For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

निष्ठावंत चेंगरले, ‘कुंभमेळा’ थांबणार कधी?

06:57 AM Jun 21, 2025 IST | Tarun Bharat Portal
निष्ठावंत चेंगरले  ‘कुंभमेळा’ थांबणार कधी
Advertisement

महाराष्ट्राच्या राजकारणात भारतीय जनता पक्षाने गेल्या दशकभरात आश्चर्यकारक वाटचाल केली. 2014 पासून केंद्र आणि राज्यात सत्तेत आल्यानंतर तर विरोधकांना बदनाम करणे, गंभीर आरोप लावणे आणि नंतर त्यांनाच पक्षात सामावून घेणे किंवा युती करणे, ही रणनीती अवलंबली. पण पक्षात घेऊन पवित्र करून घेण्याच्या या कुंभमेळ्यात भाजपचे निष्ठावंत मात्र चेंगरले जात आहेत.

Advertisement

ताजे उदाहरण नाशिकचे सुधाकर बडगुजर यांचे. आमदार सीमा हिरे यांना न जुमानता अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा हस्तक सलीम कुत्ता याच्यासोबत संबंध असल्याचा आरोप असलेल्या बडगुजर यांना पक्षात घेतल्याने निष्ठावंतांमध्ये नाराजी पसरली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि आता शिवसेनेतून आलेल्या नेत्यांच्या गर्दीत जुन्या भाजप कार्यकर्त्यांची सुरू असणारी चेंगराचेंगरी त्यांना असह्य झाली आहे. हा कुंभमेळा थांबणार कधी? असा प्रश्न भाजपच्या मतदारांनाही पडू लागला आहे.

राज्यात आणि देशात आपण तेवढे सत्वशील आणि इतर सारे तमोगुणी अशी मांडणी भाजप नेते करत आले आहेत. 2014 मध्ये त्यांना मोठे यश मिळाले. त्यानंतर या तमोगुणींना नमवून त्यांनी आपल्या पक्षात आणण्यास सुरुवात केली. अजित पवार आणि एकनाथ शिंदे या दोघांना त्यांच्या पक्षातून फोडून बाहेर काढून आपल्या पक्षाबरोबर आणून सत्तेत बसवणे हे त्यांचे सर्वोच्च यश आहे. इतके होऊनही फोडाफोडी थांबवलेली नाही. याची निराशा समर्थक आणि मतदारांमध्ये लोकसभेपूर्वी दाटून आली होती. विधानसभेच्या निवडणुकीनंतर त्यांच्यात पुन्हा उत्साह भरण्यात पक्ष नेतृत्व यशस्वी ठरले. मात्र बडगुजर यांच्यासारख्या प्रवेशांनी पुन्हा एकदा निष्ठावंतांना ठेच लागली आहे. त्यांचा संताप उघडपणे व्यक्त होऊ लागला आहे. बडगुजर हे नाशिक महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते याला निमित्त ठरले आहेत. जळगाव, नाशिक भागातील कंत्राटदार ही त्यांची ओळख. त्यातून त्यांनी आपले राजकारण फुलवले. 2008 मध्ये उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत दाखल झाले. 2023 मध्ये सलीम कुत्ता याच्यासोबत नाचतानाचा त्यांचा व्हिडीओ व्हायरल झाला, ज्यामुळे भाजप नेते आशिष शेलार आणि नितेश राणे यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली होती. राणे यांनी बडगुजर यांना देशद्रोही ठरवून अटकेची मागणी केली होती. खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी देखील विधानसभेत बडगुजर यांच्या विरोधात कडक वक्तव्य केले होते. मात्र, 17 जून 2025 रोजी त्याच बडगुजर यांना मुंबईत शक्तिप्रदर्शनासह भाजपमध्ये प्रवेश दिला. नाशिकचे भाजप महानगराध्यक्ष सुनील केदार यांनी “भाजप हे वॉशिंग मशीन आहे’ अशी कबुली देत अंतर्गत असंतोष उघड केला. पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जुन्या आरोपांना बाजूला ठेवून बडगुजर यांनी पक्षाचे नियम पाळावेत, असे सांगितले. एकनाथ खडसे आणि संजय राऊत यांनी यावरून भाजपवर कठोर टीका केली. त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे भाजपचा मतदार सुद्धा या प्रकारांना उबलेला दिसून आला.

Advertisement

2014 सालापासून पक्षाला भक्कम करण्यासाठी काही काळ कळ सोसा असा सल्ला दिला जात होता. आता या प्रकरणात देखील फडणवीस यांचे संकटमोचक आणि या प्रवेशामागचे करतेधरते मंत्री गिरीश महाजन यांनी पक्षाला मोठे करण्यासाठी आणखी कळ सोसा असे सांगून कार्यकर्त्यांच्या आणि मतदारांच्या जखमेवर मीठ चोळले आहे. ज्यांना प्रदीर्घकाळ नावे ठेवली, 2014 नंतर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेतील असे अनेक नेते भाजपमध्ये दाखल झाले. काही एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासोबत आहेत. अनेकांच्या सहकारी संस्थांवर, शिक्षण संस्थांवर, राजकीय कारकीर्द, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील कारभारावर, आणि इतर अनेक प्रकारांवर भाजपने आक्षेप घेऊन त्यांच्या विरोधात रान उठवले होते.

