24 तास पाणी योजनेवरून एलअॅण्डटीची खरडपट्टी
नगरसेवकांनी घेतला अधिकाऱ्यांचा क्लास; प्रश्नांचा भडिमार : वेळेत कामे पूर्ण न केल्यास मनपासमोर आंदोलनाचा इशारा
बेळगाव : महापालिका सभागृहात केयुआयडीएफसी आणि एलअॅण्डटीच्या आयोजित बैठकीत पाणीपुरवठ्यावरून नगरसेवकांनी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. नगरसेवकांच्या प्रश्नांना उत्तरे देताना अधिकाऱ्यांची दमछाक झाली. विचारलेल्या सर्व प्रश्नांना समर्पक उत्तरे न देता केवळ उडवाउडवीची उत्तरे देत वेळ मारून नेण्याचा प्रयत्न झाल्याचे दिसून आले. त्यामुळे संतप्त नगरसेवकांनी अधिकाऱ्यांकडून लेखी उत्तर लिहून घेण्याची मागणी केली. तसेच वेळेत कामे पूर्ण न झाल्यास महापालिकेसमोर धरणे धरण्यात येईल, असा इशारा चक्क महापौर मंगेश पवार यांनीच सभागृहात अधिकाऱ्यांना दिला.
शिवबसवनगर येथे गेल्या अनेक वर्षांपासून जलवाहिनीला गळती लागली आहे. गळती काढण्यासंदर्भात अधिकाऱ्यांना अनेकवेळा सूचना करूनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे, अशी तक्रार नगरसेवकांनी केली. गळतीमुळे रस्तादेखील खराब होत आहे, असे सांगितल्यानंतर या कामासाठी महामार्ग प्राधिकरणाकडून परवानगी मिळणे गरजेचे असल्याचे सांगितले. 15 दिवसांत गळतीचे काम पूर्ण करण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले.
यावेळी नगरसेवक राजशेखर डोणी म्हणाले, पाण्याची गरज असताना टँकरची मागणी केल्यास वेळेत टँकर येत नाही. गळतीमुळे रस्ते नादुरुस्त होत आहेत, असा आरोप केला. 10 ते 15 दिवसांतून एकदा पाणी येत आहे. त्यामुळे पाणीपुरवठ्याची जबाबदारी एलअॅण्डटीकडे नको, किमान पाच दिवसांतून एकदा पाणी सोडण्यात यावे, पाणी कमी दाबाने सोडले जात आहे. जलवाहिनी घालण्यासाठी खोदलेल्या चरी बुजविल्या जात नाहीत. अधिवेशनकाळात प्रभाग क्र. 14 मध्ये पाणी मिळणे कठीण असते. त्यामुळे 24 तास पाण्याचे स्वप्न कधी पूर्ण होणार, असा सवाल नगरसेवक शिवाजी मंडोळकर यांनी उपस्थित केला. एखाद्या ठिकाणी काम हाती घेतल्यानंतर ते पूर्ण करण्याऐवजी अर्धवट टाकून पुन्हा दुसरीकडे खोदकाम केले जात आहे. दूषित पाणीपुरवठ्यामुळे नागरिक आजारी पडत आहेत. त्यामुळे एलअॅण्डटी कंपनीने सगळीकडे अर्धवट कामे करण्याऐवजी विभागवार कामे हाती घ्यावीत, अशी सूचना काही नगरसेवकांनी केली.
शहरातील अनेक कूपनलिका व विहिरींना दूषित पाणी येत आहे. त्यामुळे गटारी आणि ड्रेनेजची समस्या मार्गी लावणे गरजेचे आहे. गतवर्षी दक्षिण आणि उत्तर विभागात 110 कूपनलिका खोदण्यात आल्या आहेत. मात्र त्यांना हेस्कॉमकडून वीजजोडणी करण्यात आली नाही. पेव्हर्स व्यवस्थित काढण्याऐवजी ते ड्रील करून फोडले जात आहेत. नानावाडी परिसरात कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. खोदलेल्या कूपनलिका सुरू करण्यात न आल्याने नागरिक नगरसेवकांना मुर्ख ठरवत आहेत. शहरात पाणी समस्या असताना सुवर्णसौधला दररोज दोन एमएलडी पाणी सोडले जात आहे. या पाण्याची गरज आहे की विनाकारण सोडले जात आहे. कॅन्टोन्मेंटकडे चार कोटी रुपयांचे पाणी बिल थकीत आहे, ते कसे वसूल करणार? अशाप्रकारे प्रश्नांची सरबत्ती करण्यात आली.
पाण्याच्या वापराऐवजी बिलेच अधिक
नगरसेवक रवी साळुंखे म्हणाले, शहरात किती दिवसांतून एकदा पाणी सोडले जाते, हे आधी स्पष्ट होणे गरजेचे आहे. पाण्याच्या वापराऐवजी बिलेच अधिक येत आहेत. त्यामुळे थकबाकीधारकांची बिले वन टाईम सेटलमेंट करावीत, अशी मागणी केली. नगरसेवक रमेश सोनटक्की म्हणाले, स्मार्ट सिटी आणि एलअॅण्डटीचा 24 तास पाणीपुरवठा केवळ दिवास्वप्न बनून राहिला आहे. नागरिकांकडून नगरसेवकांना शिव्यांच्या लाखोल्या वाहिल्या जात आहेत. यामुळे मनपाची बदनामी होत आहे. नळांना पाणीपुरवठा नसताना बिले मात्र अगदी वेळेवर येत आहेत, असा आरोप केला. त्यावेळी अधीक्षक अभियंत्या लक्ष्मी निपाणीकर यांनी तशा कनेक्शनधारकांचे तीन विभागवार वर्गीकरण केले आहे. त्यावर लवकरच तोडगा काढणार असल्याचे सांगितले.
टँकरसह कर्मचारी बैठकीला उपस्थित...
महापौर मंगेश पवार यांनी 27 मार्च रोजी आयोजित केलेल्या बैठकीला केयुआयडीएफसी आणि एलअॅण्डटीचे अधिकारी अनुपस्थित राहिल्याने सदर बैठक गुरुवारी महापालिका सभागृहात आयोजित करण्यात आली होती. बैठकीला एलअॅण्डटीचे अधिकारी, सुपरवायझर, त्याचबरोबर व्हॉल्वमनदेखील उपस्थित होते. टँकरद्वारे पाणीपुरवठा होत नसल्याचा आरोप केला जात असल्याने कर्मचारी टँकरसह बैठकीला उपस्थित होते. बैठकीच्या सुरुवातीलाच महापौर, उपमहापौर, आयुक्त आणि नगरसेवकांनी महापालिकेबाहेर उभ्या करण्यात आलेल्या टँकरची पाहणी केल्यानंतर बैठकीला सुरुवात झाली.