कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

नाट्यामय सामन्यात लखनौचा मुंबईवर विजय

06:59 AM Apr 05, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

सूर्या नडला, पण एकटा पडला : हार्दिकची अष्टपैलू खेळी व्यर्थ : लखनौचा हंगामातील दुसरा विजय

Advertisement

वृत्तसंस्था/ लखनौ

Advertisement

लखनौ सुपर जायंट्स संघाने मुंबई इंडियन्सविरूद्ध नाट्यामय सामन्यात अखेरच्या षटकात शानदार विजय मिळवला. लखनौने मुंबई इंडियन्सवर 12 धावांनी विजय मिळवत मोसमातील दुसरा विजय नोंदवला. मिचेल मार्श व मार्करमच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर लखनौने 20 षटकांत 203 धावा केल्या. यानंतर विजयी आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईला 5 गडी गमावत 191 धावापर्यंत मजल मारता आली. आवेश खानने अखेरच्या षटकात कमालीची गोलंदाजी करत मुंबईला पराभवाचा दणका दिला. दरम्यान, मुंबईचा हा चार सामन्यातील तिसरा पराभव ठरला आहे. 21 धावांत 1 बळी टिपणाऱ्या दिग्वेश राठीला सामनावीराचा बहुमान मिळाला.

लखनौच्या 204 धावांचा पाठलाग करताना मुंबईची 2 बाद 17 अशी अवस्था झाली होती. पण त्यानंतर नमन धीर आणि सूर्यकुमार यादवने संघाची पडझड थांबवली. नमनने यावेळी 24 चेंडूंत 4 चौकार आणि तीन षटकारांच्या जोरावर 46 धावांची दमदार खेळी साकारली. नमनचे अर्धशतक हुकले, पण त्यानंतर सूर्याने दमदार फलंदाजी केली. सूर्याला यावेळी तिलक वर्माची साथ मिळाली. पण तो खूपच संथ खेळत होता. त्यामुळे मुंबईने त्याला जखमी निवृत्त केले. सूर्याने यावेळी 67 धावांची खेळी साकारली. पण सूर्या बाद झाला आणि त्यानंतर मुंबईच्या हातून हा सामना निसटला. त्याने 43 चेंडूत 9 चौकार व 1 षटकारासह 67 धावांचे योगदान दिले.

शार्दुल, आवेशची भेदक गोलंदाजी

सूर्या बाद झाल्यानंतर कर्णधार हार्दिक पंड्याने तिलक वर्मासह संघाचा डाव पुढे नेला. ही जोडी मैदानात असेपर्यंत मुंबई हा सामना सहज जिंकेल असे वाटत होते, पण शार्दुल ठाकुरने 19 व्या षटकात सात धावा दिल्या आणि तिथे हा सामना फिरला. यानंतर शेवटच्या षटकात मुंबईला 22 धावा करायच्या होत्या, आवेश खानकडे गोलंदाजी करण्याची जबाबदारी आली. आवेशच्या पहिल्याच चेंडूवर हार्दिकने षटकार लगावला. यानंतर हार्दिकने 2 धावा घेतल्या. तिसऱ्या चेंडूवर हार्दिकने धाव घेण्यास नकार दिला. चौथ्या चेंडूवर हार्दिकचा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न चुकला. पाचव्या चेंडूवर हार्दिकने एक धाव घेतली आणि सहाव्या चेंडूवर धाव मिळाली नाही. पहिल्या चेंडूवर षटकार बसलेला असतानाही आवेश खानने यॉर्कर टाकत उत्कृष्ट गोलंदाजी करत हार्दिकला रोखले. यामुळे मुंबईला या सामन्यात 12 धावांनी पराभवाचा सामना करावा लागला.

मिचेल मार्श, मार्करमची शानदार अर्धशतके

हार्दिकने लखनौला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले आणि त्यांनी या गोष्टीचा चांगलाच फायदा उचलला. लखनौच्या दोन्ही सलामीवीरांनी पॉवर प्लेमध्ये मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजीचा चांगलाच समाचार घेतला आणि एकही विकेट त्यांना मिळवू दिली नाही. मिचेल मार्शने 31 चेंडूंत 9 चौकार आणि दोन षटकारासह 60 धावांची तुफानी खेळी साकारली तर मार्करमने 38 चेंडूत 53 धावांचे योगदान दिले. कर्णधार ऋषभ पंत पुन्हा एकदा अपयशी ठरला आणि दोन धावा काढून बाद झाला. तर, निकोलस पूरनने 12 धावा केल्या. याशिवाय, आयुष बडोनीने 30 तर मिलरने 27 धावांची वादळी खेळी केली. यामुळे लखनौला 8 गडी गमावत 203 धावा करता आल्या. दरम्यान, हार्दिक पंड्याने 10 वर्षांच्या आयपीएल कारकिर्दीत पहिल्यांदाच एका डावात गोलंदाजी करताना 5 विकेट्स घेतल्या.

संक्षिप्त धावफलक

लखनौ सुपर जायंट्स 20 षटकांत 8 बाद 203 (मिचेल मार्श 60, मार्करम 53, आयुष बडोनी 30, डेव्हिड मिलर 27, हार्दिक पंड्या 36 धावांत 5 बळी, बोल्ट, अश्वनी कुमार, विघ्नेश पुथूर प्रत्येकी एक बळी)

मुंबई इंडियन्स 20 षटकांत 5 बाद 191 (विल जॅक्स 5, रिकेल्टन 10, नमन धीर 46, सूर्यकुमार यादव 67, तिलक वर्मा 25, हार्दिक पंड्या नाबाद 28, सँटनर नाबाद 2, शार्दुल ठाकुर, आकाश दीप, आवेश खान व दिग्वेश राठी प्रत्येकी एक बळी).

 

 

Advertisement
Tags :
#kolhapur#tarunbharatnews
Next Article