राजस्थानसमोर आज लखनौचे आव्हान
वृत्तसंस्था/ जयपूर
इंडियन प्रीमियर लीगमध्ये आज राजस्थान रॉयल्सला लखनौ सुपर जायंट्सचे आव्हान पेलावे लागणार असून तीन सामन्यांतील पराभवाची मालिका थांबवण्यास ते उत्सुक असतील. सात सामन्यांतून फक्त दोन विजयांसह रॉयल्स गुणतालिकेत आठव्या स्थानावर आहेत आणि दिल्ली कॅपिटल्सविऊद्ध सुपर ओव्हरमध्ये झालेल्या पराभवाने त्यांची स्थिती बिकट झाली आहे.
फलंदाजी व गोलंदाजीतील सातत्याच्या अभावामुळे त्रस्त राजस्थानच्या मोहिमेला गती मिळू शकलेली नसून कर्णधार संजू सॅमसनला मागील सामन्यात ‘साइड स्ट्रेन’चा सामना करावा लागून मैदानाबाहेर जावे लागल्याने त्यात भर पडली आहे. भारतीय मुख्य फलंदाजांवर विसंबून असलेल्या रॉयल्सच्या फलंदाजीने अनेकदा कच खाल्ली आहे, ज्यामुळे मधल्या फळीला दबावाखाली आणलेले आहे. सलामीवीर यशस्वी जैस्वालने रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर आणि दिल्लीविऊद्ध सलग दोन अर्धशतके झळकावून आपण परत सुरात आल्याचे दाखवून दिले आहे. परंतु आजच्या सामन्यात तो ही गती कायम ठेवू शकतो की नाही हे पाहावे लागेल.
सॅमसनला अद्याप निर्णायक खेळी करता आलेली नाही. शार्दुल ठाकूर, आवेश खान, दिग्वेश राठी आणि रवी बिश्नोई यांच्यासारख्या गोलंदाजांविरुद्ध राजस्थानचे फलंदाज कसे खेळतात यावर आणि जैस्वालच्या फॉर्मवर बरेच काही अवलंबून असेल. रियान पराग आणि ध्रुव जुरेल यांनीही आतापर्यंत फलंदाजीच्या आघाडीवर फारसे योगदान दिलेले नाही आणि जर राजस्थानला मोठी धावसंख्या उभारायची असेल किंवा मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायचा असेल, तर या दोघांनाही आक्रमक खेळ करावा लागेल. नितीश राणा दिल्लीविरुद्ध 51 धावा करून फॉर्ममध्ये परतला आहे आणि त्याला ही गती कायम ठेवावी लागेल.
गोलंदाजीच्या बाबतीत राजस्थानचा जोफ्रा आर्चर हळूहळू लयीत आला आहे. पण रॉयल्सचा एकूणच मारा कमकुवत झाला आहे. संदीप शर्मा वगळता त्यांच्या इतर गोलंदाजांना धावा रोखण्याच्या बाबतीत संघर्ष करावा लागला आहे. श्रीलंकेच्या वानिंदू हसरंगा आणि एम. थीक्षाना यांनी सात सामन्यांमध्ये सात बळी घेतले असले, तरी भरपूर धावा दिल्या आहेत.
लखनौ देखील चेन्नई सुपर किंग्सविऊद्धच्या पराभवानंतर शनिवारीच्या सामन्यात उतरणार आहे. परंतु ते सध्या चांगल्या स्थितीत आहेत. सात सामन्यांतून चार विजयांमुळे ते पाचव्या स्थानावर आहेत. त्यांचा एकूणच फलंदाजीचा फॉर्म प्रभावी असून निकोलस पूरन व मिशेल मार्श अव्वल फॉर्ममध्ये आहेत. दक्षिण आफ्रिकेचा एडेन मार्करम देखील धावा काढत असून त्याचा देशबांधव डेव्हिड मिलरचा फॉर्म मात्र चिंताजनक आहे, एलएसजीसाठी सुदैवाने कर्णधार पंतही सीएसकेविऊद्ध 49 चेंडूंत 63 धावा करून फॉर्ममध्ये परतला आहे.
संघ-राजस्थान रॉयल्स : संजू सॅमसन (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभम दुबे, नितीश राणा, रियान पराग, ध्रुव जुरेल, शिमरोन हेटमायर, जोफ्रा आर्चर, महेश थीक्षाना, तुषार देशपांडे, संदीप शर्मा, फजलहक फाऊकी, कुणाल सिंह राठोड, आकाश मधवाल, कुमार कार्तिकेय, क्वेना मफाका, वानिंदू हसरंगा, युधवीर सिंह चरक, अशोक शर्मा, वैभव सूर्यवंशी.
लखनौ सुपर जायंट्स : रिषभ पंत (कर्णधार), डेव्हिड मिलर, एडन मार्करम, आर्यन जुयाल, हिम्मत सिंग, मॅथ्यू ब्रेट्झके, निकोलस पूरन, मिचेल मार्श, अब्दुल समद, शाहबाज अहमद, युवराज चौधरी, राजवर्धन हंगरगेकर, अर्शीन कुलकर्णी, आयुष बडोनी, शार्दुल ठाकूर, आवेश खान, आकाश दीप, मणिमरन सिद्धार्थ, दिग्वेश राठी, आकाश सिंग, शमर जोसेफ, प्रिन्स यादव, मयंक यादव, रवी बिश्नोई.
सामन्याची वेळ : संध्याकाळी 7:30 वा.