.