धरण उशाला, कोरड घशाला!
पावसाळ्यातदेखील शहराला पाणीपुरवठा करण्यात एलअँडटी अपयशी
बेळगाव : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या राकसकोप जलाशयातून यंदा दुसऱ्यांदा विसर्ग करण्यात येत आहे. तरीदेखील एलअँडटीकडून शहर व उपनगराला अद्यापही व्यवस्थितरित्या पाणीपुरवठा करण्यात येत नसल्याने बेळगावकरातून एलअँडटीच्या भोंगळ कारभाराबाबत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. श्रावण महिन्याच्या पहिल्या शुक्रवारपासून शहरात विविध ठिकाणी पाणीपुरवठा खंडित करण्यात आल्याने पाण्याअभावी नागरिकांना खासगी टँकरचा आधार घ्यावा लागला. मात्र, यासाठी आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. 24 तास पिण्याच्या पाण्याचा पुरवठा शहराला केला जाईल, असे गाजर एलअँडटीकडून बेळगावकरांना दाखविण्यात आले. मात्र, 24 तास पाण्याचा प्रकल्प अद्याप एक दिवास्वप्नच बनून राहिला आहे.
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या हिडकल आणि राकसकोप जलाशयातून बेळगावकडे पाणी आणण्यासाठी मुख्य जलवाहिनी घालण्याचे काम काही ठिकाणी अद्यापही पूर्ण झालेले नाही. विशेष करून हिडकल जलाशयाकडून येणारा काही भाग वनखात्याच्या हद्दीत येतो. त्यामुळे वनखात्याकडून जलवाहिनी घालण्यासाठी अद्याप परवानगी मिळालेली नाही. विविध ठिकाणी जलकुंभ उभारण्याचे कामही सुरू आहे. घरोघरी नळजोडणी करण्यासाठी शहरातील गल्लीबोळात एलअँडटीकडून खोदकाम हाती घेण्यात आले आहे. सध्या सुरू असलेले खोदकाम अशास्त्राrय पद्धतीने सुरू असल्याचे दिसून येत आहे. स्मार्ट सिटीकडून शहरात काँक्रिटचे रस्ते करण्यापूर्वीच जलवाहिनी घालण्याचे काम हाती घेणे गरजेचे होते. पण रस्ते करण्यात आल्यानंतर वरातीमागून घोडे या प्रकारे एलअँडटीकडून काँक्रिटचे रस्ते फोडले जात आहेत.
खरेतर रस्त्याच्या दोन्ही बाजूंना पेव्हर्स घालणे गरजेचे होते. एखादे वेळी जलवाहिनी किंवा इतर प्रकारचे काम करायचे असल्यास पेव्हर्स उखडून तेथे काम हाती घेणे सोपे होते. पण पूर्ण रस्ता काँक्रिटचा करण्यात आला असल्याने जलवाहिनी घालण्यासाठी रस्ता फोडल्याशिवाय दुसरा पर्याय नाही. मात्र, गल्लोगल्लीत सुरू असलेल्या या कामामुळे स्थानिक रहिवाशांना मात्र नाहक त्रास सहन करण्याची वेळ आली आहे. पावसामुळे चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. खोदकाम केलेल्या चरींवर एलअँडटीकडून केवळ माती ओढली जात आहे. मात्र, त्यावर डांबर किंवा काँक्रिट घालण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. याबाबत अनेक वेळा महापालिकेच्या बैठकीत आरोप केले जात आहेत. पण प्रत्यक्षात कोणतीही कारवाई होताना दिसत नाही.
गणेशोत्सव तोंडावर आला असतानादेखील चरी बुजविण्याकडे साफ दुर्लक्ष करण्यात आले आहे. गणेशोत्सवापूर्वी धोकादायक चरी बुजविण्यात याव्यात, अशी मागणी केली जात आहे. इतकेच नव्हे तर एलअँडटीने गणेशोत्सवानंतर जे काही काम करायचे आहे ते हाती घ्यावे, अशी मागणी बेळगावकरातून केली जात आहे. सध्या राकसकोप जलाशय तुडुंब भरले असले तरीही बेळगावला व्यवस्थितरित्या पाणीपुरवठा होत नाही. अद्यापही आठ दिवसांतून एकदाच पाणीपुरवठा केला जात आहे. काही भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. इतकेच नव्हे तर गढूळ पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारीही वाढल्या आहेत. ऐन श्रावणात पाण्यासाठी शहरवासियांना खासगी टँकरवर अवलंबून रहावे लागत आहे. खासगी टँकरसाठी 800 ते 1000 रुपये मोजावे लागत आहेत. त्यामुळे एलअँडटी आणि टँकर व्यावसायिकांमध्ये काही ठरले आहे का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.