2014 सत्तेचा कार्यकाल संपता संपता 2019 पर्यंत असंख्य नेते भाजपमध्ये आले. काही भाजपच्या रडारवर येऊन वैतागून प्रवेशकर्ते झाले आणि डोक्यावर बसले. यामध्ये खुद्द राणे परिवार, राधाकृष्ण विखे पाटील परिवार,  विजयसिंह मोहिते पाटील परिवार, पद्मसिंह पाटील परिवार, हर्षवर्धन पाटील आणि परिवार, संभाजीराव निलंगेकर आणि परिवार, शिवराज पाटील चाकूरकर यांचा परिवार, बबनराव पाचपुते, राहुल कुल, महेश लांडगे, उदयनराजे भोसले, शिवेंद्रसिंहराजे भोसले, मधुकर पिचड, लक्ष्मण जगताप, कपिल पाटील, संजय सावकारे, नमिता मुंडा, सुरेश धस, विजयकुमार गावित, स्नेहलता कोल्हे, शिवाजीराव कर्डीले, मोनिका राजळे, चित्रा वाघ, नवनीत राणा, प्रसाद लाड, गणेश नाईक, निरंजन डावखरे, प्रताप सरनाईक, भावना गवळी,राहुल नार्वेकर, जयदत्त क्षीरसागर, लक्ष्मण ढोबळे, दिलीप सोपल, दीपक केसरकर, हर्षवर्धन जाधव, धनंजय महाडिक, सूर्यकांता पाटील, रश्मी बागल, संजय पाटील, संजय काकडे, कृपाशंकर सिंह यांनी भाजपमध्ये किंवा मित्र पक्षात प्रवेश केला आणि सत्ता सुद्धा उपभोगली. अब्दुल सत्तार, संजय राठोड वगैरे मंडळी तर शिरजोर झालेली पाहायला मिळाली. भाजपच्या या रणनीतीमुळे राजू शेट्टी, सदाभाऊ खोत, महादेव जानकर, रामदास आठवले अशा छोट्या पण प्रभावी मित्र पक्षांना एकतर अपमान सहन करावा लागला किंवा चिडून साथ सोडावी लागली. ज्यांच्या विरोधात रणनीती आखली त्या अजित पवार यांनाही सोबत घ्यावे लागले.

ठाण्यात एकनाथ शिंदे यांच्या गटाशी निष्ठावंतांची लढत सुरू आहे. या आणि अशाच इतर घटनांमुळे निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये नाराजी वाढत आहे. यामुळे निष्ठावंतांचा अवमान होत असल्याची भावना आहे. नितेश राणे यांनी बडगुजर यांच्यावर टीका केल्यानंतर त्यांच्याच पक्षाने त्यांना स्वीकारल्याने राणे यांचीही गोची झाली. 2014 पासून निष्ठावंतांना डावलून बाहेरून आलेल्या नेत्यांना महत्त्वाची पदे आणि उमेदवारी देण्यात आली. उदाहरणार्थ, राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रवेशामुळे अहमदनगरमधील स्थानिक नेत्यांना संधी मिळाली नाही. अजित पवार यांच्या युतीमुळे राष्ट्रवादीच्या नेत्यांना महायुतीत सामावून घेण्यात आले, ज्यामुळे पुण्यातील भाजपच्या मूळ कार्यकर्त्यांना दुय्यम स्थान मिळाले. अंतर्गत गटबाजी आणि असंतोष वाढला. भाजपची ही रणनीती अल्पकालीन यश मिळवून देणारी ठरली, परंतु पक्षावर दीर्घकालीन परिणाम हानीकारक ठरू शकतात. पहिल्यांदा, निष्ठावंत कार्यकर्त्यांचा विश्वास गमावला जात आहे, ज्यामुळे पक्षाची अंतर्गत एकता कमकुवत होऊ शकते. दुसरे, विरोधकांना बदनाम करून नंतर त्यांना सामावून घेण्यामुळे पक्षाची विश्वासार्हता कमी होत आहे. तिसरे, पक्षांतरामुळे स्थानिक पातळीवरील राजकारणात अस्थिरता निर्माण होते, ज्याचा परिणाम मतदारांवर होऊ शकतो. यशाच्या धुंदीत पुढे पुढे चाललेल्या भाजपला आपले मूळ गमावत आहे याची इतर पक्ष निष्प्रभ होत असल्याचे दिसल्याने कदाचित चिंता राहिलेली नसावी.

मात्र 2019 मध्ये सत्तेत न आल्याने देवेंद्र फडणवीस यांना स्वत:लाच ‘मेरा पाणी कम होता देख मेरे किनारे पे घर मत बसा लेना...’ असा इशारा द्यावा लागला होता. केंद्रात सत्ता असल्याने त्यांना त्यांचे मनसुबे यशस्वी करण्याची संधी मिळाली. पण, मतदारांचा विश्वास गमावून असेच यश सतत मिळू शकत नाही. याचा भाजप नेतृत्वाने विचार करावा अशी कार्यकर्त्यांची भावना बनत चालली आहे.

शिवराज काटकर

Advertisement
Tags :

.