नळजोडणीसाठी एलअँडटीकडून वडगावमध्ये कागदपत्रांचा स्वीकार
बेळगाव : 24 तास पाणीपुरवठा जोडणीसाठी इच्छुकांकडून एलअँडटीने अर्ज स्वीकारण्यास सुरुवात केली आहे. मंगळवारी ज्ञानेश्वर मंदिर, राजवाडा कंपाऊंड, वडगाव येथे एलअँडटी कडून अर्ज स्वीकारण्यात आले. यावेळी पाटील गल्ली, संभाजीनगर, नाझर कॅम्प, विष्णू गल्ली, वझे गल्ली, मंगाईदेवी मंदिर रोड येथील रहिवाशांनी 24 तास पाण्यासाठी कागदपत्रे अधिकाऱ्यांकडे जमा केली. 24 तास पाण्यासाठी एलअँडटी कडून पाईपलाईन घालण्याचे काम शहरात पूर्ण झाले आहे. त्यामुळे घरोघरी नळजोडणीचे काम हाती घेतले आहे. ज्या कोणाला नळजोडणी हवी आहे, त्यांनी एलअँडटीकडे आवश्यक कागदपत्रे जमा करण्याचे आवाहन केले जात आहे. तसेच काही प्रभागांमध्ये अधिकारी नागरिकांशी भेटून कागदपत्रे जमा करून घेत आहेत. त्याचप्रमाणे मंगळवारी ज्ञानेश्वर मंदिर, राजवाडा कंपाऊंड, वडगाव येथे एलअँडटीच्या अधिकाऱ्यांनी परिसरातील रहिवाशांकडून नळजोडणीसाठी कागदपत्रे स्वीकारली. यावेळी माजी नगरसेवक मनोहर हलगेकर, रमाकांत बाळेकुंद्री, शांताराम पाटील, प्रकाश पवार, प्रकाश आनंदाचे, श्रीकांत पाटील आदी उपस्थित होते.