म. ए. समितीचा निष्ठावान कार्यकर्ता हरपला
रामा शिंदोळकर यांना वाहिली समिती कार्यकर्त्यांनी श्रद्धांजली
बेळगाव : कोनवाळ गल्लीतील म. ए. समितीचे ज्येष्ठ कार्यकर्ते व पंच रामा शिंदोळकर यांचे नुकतेच निधन झाले. म. ए. समितीच्या प्रत्येक आंदोलनात त्यांचा हिरीरीने सहभाग असायचा. मराठी भाषिकांच्या हक्कासाठी त्यांनी अनेक आंदोलने केली. त्यांच्या जाण्यामुळे म. ए. समितीचा निष्ठावान कार्यकर्ता हरपल्याची चिंता मंगळवारी आयोजित शोकसभेत व्यक्त करण्यात आली. शिवसेनेच्यावतीने रामलिंगखिंड गल्ली येथील मध्यवर्ती कार्यालयात शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विविध मान्यवरांनी रामा शिंदोळकर यांच्या सीमाप्रश्नाच्या योगदानाबद्दल माहिती दिली. प्रारंभी जिल्हा प्रमुख प्रकाश शिरोळकर, माजी महापौर शिवाजी सुंठकर, युवानेते शुभम शेळके यांच्या हस्ते शिंदोळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
सीमाप्रश्नाची सोडवणूक हीच त्यांना खरी श्रद्धांजली
केवळ बेळगावच नाही तर कोल्हापूर, मुंबई येथे झालेल्या आंदोलनातही त्यांनी सहभाग घेतला होता. वयोमानानुसार चालता येत नसले तरी ते दरवर्षी काळ्या दिनाच्या सायकल फेरीमध्ये सहभागी होऊन युवा पिढीचा उत्साह वाढवत होते. सीमाप्रश्नाच्या सोडवणूक हीच त्यांना श्रद्धांजली, अशा शब्दात श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी शिवसेनेचे महेश टंगसाळी, माजी नगरसेवक अनिल पाटील, मनोहर हुंदरे, यल्लाप्पा मुचंडीकर, राजू बोकडे, किसन सुंठकर, विनायक बेळगावकर, महांतेश कोळुचे, सुनील बोकडे, अशोक घगवे आदी उपस्थित होते.